उबाठा गटाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बबनराव घोलप, उबाठा माजी जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांच्यासह नाशिक शहर व जिल्ह्यातील शेकडो कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांनी मंगळवारी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. भाजपा प्रदेशाध्यक्ष व महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, भाजपा प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी पक्षात प्रवेश केलेल्या सर्वांचे स्वागत केले. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या पुढाकाराने हे पक्षप्रवेश झाले. या पक्ष प्रवेशामुळे नाशिकमध्ये भाजपची ताकद आणखी वाढणार आहे. माजी महापौर अशोक मुर्तडक, नयना घोलप यांनीही भाजपामध्ये प्रवेश केला.
यावेळी बावनकुळे म्हणाले, भाजपामध्ये प्रत्येक प्रवेश हा विकासाकरिता होत असतो. कोणत्याही अपेक्षा न ठेवता केवळ नाशिकच्या विकासासाठी या सर्वांनी भाजपाला साथ दिली आहे. नाशिक जिल्हा परिवर्तनासाठी हे प्रवेश अत्यंत महत्वाचे आहेत. प्रवेश केलेल्या सर्वांच्या साथीने आगामी निवडणुकांमध्ये भाजपाला ५१ टक्क्यांच्यावर मते मिळवून देण्यासाठी झटून काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. प्रवेश केलेल्या प्रत्येकाचा मानसन्मान राखला जाईल अशी ग्वाहीही त्यांनी दिली. उद्या किंवा परवा हा पक्षप्रवेश होणार होता मात्र आजचा मंगळवारचा दिवस शुभ असल्याने मंत्री गिरीश महाजन यांनी आज हा पक्षप्रवेश ठेवला असे त्यांनी स्पष्ट केले.
रविंद्र चव्हाण म्हणाले, प्रवेश केलेल्यांच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. भाजपाची विचारधारा तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वांनी एक परिवाराप्रमाणे काम करायचे आहे. आपला पक्ष मोठा करणे त्याचा प्रसार करणे म्हणजे पक्षाप्रति प्रामाणिक असणे असते. आगामी नाशिक महापालिका निवडणुकीत अबकी बार १०० पार चे लक्ष्य असणार आहे. तसेच उत्तर महाराष्ट्रातील सर्व महापालिकांमध्ये भाजपाची सत्ता आणणे आणि इतर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत जास्तीत जास्त संख्येने भाजपा उमेदवार निवडणून देणे हे उद्दिष्ट असणार आहे असे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितले.
भाजपात प्रवेश करणारे बडगुजर म्हणाले, १८ वर्ष काम करूनही उबाठा गटात माझा अनादर झाल्याने मी भाजपामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. आपला अनादर करणाऱ्यांना महापालिका निवडणुकीत आपली ताकद दाखवून देऊ असेही ते म्हणाले. आगामी निवडणुकीत भाजपाची ताकद दाखवून देऊ असे बबनराव घोलप यांनी सांगितले.
हे ही वाचा :
भारतातून इराणला होणारी तांदळाची निर्यात थांबली, सुक्या मेव्याचे दरही वाढले!
हा ‘जॅकपॉट’ भारताला कुठच्या कुठे नेईल!
जामनगरमधील बेकायदेशीर दर्ग्यात स्वीमिंग पूल, महागडे बाथटब, अत्याधुनिक सोयीसुविधा
बेंगळुरू चेंगराचेंगरी : हायकोर्टाने दिले महत्वपूर्ण निर्देश !
दरम्यान, भाजपामध्ये प्रवेश केलेल्यांमध्ये नाशिकचे माजी नगरसेवक अशोक सातभाई, माजी नगरसेविका हर्षा बडगुजर, वंदना बिरारी, शीतल भामरे, माजी सभागृह नेते दिलीप दातीर तसेच यावल तालुक्यातील ( जिल्हा जळगाव ) प्रभाकर सोनावणे, विनोदकुमार पाटील, आर. जी. पाटील, अनील पाटील, आरती पाटील, लताबाई पाटील आदींचा समावेश आहे. तसेच पुसद विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवलेल्या मनसेचे अश्वीन जयस्वाल, छत्रपती संभाजीनगरचे भगवान पवार, उद्योजक मनोज पवार आदींनीही भाजपामध्ये प्रवेश केला.







