चक्क भाजपामधील एका नेत्याने भारतमाता की जय म्हणणार नाही, असे म्हटल्यामुळे खळबळ उडाली असून अशा नेत्याचे पक्षात काय काम, असा सवाल विचारत सोशल मीडियात संताप व्यक्त होत आहे. हाजी अराफत शेख असे या भाजपाच्या नेत्याचे नाव असून सार्वजनिक कार्यक्रमात त्यांनी भारत माता की जय वैयक्तिक कारणामुळे म्हणू शकत नाही, असे सांगितल्याचा व्हीडिओ व्हायरल झाला आहे. त्यांच्या या विधानाचा सोशल मीडियात खरपूस समाचार घेण्यात आला.
एका कार्यक्रमात भाजप- महायुतीचे उमेदवार हाजी अरफत शेख हे लोक “भारत माता की जय” अशा घोषणा देत असताना केवळ उभे होते. त्यांनी “भारत माता की जय” म्हणण्याचे टाळले. यामुळे ते आता टीकेचे धनी बनले आहेत. सोशल मीडियावर याचा व्हिडीओ व्हायरल झाला असून अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी त्यांचा चांगलाच खरपूस समाचार घेतला आहे. तसेच भाजपालाही लक्ष्य करण्यात आले आहे. अरफत यांनी अशा घोषणा देण्यास नकार दिला. “आपण देशाचा आदर करतो पण, वैयक्तिक कारणांमुळे घोषणा देत नाहीत,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिल्याचा माध्यमांनी दावा केला आहे. मात्र, या घटनेमुळे राजकीय वर्तुळात आणि सोशल मीडियावर वादविवाद सुरू झाला आहे.
हे ही वाचा:
जीडीपी वाढीचा परिणाम शेअर बाजारावर; सेन्सेक्स, निफ्टीने गाठला नवा उच्चांक
“२००९ च्या उठावात भारताचा हात होता” बांगलादेशचा गंभीर आरोप
संसदेच्या हिवाळी अधिवेशनात १३ विधेयके ठरणार महत्त्वाची
हाजी अरफत शेख यांच्या या कृतीनंतर संतप्त प्रतिक्रिया देखील उमटत असून काहींनी म्हटले आहे की, जर “भारत माता की जय” म्हणल्याने तुमच्या वैयक्तिक भावना दुखावल्या जात असतील, तर तुम्ही विधानसभेत भारत मातेसाठी कसे लढाल? अशा घोषणा या धार्मिक नाहीत तर निष्ठेबद्दल आहेत. याशिवाय काहींनी म्हटले आहे की, हिंदुत्व आघाडीच्या नावाखाली मते हवी आहेत, पण तुम्हाला सर्वस्व देणाऱ्या मातृभूमीसाठी सहा शब्दही उच्चारता येत नाहीत का? जे अभिमानाने “भारत माता की जय” म्हणू शकतात त्यांनाच मतदान करा, असे आवाहनही काही वापरकर्त्यांनी केले आहे.







