शिवसेना पक्ष किंवा राष्ट्रवादी नेमका फुटला कसा याबद्दल वेगवेगळ्या थिअरी मांडल्या जातात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पक्ष फोडला असेही सांगितले जाते. पण उद्धव ठाकरेंचा पक्ष आदित्य ठाकरेंना नेता बनविण्याच्या नादात फुटला, असा गौप्यस्फोट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वाहिनीवरील मुलाखतीत केला.
फडणवीस म्हणाले की, उद्धव ठाकरेंचा पक्ष सर्वात आधी कुणी फोडला तर तो शरद पवारांनी फोडला. १९९२मध्ये जेव्हा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जिवंत होते, तेव्हा ते काँग्रेसचे विरोधक होते. तेव्हा तो पक्ष फोडला. छगन भुजबळ यांच्यासमवेत १३ लोक बाहेर पडले. पण पुढे त्याच शरद पवारांसोबत जाऊन उद्धव ठाकरे मुख्यमंत्री बनले.
फडणवीसांनी सांगितले की, त्यांचा पक्ष असो की शरद पवारांचा त्यासाठी ते आमच्यावर खापर फोडू शकत नाहीत. एकनाथ शिंदे बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक होते. पण त्यांच्या लक्षात आले की, आदित्य ठाकरेंना नेता करण्यासाठी शिंदेंचे पंख छाटण्याचे काम सुरू आहे. त्यांच्या खात्याच्या मीटिंगही आदित्य घेत होते. एकीकडे काँग्रेससोबत जाऊन हिंदुत्वाचे नुकसान झाले आहे त्यातच आमचे पंखही छाटले जात आहेत हे लक्षात आल्यावर शिंदेंना वाटू लागले की, आता मी कृती केली नाही तर मी राजकारणातून संपुष्टात येईन. त्यावेळी त्यांनी बाहेर पडण्याचा निर्णय घेतला.
हे ही वाचा:
ज्या बंगल्यात जन्म झाला, त्याच बंगल्यात मंत्री म्हणून आले!
मुस्लिमांचे कैवारी बनण्यासाठी काँग्रेसचा हिंदूद्वेष!
भाजप आमदाराने ऑफिसचे केले जन सेवा केंद्रात रुपांतर
तरुण चुग यांनी राहुल गांधींना काय दिला टोला
अजित पवारांनाही कळलं खलनायक केलं जातंय
राष्ट्रवादीतही तेच झाले आहे, फडणवीस सांगत होते. ते म्हणाले, शरद पवारांचे उत्तराधिकारी म्हणून अजित पवारांकडे पाहिले जात होते. पण काही वर्षांत सुप्रिया सुळे यांना पुढे करण्यात आले. त्यामुळे अजित पवारांना खलनायक ठरविण्यात येऊ लागले. अजित पवारांसोबत आम्ही ८० तासांसाठी जे सरकार स्थापन केले त्यावेळी अजित पवारांना शरद पवारांनी पुढे केले आणि मागून खुर्ची काढून घेतली. नंतर शरद पवारांनी पक्षाचा राजीनामा दिला. तेव्हा अजित पवार पुढे आले, पण तेव्हा पुन्हा शरद पवारांनी त्यांच्या मागून खुर्ची काढून घेतली. त्यानंतर राजीनामा मागे घेत अजित पवारांना खलनायक केले. अजित पवारांनाही लक्षात आले की, यापुढे माझे राजकारण जाणार नाही, मला संपविले जात आहे. त्यावेळी ते बाहेर पडले. हे दोन्ही पक्ष जे फुटले ते त्यांच्या अंतर्गत महत्त्वाकांक्षांच्या संघर्षामुळे फुटले आहेत.
शिंदे पक्षाबाहेर पडले त्याबद्दल फडणवीस म्हणाले की, राजकारणात आम्ही गोट्या खेळायला आलेलो नाही. एकनाथ शिंदे बाहेर पडले तेव्हा आम्हाला त्यात संधी दिसली. त्यांच्या पक्षात फूट पाडण्यात आम्ही भूमिका बजावली नाही.
देवेंद्र फडणवीस यांनी काळी जादू केली. रेडा कापला, तंत्रमंत्रकेले असे उबाठा आरोप करतात, या प्रश्नावर ते म्हणाले की, मी मंत्रावर विश्वास ठेवतो. तंत्रावर नाही. जर पूजा करायची असेल तर एखाद्याच्या डोक्यातून वाईट विचार निघून जावेत असा प्रयत्न करता येईल. नाहीतर इलेक्शन कमिशनला अर्थच काय, तंत्र कमिशन लावले असते तर निवडणूक जिंकता आली असती. जो जास्त रेडे कापेल तो मुख्यमंत्री बनला असता, नाही का?







