राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केरळमधील शाळाशिक्षक सी. सदानंदन मास्टर यांना राज्यसभेसाठी नामांकन दिले. सी. सदानंदन मास्टर हे थ्रिसूर जिल्ह्यातील एका शाळेत शिक्षक आहेत. त्यांना “मास्टर” या नावाने ओळखले जाते.
सदानंदन मास्टर यांचे राज्यसभेत नामांकन केवळ त्यांच्या सार्वजनिक जीवन आणि शिक्षण क्षेत्रातील योगदानाचीच नव्हे, तर त्यांच्या वैयक्तिक संघर्षांचीही दखल आहे.
२५ जानेवारी १९९४ च्या रात्री, ३० व्या वर्षी, त्यांच्या मूळ गाव पेरिंचेरिकडे जाताना कम्युनिस्ट पार्टी मार्क्सवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. त्या राजकीय हिंसाचाराच्या घटनेत त्यांच्या दोन्ही पायांना कुऱ्हाडीने कापण्यात आले आणि त्यांना रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात टाकण्यात आले. हा त्यांना इशारा होता की, जो कोणी राजकीय पक्ष बदलण्याचा विचार करेल, त्याला असाच परिणाम भोगावा लागेल.
त्या रात्रीच्या आठवणी सांगताना त्यांनी एकदा नमूद केले होते की, “कोणालाच मदत करण्याची हिंमत झाली नाही. साधारण पंधरा मिनिटांनी पोलीस आले, आणि मगच मला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तोपर्यंत मी शुद्ध हरपली होती.”
हे ही वाचा:
‘एक राष्ट्र, एक निवडणूक’ संकल्पनेचा विचार करण्यास तयार
हरिद्वारमध्ये कावड्यांचा महापूर: १० लाख भाविकांनी भरले गंगाजल!
ज्येष्ठ तेलुगू चित्रपट अभिनेते कोटा श्रीनिवास राव यांचे हैदराबाद येथे निधन
या भयानक घटनेनंतरही त्यांनी हार मानली नाही. १९९९ मध्ये त्यांनी पुन्हा शिक्षण कार्यात परत येत श्री दुर्ग विलासम हायर सेकंडरी स्कूल, पेरमंगलममध्ये समाजशास्त्राचे अध्यापन सुरू केले. काळानुसार ते राजकारणात सक्रिय झाले आणि २०१६ व २०२१ मध्ये कूथुपरांबू मतदारसंघातून भाजप तर्फे निवडणूक लढवली.
आधी कम्युनिस्ट विचार मग आरएसएसकडे ओढा
तरुणपणात सदानंदन मास्टर कम्युनिस्ट विचारांकडे झुकलेले होते, जसे केरळमधील अनेक युवकांमध्ये दिसते. मात्र त्यांनी RSS व सांस्कृतिक राष्ट्रवादावर वाचल्यानंतर त्यांच्या विचारांमध्ये बदल झाला.
कवी अक्कित्थम यांच्या ‘भारता दर्शनंगल’ या लेखाने त्यांना खूप प्रभावित केले. त्यामुळेच त्यांनी १९८४ मध्ये, आपल्या कुटुंबाच्या डाव्या विचारसरणीच्या पार्श्वभूमी असूनही, RSS मध्ये प्रवेश केला. त्यांचे वडील सेवानिवृत्त शिक्षक आणि CPI(M) समर्थक होते, तसेच भाऊ देखील पक्षाच्या कामात सक्रिय होते.
आज सदानंदन मास्टर हे केरळ राज्य शिक्षक संघाचे उपाध्यक्ष आहेत. ते ‘देशीय अध्यापक वार्ता’ या मासिकाचे संपादन करतात आणि RSS संलग्न ‘भारतीय विचार केंद्रा’चे सक्रिय सदस्य आहेत. त्यांची पत्नी वनिता राणी ह्या देखील शिक्षिका आहेत, आणि त्यांची मुलगी यमुना भारती इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहे व ABVP मध्ये सक्रिय आहे.
एका अत्यंत क्रूर हल्ल्यातून बचावत राज्यसभेपर्यंत पोहचलेले सदानंदन मास्टर यांचे जीवन हे संघर्ष, आशा आणि परिवर्तनाचे प्रेरणादायी उदाहरण आहे.







