भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शेहजाद पूनावाला यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांच्या ऑपरेशन सिंदूर आणि भारतीय हवाई दलाबाबतच्या वक्तव्यांवर तीव्र टीका करत म्हटले की, “कॉंग्रेसला भारतीय सशस्त्र दलांचा तिरस्कार आहे.”
मंगळवारी भारतीय जनता पक्षाने (भाजप) पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्यांवर जोरदार हल्ला चढवत सांगितले की, भारतीय लष्कराचा अपमान करणे हीच कॉंग्रेसची ओळख बनली आहे.
पृथ्वीराज चव्हाण यांनी याआधी एवढ्या मोठ्या प्रमाणावर सैन्य ठेवण्याची गरज काय, असा सवाल उपस्थित केला होता. भविष्यातील युद्धे हवाई मार्गाने लढली जातील, असेही त्यांनी म्हटले होते.
ऑपरेशन सिंदूरवरून मोठा वाद
मंगळवारीच चव्हाण यांच्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला. त्यांनी दावा केला की, ऑपरेशन सिंदूरच्या पहिल्याच दिवशी देशाचा पूर्ण पराभव झाला,” तसेच हवाई दल पूर्णपणे जमिनीवरच होते आणि एकही विमान उडाले नाही,” असा आरोप त्यांनी केला.
या वक्तव्यांवर प्रतिक्रिया देताना भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शेहजाद पूनावाला यांनी एक्स वर लिहिले, कॉंग्रेसला भारतीय सशस्त्र दलांचा तिरस्कार आहे. सेनेचा अपमान करणे हीच कॉंग्रेसची ओळख आहे.”
हे ही वाचा:
सिडनीत गोळीबार करणारा साजिद हैदराबादहून स्थलांतरित झालेला आणि…
आवाज कहाँ तक जानी चाहिए? लाहौर तक!
मथुरा अपघातात आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू
सैन्याच्या आकारावर प्रश्नचिन्ह
चव्हाण यांनी पुढे म्हटले होते, अलीकडे ऑपरेशन सिंदूरदरम्यान आपण पाहिले की, जमिनीवर सैन्याची एक किलोमीटरही हालचाल झाली नाही. दोन-तीन दिवस जे काही घडले ते पूर्णपणे हवाई आणि क्षेपणास्त्र युद्ध होते. भविष्यातही युद्धे अशाच प्रकारे लढली जातील. अशा परिस्थितीत १२ लाख सैनिकांचे सैन्य ठेवण्याची खरोखर गरज आहे का, की त्यांना इतर कामांसाठी वापरता येईल?”
असे त्यांनी वृत्तसंस्था एएनआयला दिलेल्या मुलाखतीत म्हटले.
लढाऊ विमानांबाबतच्या दाव्यांवर भारताची भूमिका
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारतीय लढाऊ विमाने पाडली गेल्याचे दावे संरक्षण अटॅशेच्या एका वक्तव्यांनंतर समोर आले होते. मात्र भारत सरकारने इंडोनेशियातील एका सेमिनारमध्ये करण्यात आलेल्या सादरीकरणाबाबतचे दावे फेटाळून लावले, आणि हे वक्तव्य “संदर्भाबाहेर घेतले गेले असून, सादरीकरणाच्या मूळ उद्देशाचे चुकीचे चित्रण केले जात आहे,” असे स्पष्ट केले.
ऑपरेशन सिंदूरची पार्श्वभूमी
२२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ जणांचा मृत्यू झाल्यानंतर, ७ मे रोजी भारताने ऑपरेशन सिंदूर सुरू केले. या कारवाईत भारतीय सशस्त्र दलांनी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तोयबा यांसारख्या दहशतवादी संघटनांच्या पायाभूत सुविधांवर हल्ले केले. या मोहिमेत १०० हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
लष्करी अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया
ऑपरेशननंतर एका आठवड्यात भारतीय लढाऊ विमाने पाडल्याच्या बातम्या समोर आल्यानंतर, भारतीय लष्कराच्या अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली.
त्यावेळी एअर मार्शल ए. के. भारती यांनी या दाव्यांना दुजोरा किंवा खंडन न करता म्हटले, कोणत्याही युद्ध परिस्थितीत नुकसान होतच असते. खरा प्रश्न हा आहे की, आपण आपले उद्दिष्ट साध्य केले का? आणि त्याचे उत्तर ठामपणे ‘होय’ आहे. सध्या आम्ही तपशील देऊ शकत नाही, कारण आम्ही अजूनही युद्ध परिस्थितीत आहोत. मात्र आमचे सर्व वैमानिक सुरक्षित परतले आहेत.
पाकिस्तानी विमान पाडल्याचा दावा
याआधी ऑक्टोबर महिन्यात, हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंह यांनी पुन्हा एकदा सांगितले की, ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने पाकिस्तानची पाच लढाऊ विमाने पाडली.
त्यांनी सांगितले की, ही विमाने एफ-१६ आणि जेएफ-१७ श्रेणीतील होती. भारताने पाकिस्तानमधील अनेक हवाई तळ, रडार प्रणाली, कमांड आणि कंट्रोल सेंटर्स, हँगर्स आणि धावपट्ट्यांवर हल्ले करून मोठे नुकसान केले, असेही त्यांनी स्पष्ट केले.
“आमच्याकडे एका C-130 श्रेणीच्या विमानाचे स्पष्ट पुरावे आहेत, तसेच किमान ४ ते ५ लढाऊ विमाने – बहुधा एफ-१६ – पाडल्याचे संकेत आहेत. याशिवाय ३०० किमीपेक्षा जास्त अंतरावरील एका दीर्घ-पल्ल्याच्या हल्ल्याचेही ठोस पुरावे आमच्याकडे आहेत, जो AEW&C किंवा SIGINT विमानावर करण्यात आला असावा,” असे एअर चीफ मार्शल सिंह यांनी एएनआयला सांगितले.







