महाराष्ट्रातील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे काँग्रेसच्या प्रमुख नेत्यांबद्दल काही स्वप्न पाहात असतील, तर काहीही हरकत नाही. पण ते तसे स्वप्न पाहात नाहीत. तर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कोणते स्वप्न पाहात असतील, असा विचार करून त्या स्वप्नात ते रपेट मारून येतात. हर्षवर्धन सपकाळ यांना पुणे श्रमिक पत्रकार संघटनेच्या वतीने वार्तालापासाठी आमंत्रित केले होते. त्यात सपकाळांनी आपला हा स्वप्नकाळ सांगितला.
आपल्या पक्षाची महाराष्ट्रात काय स्थिती आहे, त्यासाठी आपण काय केले पाहिजे, त्यादृष्टीने कशी पावले टाकली पाहिजेत याची चिंता करण्यापेक्षा प्रतिस्पर्धी पक्षातील नेते कुठली स्वप्ने पाहात आहेत, ते कुठे नेतृत्व करणार आहेत, याच्याच विचारात सध्या सपकाळ अडकले आहेत. ते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ७५वा वाढदिवस झाल्यानंतर आता पंतप्रधान होण्याचे स्वप्न फडणवीसांना पडलेले आहे. सपकाळ म्हणतात की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मोदींच्या राजीनाम्याचे संकेत दिले आहेत. त्यानुसार आता पंतप्रधान होण्यासाठी फडणवीसांनी तयारी सुरू केली आहे.
सपकाळ यांनी खरे तर आपले नेते राहुल गांधी कसे पंतप्रधान बनतील याचा विचार करायचा सोडून फडणवीसांना कोणती स्वप्ने पडत आहेत, यात वेळ घालवण्याचे कारण काय? अर्थात, सपकाळ यांच्या अशा विधानांमुळे मनोरंजन नक्कीच होते. त्या माध्यमातून ते राहुल गांधींची परंपराच एकप्रकारे सुरू ठेवतात. असो. राहुल गांधी यांना पंतप्रधान करण्याचे आपले स्वप्न आहे, असे सपकाळ म्हणाले असते तर ते पटण्यासारखे होते पण ते त्यांच्या स्वप्नातही येत नसावे. त्यामुळेच फडणवीस पंतप्रधान झाले तर यावर त्यांचा निष्कारण काथ्याकूट सुरू आहे. महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा सुपडा साफ झाला. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष म्हणून सपकाळ यांच्याकडे जबाबदारी आलेली आहे, ती इमानेइतबारे पार पाडून आपल्या पक्षाची राज्यातील प्रतिमा उंचावण्याऐवजी पंतप्रधान म्हणून आपल्या विरोधी पक्षातील नेता देवेंद्र फडणवीस हे कसे प्रयत्न करत आहेत, याकडे त्यांचे अधिक लक्ष लागून राहिले आहे हे आश्चर्यजनक आहे.
यावेळी सपकाळ यांना प्रश्न विचारण्यात आला की, गेल्या काही वर्षांमध्ये लोकसभा, विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला मिळालेल्या अपयशामुळे काँग्रेस पक्ष खिळखिळा झाला का, तेव्हा ते म्हणाले की, ‘काँग्रेस पूर्वीपासूनच ‘मास बेस’ पक्ष होता. त्यामुळेच जे आले ते सत्तेच्या गादीवर बसले. मात्र, आता आम्ही काँग्रेसला ‘केडर बेस’ पक्ष करण्याचा प्रयत्न करीत आहोत. त्याशिवाय ‘भारत जोडो’च्या धर्तीवर आता ‘पक्ष जोडो’ मोहीम हातात घेणार आहोत.
अर्थातच सपकाळ यांनी महाराष्ट्रात आपल्या पक्षाची शून्यापासून सुरुवात करावी लागेल हे लक्षात घेतलेले दिसते. पण त्याकडे लक्ष देण्याऐवजी ते फडणवीसांना कोणते स्वप्न पडत आहे, त्या स्वप्नरंजनात वेळ घालवत आहेत. अर्थात, त्यांनी काय करावे हा त्यांचा प्रश्न आहे. मात्र अशीच वायफळ विधाने करून काँग्रेसची राज्यातील रया गेलेली आहे हे अनेक उदाहरणांवरून स्पष्ट झालेले आहे. त्या तुलनेत आपल्या कामावर, संघटनाबांधणीवर, पक्षवाढीवर लक्ष केंद्रित करण्याची फडणवीसांची कार्यपद्धती राहिलेली आहे. त्याचा फायदा त्यांना निवडणुकांत झालेला दिसला आहे. त्यामुळे सपकाळ यांनी फडणवीस पंतप्रधान होतील की नाही, याविषयीचा कल्पनाविष्कार रंगविण्यापेक्षा फडणवीसांप्रमाणे काम करण्याचा ध्यास घेतला तरी पुरे.
राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत आरक्षणासंदर्भात केलेले विधान सध्या बरेच चर्चेत आहे. त्यांना यासंदर्भात विचारण्यात आल्यावर ज्यांना गरज आहे, त्यांनाच आरक्षण मिळायला हवे, असे त्या म्हणाल्या. शिवाय, त्या म्हणाल्या की, माझे आईवडील शिकलेले होते, माझी मुले शिकली त्यामुळे आम्हाला आज अशा आरक्षणाची गरज नाही. विशेष म्हणजे मुलाखतकाराने उपस्थित श्रोत्यांना विचारले की, तुम्हाला आर्थिक निकषावर आरक्षण महत्त्वाचे वाटते की जातीच्या निकषावर. तेव्हा श्रोते म्हणाले की, आर्थिक निकषांवर. त्यावेळी ही अगदी आपल्याच मनातली भावना आहे, असेही सुप्रिया सुळे म्हणाल्या तसेच आपल्याला आज चांगली झोप लागेल अशी टिप्पणीही त्यांनी केली.
आज महाराष्ट्रात नेमका आरक्षणच्या मुद्द्यावर वेगवेगळी आंदोलने चाललेली दिसतात. त्यावेळी मात्र अशी भूमिका राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून व्यक्त केली गेल्याचे दिसत नाही. महाराष्ट्रातील जनतेतही अशीच भावना आहे की, आरक्षणाच्या मुद्द्यावरून लोकांमध्ये मतभेद निर्माण होऊन दरी निर्माण होऊ नये. ज्याला खरोखरच गरज आहे त्याला आरक्षण मिळावे, ज्यांना आरक्षण मिळाले आणि त्याआधारे त्यांचे जीवनमान सुधारले त्यांनी पुढे आरक्षणाचा आग्रह धरता कामा नये, हीदेखील लोकभावना आहे. सरसकट सगळ्या समाजाला आरक्षण द्या, आम्हाला मागास ठरवा यासाठी जो संघर्ष सुरू आहे, तो थांबला पाहिजे. पण याच्या नेमकी उलटी भूमिका या आंदोलनादरम्यान पवारांच्या पक्षाने घेतलेली आहे. मनोज जरांगे यांचे आंदोलन सुरू असताना सुप्रिया सुळे त्यांना भेटायला गेल्या होत्या. अशावेळी ही भूमिका सुप्रिया सुळे मांडत नाहीत. तेव्हा आरक्षण आंदोलनाच्या निमित्ताने सरकारची कोंडी होण्याची मजा लुटण्यात धन्यता मानली जाते. मुंबईत आंदोलकांमुळे झालेल्या कोंडीचा आनंद अनेक विरोधी पक्षांना झाला होता. तेव्हा ही सुप्रिया सुळेंनी घेतलेली भूमिका घेतली जायला हवी होती. पण कदाचित उपस्थित श्रोत्यांच्या टाळ्या मिळविण्यासाठी सुप्रिया सुळे मुलाखतीदरम्यान ते बोलल्या असाव्यात. नाहीतर यापुढे सुप्रिया सुळेंनी आरक्षणाच्या बाबत हीच भूमिका कायम ठेवली पाहिजे.
हे ही वाचा:
११ वर्षांपासून भारतात रहिवास करणाऱ्या दोन बांगलादेशी नागरिकांना अटक
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ‘जीएसटी बचत उत्सवाची घोषणा’
नोएडा विमानतळावरून लवकरच कमर्शियल उड्डाणे
“ऑपरेशन सुरू आहे, नंतर फोन करतो”, हुतात्मा जवान बलदेव चंदचे शेवटचे शब्द!
गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्याबद्दल केलेल्या अभद्र वक्तव्यानंतर अनेक ठिकाणी या पडळकर संस्कृतीला लगाम घातला जाणार का, असा सवाल विचारला गेला. तेव्हा आश्चर्य वाटल्यावाचून राहिले नाही. ही संस्कृती पडळकरांच्या या वक्तव्यानंतर निर्माण झालेली नाही. चार पाच वर्षांची ही संस्कृती आहे. या संस्कृतीला जन्माला कुणी घातले ? उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तेव्हापासून आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्य़ाकडे मुख्यमंत्रीपदाची सूत्रे आल्यावर अपमानजनक शेरेबाजी करण्याची परंपरा कायम राहिली. विधानभवनाच्या लॉबीत पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांचे कार्यकर्ते भिडले होते. त्याची सुरुवात विधिमंडळाच्या परिसरात आव्हाड यांनी पडळकर यांना उद्देशून मंगळसूत्र चोर, मंगळसूत्र चोर असे म्हटल्यानंतर झाली होती. विधिमंडळ परिसरात हे असे ओरडणे हा कोणत्या संस्कृतीचा भाग होता? जयंत पाटील यांनीही आपल्या एका भाषणात मंगळसूत्र चोर म्हणत उपस्थितांना गुदगुल्या केल्या होत्या. त्यामागे कोणती संस्कृती होती? खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यांबद्दल तर न बोललेलेच बरे. त्यांनी विविध पत्रकार परिषदांमध्ये जे शब्द वापरले आहेत, ते कोणत्या पत्रकाराला संस्कृतीचा नवा आविष्कार वाटले.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा त्यांच्या पत्नीबद्दल अपमानजनक विधाने करताना कोणती संस्कृती होती, मोदींना मारू अशी भाषा वापरणाऱ्या महाराष्ट्रातील काही उथळ नेत्यांच्या वर्तनात कोणत्या संस्कृतीचे प्रतिबिंब होते याचाही विचार केला गेला पाहिजे. जर राज्यातील ही वाचाळ संस्कृती बंद करायची असेल तर शरद पवारांनी फडणवीसांना फोन करण्याऐवजी अशा सगळ्याच पक्षातील नेत्याना फोन करून जाब विचारायला हरकत नाही. या सगळ्याच संस्कृतींना लगाम घालण्याची वेळ आली आहे. मीडियानेही याचे भान बाळगणे आवश्यक आहे. सकाळी होणाऱ्या पत्रकार परिषदेत अशा अनेक शब्दांचा मारा श्रोत्यांवर होत असतो ज्यावर मीडिया कोणत्याही संस्कृतीचे लेबल लावत नाही. मग फक्त पडळकर बोलले तर ती पडळकर संस्कृती कशी. मग ती राऊत संस्कृती, आव्हाड संस्कृतीही असली पाहिजे एवढेच.







