भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए ) काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरुर यांचा बालेकिल्ला मानला जाणाऱ्या थिरुअनंतरपूरम महानगरपालिका निवडणुकीत ऐतिहासिक विजय मिळवला. केरळमधील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निकालाने राज्यातील राजकारणातील अनेक मुद्दे केंद्रस्थानी आले आहेत. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीची वारे कोणत्या दिशेने वाहणार याची चर्चा सुरू झाली आहे. भाजपासाठी या निवडणुका महत्त्वाच्या मानल्या जात होत्या.
काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धोरणांवर शशी थरुर यांनी स्तुतीसुमने उधळली होती. यावर काँग्रेसमधील नेत्यांनी थरुर यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. मात्र, आता प्रत्यक्ष त्यांच्या मतदारसंघातील महानगरपालिका निवडणुकीत भाजपने विजय मिळल्याने हा निकाल राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.
एर्नाकुलम जिल्ह्यातील त्रिपूनिथुरा नगरपालिकेत भाजप नेतृत्त्वाखालील एनडीएने काठावरचे बहुमत मिळवले आहे. ५३ सदस्यीय परिषदेत त्यांनी २१ जागा जिंकल्या. एलडीएफ २० जागांसह दुसऱ्या स्थानावर तर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त लोकशाही आघाडी १६ जागांसह तिसऱ्या स्थानावर आली. भाजपने प्रथमच त्रिपूनिथुरा नगर परिषदेवर सत्ता मिळवली आहे. त्रिपूनिथुरामध्ये अनेक दशकांपासून एलडीएफ आणि यूडीएफमध्ये आलटून-पालटून सत्ता येत होती.
एर्नाकुलम जिल्ह्यातील मुनंबम परिसर, ज्याठिकाणी एनडीएचा ऐतिहासिक विजय हा भाजपसाठी अधिक महत्त्वाचा ठरला आहे. भाजपाचे केरळ महासचिव अनूप एंटनी जोसेफ यांनी मुनंबम वार्डातील एनडीएचा विजय ऐतिहासिक असल्याचं म्हटले. मुनंबममध्ये जवळपास ५०० ईसाई कुटुंबांवर वक्फ बोर्डाच्या कथित दाव्यानंतर त्यांच्या घरावर संकट उभं राहिले होते असा दावा भाजपाने केला. मोदी सरकार आणि भाजपाने या मुद्द्यावर उघडपणे या लोकांना साथ दिली. त्याचा परिणाम स्थानिक निवडणुकीत लोकांनी भाजपाला पाठिंबा दिला असं एंटनी यांनी म्हटलं आहे.
हे ही वाचा:
कोलकाता स्टेडियममधील गोंधळाची होणार चौकशी! ममता यांनी मागितली माफी
स्टेडियममधून मेस्सी लवकर निघून गेल्याने चाहत्यांचा संताप! खुर्च्या, बाटल्या फेकत निषेध
उत्तर प्रदेशातील ‘जामतारा’; मथुरेतील चार गावांमधून ४२ जणांना अटक
तिरुप्परनकुंद्रम कार्तिक दीप प्रज्वलनाला ‘उबाठा’चा का आहे विरोध?
काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी या निकालांना केरळच्या लोकशाहीसाठी “आश्चर्यकारक निकालांचा” दिवस असे वर्णन केले. त्यांनी यूडीएफचे एकूण कामगिरीबद्दल अभिनंदन केले. त्याचबरोबर तिरुवनंतपुरम कॉर्पोरेशनमधील भाजपच्या ऐतिहासिक विजयाची नोंद घेत प्रतिस्पर्धी राजकीय पक्षांच्या बाजूने निकाल लागले तरीही, लोकांच्या आदेशाचा आदर करणे किती महत्त्वाचे आहे, असेही त्यांनी नमूद केले आहे.







