उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाला कारणीभूत ठरलेल्या विमान दुर्घटना प्रकरणाला आता नवे वळण मिळण्याची शक्यता आहे. या दुर्घटनेमागे मोठा निष्काळजीपणा असल्याचा गंभीर आरोप करत, आमदार रोहित पवार यांनी बुधवारी मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी अर्जाद्वारे केली आहे.
दरम्यान, हे प्रकरण तांत्रिकदृष्ट्या गुंतागुंतीचे असल्याने आणि आधीच पुण्यात तपास सुरू असल्याने, मरीन ड्राइव्ह पोलिसांनी हा अर्ज पुढील कार्यवाहीसाठी पुणे सीआयडी (CID) कडे वर्ग केला आहे.
२८ जानेवारी २०२६ रोजी झालेल्या विमान दुर्घटनेत अजित पवार यांचे निधन झाले होते. याप्रकरणी बारामती तालुका पोलीस ठाण्यात ‘अकस्मात मृत्यू’ म्हणून नोंद करण्यात आली होती. सध्या या प्रकरणाचा तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून (पुणे सीआयडी) सुरू आहे. मात्र, या तपासाला गती मिळावी आणि दोषींवर कडक कारवाई व्हावी, या मागणीसाठी रोहित पवार आक्रमक झाले आहेत.
हे ही वाचा:
व्हेनेझुएलाचे कच्चे तेल पुन्हा भारताकडे
मोदी-नेतन्याहू भेटीत हलकाफुलका क्षण
एपस्टीन प्रकरणावरून बिल गेट्स यांची जाहीर माफी
बुधवारी रोहित पवार यांच्यासोबत आमदार अमोल मिटकरी यांनीही पोलीस आयुक्तालयांतर्गत मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात हजेरी लावली. आपल्या तक्रार अर्जात त्यांनी काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले आहेत.
विमान उड्डाणापूर्वीच्या सुरक्षा मानकांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत नागरी विमान वाहतूक महासंचालनालयावर कारवाईची मागणी करण्यात आली आहे.ज्या कंपनीचे विमान या दुर्घटनेत सामील होते, त्या ‘मेसर्स व्ही. आर. एस. व्हेंचर्स प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक आणि व्यवस्थापनाची चौकशी करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी अर्जात नमूद आहे.
विमान दुर्घटनेमागे केवळ तांत्रिक बिघाड नसून प्रशासकीय आणि तांत्रिक निष्काळजीपणा असण्याची शक्यता दाट आहे. या प्रकरणाच्या मुळाशी जाणे आवश्यक आहे,” असे मत रोहित पवार यांनी यावेळी व्यक्त केले.
या प्रकरणाबाबत माहिती देताना परिमंडळ १ चे उपायुक्त डॉ. प्रवीण मुंढे म्हणाले, “रोहित पवार यांनी दिलेला अर्ज हा आधीच नोंद असलेल्या एडीआर प्रकरणाशी संबंधित आहे. या घटनेचा मूळ तपास सीआयडी पुणे करत असल्याने, प्रशासकीय सुलभतेसाठी आणि तपासात सुसूत्रता आणण्यासाठी हा अर्ज सीआयडीकडे हस्तांतरित करण्यात आला आहे.”
आता सीआयडी या अर्जातील मुद्द्यांचा विचार करून ‘व्हीआरएस व्हेंचर्स’च्या संचालकांना चौकशीसाठी बोलावणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.







