आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकांच्या तयारीला सगळे पक्ष लागले असले तरी त्यात भारतीय जनता पक्षाने अधिक पद्धतशीरपणे तयारीला प्रारंभ केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सर्व योजनांना तळागाळापर्यंत पोहोचविण्यासाठी विस्तारकांची बैठक मुंबईत आयोजित करण्यात आली होती. विस्तारकांच्या प्रशिक्षण वर्गाचं आयोजन यानिमित्ताने करण्यात आले होते. त्यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विस्तारकांनी कशापद्धतीने काम केले पाहिजे हे सांगितले. तसेच आगामी निवडणुकांच्या दृष्टीने कशाप्रकारे मेहनत घेतली पाहिजे याविषयीही त्यांनी मार्गदर्शन केले.
फडणवीस म्हणाले की, राज्यात आपल्यासोबत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे मात्र त्यात भाजपा हाच बॉस आहे. त्यामुळे युतीतील सर्व पक्षांच्या उमेदवारांना निवडून आणण्याची जबाबदारी आपली आहे. फडणवीस यांनी केलेल्या या विधानावरून आता विरोधक या तीन पक्षात सारे काही आलबेल नाही, असा अर्थ काढण्याची शक्यता आहे. मात्र अद्याप तशी प्रतिक्रिया विरोधकांकडून आलेली नाही.
अनेक वेळा या तीन पक्षात कशी धुसफूस आहे, हे सांगण्याचा प्रयत्न विरोधकांकडून झालेला आहे. मात्र प्रत्यक्षात तसे काहीही नाही, हे नंतर स्पष्ट झालेले आहे. त्यामुळे फडणवीसांच्या या नव्या वक्तव्याचा आपल्याला काही फायदा होतो का, हे विरोधक पाहतील अशीच शक्यता आहे.
फडणवीसांनी सांगितले की, स्वतःसाठी १० तास देत असाल तर पक्षासाठी १४ तास द्या. गाव, तालुका, जिल्हा पातळीवरील लोकांशी संपर्क साधा. प्रभावित व्यक्तिंना संपर्क करा. पुढील एका वर्षाचा रोडमॅप तयार करण्याच्या सूचनाही फडणवीस यांनी विस्तारकांना केल्या. दादर येथील वसंत स्मृती सभागृहात विस्तराकांचा हा प्रशिक्षण वर्ग पार पडला.
आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी भाजपाकडून बारकाईने काम केले जात आहे. त्यामुळे तळागाळातील प्रत्येक घटकापर्यंत पोहोचण्याचे भाजपाने ठरविले आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हेदेखील यावेळी उपस्थित होते. फडणवीस म्हणाले की, पक्ष प्रथम आणि मी शेवटी आहे. इथे मी उभा आहे तो पक्षामुळेच. मी पक्ष सोडून उभा राहिलो तर माझंही डिपॉझिट जप्त होऊ शकते.
हे ही वाचा:
घुस के मारणारा अज्ञातांचा वॅगनर ग्रुप…
ट्रॅकवर दगड, लोखंडी रॉड ठेवून वंदे भारतला अपघात घडविण्याचा कट!
‘जयशंकर हे आधुनिक भारत-अमेरिकी संबंधांचे शिल्पकार’
गांधी जयंतीनिमित्त राज ठाकरे काय म्हणाले?
दरम्यान, बिहारमध्ये जातिनिहाय जनगणना करण्यात आली. त्याबद्दलही फडणवीस यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, ओबीसींबाबत बिहार सरकारने जी जनगणना केली आहे, त्याविषयी आम्ही माहिती घेऊ. त्याचे काय परिणाम होऊ शकतात, याचा अभ्यास करू, अर्थात, ओबीसींच्या सर्वेक्षणाबाबत सरकार सकारात्मक आहे. या जनगणनेबाबत अहवाल आल्यावर आपल्याकडे कसे सर्वेक्षण करायचे यावर मुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील.