महानगरपालिकांच्या निवडणुकींची घोषणा झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात वेगाने घडामोडी घडत आहेत. महापालिकांच्या निवडणुकीसाठी १५ जानेवारीला मतदान होणार असून १६ जानेवारीला निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. अशातच युती- आघाडी अशी गणिते सुरू असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्त्वाची घोषणा केली आहे. त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP) आगामी पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीसाठी त्यांचे काका शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील गटाशी युती करेल, अशी घोषणा त्यांनी केली आहे.
रविवारी पिंपरी- चिंचवड येथे निवडणूक प्रचार सभेत अजित पवार यांनी दोन्ही गटांमधील ऐक्यावर भर दिला आणि “परिवार एकत्र आला आहे” असे सांगितले. महापालिका निवडणुकीसाठी उमेदवार यादी अंतिम करताना, दोन्ही गटांनी एकत्र लढण्याचा निर्णय घेतला, ज्यामुळे कुटुंब पुन्हा एकत्र आले. निकालाबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत, परंतु कधीकधी महाराष्ट्राच्या विकासाच्या हितासाठी निर्णय घ्यावे लागतात. मी स्थानिक नेत्यांशी जागावाटपाबाबतही चर्चा केली आहे, जी लवकरच जाहीर केली जाईल, असे अजित पवार म्हणाले. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमध्ये ‘घड्याळ’ आणि ‘तुतारी’ एकत्र निवडणूक लढणार आहत.
हे ही वाचा:
भीमाशंकर ज्योतिर्लिंगसह कंगना रनौतने पूर्ण केली १२ ज्योतिर्लिंगची अद्भुत यात्रा
पाकिस्तानकडून धार्मिक तणाव निर्माण करण्याचा कट
‘ती’ महिला अधिकारी हरवलेली नव्हती!
इंस्टाग्राम डाऊन! युजर्सना लॉगिन आणि अॅप वापरण्यात अडचणी
पिंपरी-चिंचवड आणि पुणे महानगरपालिकांसह महाराष्ट्रातील २९ महानगरपालिकांच्या निवडणुका १५ जानेवारी रोजी होणार आहेत आणि दुसऱ्या दिवशी मतमोजणी होईल. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ३० डिसेंबर आहे. मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येऊन युतीची घोषणा केली आहे, दुसरीकडे मुंबई महापालिका निवडणुकीसाठी प्रकाश आंबेडकर यांची वंचित आघाडी आणि काँग्रेसने युतीची घोषणा केली आहे. तसेच पिंपरी-चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादींच्या आघाडीची घोषणा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.







