केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी रविवारी महाराष्ट्रातील जनतेचे भाजपप्रणीत महायुतीला दिलेल्या “प्रचंड पाठिंब्यासाठी” आभार व्यक्त केले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधील निकाल हे सुशासन आणि विकासाच्या राजकारणाचा विजय असल्याचे त्यांनी म्हटले.
या निवडणुकीत भाजप नंबर वन पक्ष ठरला. त्यांनी नगराध्यक्ष पदांचे शतक गाठले तर शिंदेंच्या शिवसेनेला अर्धशतक नोंदवता आले. त्यामुळे महायुतीला २०० पेक्षा अधिक जागा जिंकता आल्या.
भाजपच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, अमित शाह म्हणाले की महायुतीच्या यशातून केंद्रात आणि महाराष्ट्रात सत्तेवर असलेल्या एनडीए सरकारच्या सर्वसमावेशक कल्याणाच्या दृष्टिकोनावर जनतेचा आशीर्वाद असल्याचे स्पष्टपणे दिसून येते.
राज्यातील २८६ नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमधील नगराध्यक्ष व सदस्य पदांसाठीच्या मतमोजणीला रविवारी सकाळी १० वाजता सुरुवात झाली. सुरुवातीच्या कलांनुसार भाजप, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा समावेश असलेल्या महायुतीला स्पष्ट आघाडी मिळत असल्याचे दिसून आले.
भाजपने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकांमध्ये महायुतीला प्रचंड पाठिंबा दिल्याबद्दल महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले.
हे ही वाचा:
ध्यानाचे एक नाही तर तीन प्रकार
मुक्ती–गुप्तेश्वर महादेव : ऑस्ट्रेलियातील १३वे ज्योतिर्लिंग
बांगलादेशातील तणाव : अमेरिकन दूतावासाकडून अलर्ट
आता भाजपा शहरात आणि ग्रामीण भागातही नंबर वन
निवेदनात पुढे नमूद करण्यात आले की, “हा जनादेश महाराष्ट्रातील जनतेचा स्पष्ट विश्वास आणि ठाम पाठिंबा दर्शवतो. हा निकाल सुशासन, विकास आणि जनकल्याणाला प्राधान्य देणाऱ्या राजकारणाचा विजय आहे, असे अमित शाह यांनी सांगितले.”
यावेळी अमित शाह यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार, तसेच एनडीएतील सर्व कार्यकर्त्यांचे विजयाबद्दल अभिनंदन केले. तसेच महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि शहरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सर्वाधिक जागा जिंकणाऱ्या भाजपच्या सर्व कार्यकर्त्यांचेही त्यांनी कौतुक करत अभिनंदन केले.







