शनिवारी पार पडलेल्या भाजप आसाम राज्य कार्यकारिणी बैठकीत, मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा यांनी आगामी आसाम विधानसभा निवडणुकीला “संस्कृतींचा लढा” असे संबोधले. केवळ विकास पुरेसा नाही, तर राज्याची ओळख आणि अस्तित्व जपणे तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी ठामपणे सांगितले.
पक्ष कार्यकर्त्यांना संबोधित करताना सरमा म्हणाले की, भाजपचे राजकारण विकासावर आधारित असले तरी अस्तित्व आणि ओळख हे मुद्दे दुर्लक्षित करता येणार नाहीत. आज आसाममध्ये दोन वेगवेगळ्या सभ्यतांचे अस्तित्व स्पष्टपणे दिसत असल्याचा दावा त्यांनी केला.
दोन सभ्यतांचा उल्लेख
सरमा यांनी सांगितले की, पहिली संस्कृती ही ५,००० वर्षे जुनी सनातन संस्कृती आहे, जी सर्व प्रकारच्या उपासनेला स्वीकारते आणि सर्वसमावेशकतेवर विश्वास ठेवते. ही संस्कृती नेहमीच सर्वांना सामावून घेणारी राहिली आहे. मात्र, काँग्रेस पक्षाच्या कमजोरीमुळे आणि तुष्टीकरणाच्या राजकारणामुळे दुसरी एक संस्कृती हळूहळू आसाममध्ये वाढत गेल्याचा आरोप त्यांनी केला.
लोकसंख्येचा मुद्दा आणि जनगणनेचे संदर्भ
मुख्यमंत्री सरमा यांनी २०११ च्या जनगणनेचा उल्लेख करत सांगितले की, त्या आकडेवारीनुसार आसाममधील सुमारे ३४ टक्के लोकसंख्या मुस्लिमांची आहे. यामधून सुमारे ३ टक्के आसामी मुस्लिम वगळले, तर उरलेले सुमारे ३१ टक्के मुस्लिम हे बांगलादेशी मूळाचे (मिया मुस्लिम) असल्याचा दावा त्यांनी केला.
ते म्हणाले की, प्रत्येक जनगणनेत हा आकडा सुमारे ४ टक्क्यांनी वाढत आहे, आणि जर हीच स्थिती राहिली तर २०२७ च्या जनगणनेत बांगलादेशी मूळाचे मिया मुस्लिम आसामच्या लोकसंख्येच्या जवळपास ४० टक्के असू शकतात.
हे ही वाचा:
मेक इन इंडिया, पीएलआय योजनांनी इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्राला दिली गती
जम्मूत ३० पेक्षा अधिक पाकिस्तानी दहशतवादी
भारत दुसऱ्या क्रमांकाचा मोबाईल मॅन्युफॅक्चरिंग हब बनला
श्री क्षेत्र भीमाशंकर मंदिर तीन महिन्याकरिता बंद
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बैठक
ही दोन दिवसांची बैठक आगामी आसाम विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आली होती. या निवडणुका पुढील वर्षी मार्च–एप्रिलमध्ये होण्याची शक्यता आहे. या बैठकीला भाजपचे नवे राष्ट्रीय कार्यकारिणी अध्यक्ष नितीन नबीन, राष्ट्रीय उपाध्यक्ष बैजयंत जय पांडा, राष्ट्रीय सरचिटणीस बी. एल. संतोष, यांच्यासह आसाम भाजपचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित होते.
विकासकामांचा आढावा आणि ओळखीचा मुद्दा
निवडणूक प्रचाराचा संदेश मांडताना सरमा यांनी आपल्या कार्यकाळातील विकासकामांचा आढावा घेतला. सरकारी कल्याणकारी योजना राज्यातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचल्या असल्याचे त्यांनी सांगितले.तरीसुद्धा, विकासाबरोबरच आसामची सांस्कृतिक आणि सामाजिक ओळख जपण्याची गरज त्यांनी पुन्हा एकदा अधोरेखित केली.
बांगलादेशातील परिस्थिती आणि दिपू चंद्र दास प्रकरण
मुख्यमंत्री सरमा यांनी बांगलादेशातील अलीकडील अस्थिरता आणि तेथे हिंदू युवक दिपू चंद्र दास यांच्या हत्येचा उल्लेख केला. काही लोक सहअस्तित्वाची भाषा करतात, मात्र सनातन धर्म सर्वांना स्वीकारतो, असे ते म्हणाले. त्यांच्या मते, बांगलादेशातील अलीकडील घटनांवरून स्पष्ट होते की दुसरी बाजू बहिष्करण (exclusiveness) मानते.
ते म्हणाले की, त्या लोकांसाठी धर्म राष्ट्रापेक्षा मोठा आहे.
सरमा यांनी इशारा दिला की, दिपू दास यांच्यासोबत बांगलादेशात जे घडले, ते पाहता २० वर्षांनंतर आसामी लोकांसमोर कोणती परिस्थिती उभी राहू शकते, याची कल्पना येते.
‘चिकन नेक’मधील लोकांची निष्ठा कुणासोबत?
राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करताना मुख्यमंत्री सरमा यांनी सिलीगुडी कॉरिडॉरचा (चिकन नेक) उल्लेख केला. हा अरुंद भूभाग आसाम व ईशान्य भारताला उर्वरित भारताशी जोडतो. या भागाच्या दोन्ही बाजूंना राहणारे अनेक लोक हिंदू नसून, कालांतराने बांगलादेशातून येऊन स्थायिक झालेले असल्याचा दावा त्यांनी केला. जर भारत आणि बांगलादेशमध्ये युद्ध झाले, तर अशा लोकांची निष्ठा कुणाकडे असेल? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला, कारण त्यांच्या अनेक नातेवाईकांचे वास्तव्य अजूनही सीमापार असल्याचे त्यांनी सांगितले.
एकतेचे आवाहन आणि अंतर्गत मतभेदांवर इशारा
भाषणाच्या शेवटी मुख्यमंत्री सरमा यांनी एकतेचे आवाहन केले आणि पक्षातील तसेच समाजातील अंतर्गत मतभेदांबाबत इशारा दिला. त्यांनी अप्रत्यक्षपणे कार्बी आंगलाँगमधील स्थानिक कार्बी आदिवासी आणि तेथे स्थायिक झालेल्या बिहारी हिंदूंमधील तणावाचा उल्लेख केला. ते म्हणाले की, “जोपर्यंत आम्ही जिवंत आहोत, तोपर्यंत प्रत्येक निवडणूक ही एक संस्कृतींचा लढा असेल. हा लढा आपल्या समाजाचे रक्षण करण्यासाठी आणि ‘जाती’ला जिवंत ठेवण्यासाठी लढला जाईल.”







