उद्धव ठाकरेंचं मुंबईतलं काम सांगा, ३ हजार घ्या!

फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंची उडवली खिल्ली

उद्धव ठाकरेंचं मुंबईतलं काम सांगा, ३ हजार घ्या!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार शब्दांत टीका केली आहे. एका जाहीर सभेत बोलताना फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना थेट आव्हान देत, “मी उद्धव ठाकरेंना चॅलेंज करतो की त्यांनी त्यांच्या सभेत कोथळा, खंजीर, कावळे, निष्ठा, विष्ठा अशा शब्दांचा वापर न करता विकासावर एक तरी वाक्य बोलून दाखवावं किंवा सर्वसामान्य मराठी माणसासाठी त्यांनी केलेलं एखादं ठोस काम दाखवावं. ते केल्यास मी ३००० रुपये रोख द्यायला तयार आहे,” असे स्पष्टपणे सांगितले.

फडणवीस यांनी पुढे म्हटले की, राज्यातील राजकारणात भीती, अपशब्द आणि नकारात्मक प्रचार पसरवण्याऐवजी जनतेला विकासाची दिशा दाखवणे आवश्यक आहे. “भाजप सरकारने पायाभूत सुविधा, रस्ते, उद्योग, रोजगार, गुंतवणूक आणि शेतकरी कल्याणासाठी ठोस निर्णय घेतले आहेत. आमचं राजकारण कामगिरीवर आधारित आहे,” असा ठाम दावा त्यांनी केला.
हे ही वाचा :
कर्ज देण्याच्या नावाखाली फसवणूक : पाच जणांना अटक

इतिहासाने आपल्याला धडा शिकवला, पण भावी पिढ्यांनी तो विसरू नये!

पाकिस्तानच्या सिंधमध्ये जमिनीच्या वादावरून हिंदू शेतकऱ्याची हत्या

ममता बॅनर्जींविरुद्ध सीबीआय चौकशीची मागणी

 

उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळावर टीका करताना फडणवीस म्हणाले की, “त्यांच्या सरकारकडे स्पष्ट विकासात्मक दृष्टी नव्हती. मुंबईसह राज्यातील अनेक प्रकल्प रखडले. जनतेला दिलेली आश्वासने पूर्ण करण्यात अपयश आलं.” भाजप नेतृत्वाखालील सरकारने मात्र गतीने निर्णय घेत राज्याला विकासाच्या मार्गावर नेल्याचे त्यांनी नमूद केले.

या वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले आहे. भाजप समर्थकांकडून फडणवीस यांच्या भूमिकेचे स्वागत होत असून, त्यांनी विकास बनाम नकारात्मक राजकारण असा स्पष्ट भेद मांडल्याचे मत व्यक्त केले जात आहे. आगामी काळात या आव्हानावर उद्धव ठाकरे काय भूमिका घेतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version