पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात करण्यात आलेल्या आक्षेपार्ह घोषणाबाजीचा मुद्दा आता अधिक तापत चालला आहे. भाजपच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी या घटनेचा तीव्र निषेध करत जयपूर महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष मंजू लता मीणा यांनी माफी मागावी, अशी मागणी केली आहे. आता मंडी लोकसभा मतदारसंघाच्या खासदार कंगना रनौत यांनीही पंतप्रधान मोदींविरोधातील आक्षेपार्ह घोषणाबाजीला दुर्दैवी ठरवत राजकारणाच्या पातळीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. विरोधकांकडून तरुणांना चुकीचा संदेश दिला जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.
माध्यमांशी बोलताना कंगना रनौत म्हणाल्या की, “कोणाच्या मृत्यूची इच्छा व्यक्त करणे, कोणाला बद्दुआ देणे किंवा अशा प्रकारच्या घोषणा देणे अत्यंत दुःखद आहे. आमचा पक्ष वेगळा असू शकतो, विचारधारा वेगळी असू शकते; पण याचा अर्थ असा नाही की आपण शत्रू आहोत. कोणाला मारण्याची इच्छा व्यक्त करणे आणि लोकांना भडकवणे चुकीचे आहे.” पुढे त्या म्हणाल्या, “पंतप्रधान मोदींविरोधात वापरण्यात आलेल्या भाषेमुळे आम्हाला खूप दुःख झाले आहे आणि संपूर्ण देशालाही वेदना झाल्या आहेत. पंतप्रधान मोदींना १४० कोटी लोकांनी निवडून दिले आहे. ते अत्यंत लोकप्रिय नेते असून त्यांची चाहत केवळ देशातच नव्हे तर परदेशातही आहे. जे शब्द वापरले गेले, ते अतिशय अपमानास्पद आहेत आणि त्याविरोधात गंभीर पावले उचलली पाहिजेत.”
या प्रकरणाचे गांभीर्य अधोरेखित करत कंगनाने योग्य कारवाईची मागणी केली आहे. “अशा प्रकारच्या विधानांसाठी माफी मागितली पाहिजे. अशा गोष्टींमुळे देशातील वातावरण बिघडेल. आज फक्त शब्दांत बोलले जात आहे, उद्या कोणी मारण्याची इच्छा देखील व्यक्त करू शकतो. राजकारणात असा काळ येत आहे, ही बाब अत्यंत चिंताजनक आहे,” असे त्या म्हणाल्या.
उल्लेखनीय म्हणजे, १४ नोव्हेंबर रोजी दिल्लीत रामलीला मैदानावर काँग्रेसने सरकारविरोधात रॅलीचे आयोजन केले होते. या रॅलीत जयपूर महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष मंजू लता मीणा उपस्थित होत्या. त्यांनी रॅलीदरम्यान पंतप्रधान मोदींविरोधात वादग्रस्त घोषणाबाजी केली होती. त्यांचा घोषणाबाजी करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. एवढेच नव्हे, तर प्रकरण चिघळल्यानंतरही एका मुलाखतीत मीणा यांनी आपल्या विधानाबाबत कोणताही पश्चात्ताप नसल्याचे सांगितले आणि आपण जे बोललो त्यात काहीही चुकीचे नाही, असे म्हटले.







