आज जाहीर झालेल्या प्राथमिक निकालांनुसार पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकांच्या निवडणुकीत महायुतीतील भारतीय जनता पार्टीने जोरदार कामगिरी करत स्पष्ट आघाडी घेतली आहे. या निकालांमुळे अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा राजकीय धक्का बसल्याचे चित्र आहे. पुणे महानगरपालिकेत एकूण १६५ जागांपैकी भाजप आणि त्याच्या सहयोगी पक्षांनी ८५ ते ९० जागांवर आघाडी मिळवली असून बहुमताचा ८३ चा आकडा सहज पार केला आहे. दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसला येथे ४० ते ४५ जागांवर समाधान मानावे लागले असून उर्वरित जागा काँग्रेस व इतर पक्षांकडे गेल्या आहेत.
हे ही वाचा :
वैभव सूर्यवंशीने अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये रचला इतिहास
टी-20 विश्वचषकापूर्वी पाकिस्तानला दिलासा, शाहीन आफ्रिदी नेट्समध्ये परतला
AI क्षेत्रामुळे आशियाई शेअर्समध्ये तेजी
ठाकरेंच्या सत्तेला सुरुंग, भाजप महायुती बहुमताकडे
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतही भाजपने प्रभावी कामगिरी करत १३९ पैकी ७५ ते ८० जागांवर आघाडी घेतली आहे. येथे बहुमताचा आकडा ७० असून भाजपने तो ठामपणे ओलांडला आहे. विशेष म्हणजे पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपचे ५ ते ७ नगरसेवक बिनविरोध निवडून आल्याने पक्षाच्या जागा संख्येत मोठी भर पडली.
राष्ट्रवादी काँग्रेसला येथे केवळ ३५ ते ४० जागांपर्यंत मजल मारता आली. राजकीय विश्लेषकांच्या मते, शहरी मतदारांनी विकासकामे, पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा आणि प्रशासनातील स्थैर्य या मुद्द्यांना पसंती दिली. प्रचारादरम्यान अजित पवार यांनी भाजपवर कर्जबाजारीपणा आणि भ्रष्टाचाराचे आरोप केले होते, मात्र त्याचा मतदारांवर फारसा परिणाम झाला नाही. या निकालांमुळे पुणे–पिंपरी-चिंचवड या महत्त्वाच्या औद्योगिक आणि शैक्षणिक पट्ट्यात भाजपची पकड अधिक मजबूत झाली असून राष्ट्रवादी काँग्रेससाठी हे निकाल आत्मपरीक्षणाची गरज दर्शवणारे ठरत आहेत.
