दिल्ली विद्यापीठातील (DUSU) २०२४ मध्ये NSUI ला मिळालेला विजय हा एक अपवाद होता, एका वर्षाच्या आतच अभाविपचा प्रचंड विजय या निवडणुकीत झाला. विशेषतः, हैदराबाद केंद्रीय विद्यापीठातील (HCU) निवडणुकीत NSUI ला ‘NOTA’ (None of the Above) पेक्षा कमी मते मिळणे हे NSUI सारखी राजकीय विद्यार्थी संघटना विद्यार्थ्यांच्या मनातून साफ उतरल्याचे द्योतक आहे.
अभाविपने स्थापनेपासूनच राष्ट्रीय, शैक्षणिक व सामाजिक मुद्द्यांवर काम करण्यास सुरुवात केली. प्रा. यशवंतराव केळकर, प्रा. बाळासाहेब आपटे, मदनदास देवी या व अशा अनेक प्रमुख कार्यकर्त्यांच्या नेतृत्व व मार्गदर्शनात संघटनेचा केवळ मोठ्या शहरातच नव्हे तर ग्रामीण भागातही विस्तार झाला.
इंदिरा गांधींच्या नेतृत्वातील कॉँग्रेस सरकारने देशावर लादलेल्या आणीबाणी विरोधात अभाविपने लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी दिलेला लढा महत्वपूर्ण आहे. ‘पढाई के साथ लढाई’ हा नारा देऊन देशासाठी आपल्या वैयक्तिक हिताकडे लक्ष न देता हजारो तरुण स्वातंत्र्य आणि इतर मूलभूत अधिकारांचा संकोच करणाऱ्या दमनकारी आणीबाणीविरोधात रस्त्यावर उतरले.
यशवंतराव केळकर, बाळासाहेब आपटे यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांना तुरुंगात डांबण्यात आले. परंतु तेवढ्याच शक्तीने लोकशाहीच्या रक्षणासाठी कार्यकर्त्यांनी लढा दिला आणि इंदिरा गांधींना आणीबाणी मागे घेऊन निवडणुका घोषित कराव्या लागल्या. निवडणुकीनंतर मात्र अभाविपने पक्षीय राजकारणात न अडकता आपण सत्ता नाही तर व्यवस्था परिवर्तन करणारे आहोत हे सांगून आपल्या नियमित कामास सुरुवात केली. हेच अभाविपचे एक अनोखे वैशिष्ट्य म्हणून इतिहासात नोंदवले गेले आहे. आज, ३.२ दशलक्षाहून अधिक सदस्य असलेली, सातत्यपूर्ण विद्यार्थी वर्ग आणि समाजात काम करणारी ही संघटना, जगातील सर्वात मोठी विद्यार्थी संघटना म्हणून ओळखली जाते.
अभाविपचा बालेकिल्ला
गेल्या दहा वर्षांत दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघटना (DUSU) निवडणुकांमध्ये अभाविपने सातत्यपूर्ण वर्चस्व राखले आहे. २०१५ मध्ये अभाविपने अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव आणि सहसचिव या चारही प्रमुख पदांवर विजय मिळवून ‘क्लीन स्वीप’ केला. त्यानंतर सातत्याने तीन-तीन प्रमुख पदे जिंकून आपले वर्चस्व कायम राखले आहे.
NSUI ने २०२४ मध्ये सात वर्षांच्या अंतराने अध्यक्षपद जिंकून एक मोठा विजय मिळवला होता. मात्र, हा विजय अल्पायुषी ठरला. २०२५ च्या निवडणुकीत अभाविपने आर्यन मान यांच्या नेतृत्वाखाली अध्यक्षपद पुन्हा मिळवले आणि एकूण तीन प्रमुख पदे जिंकली. विशेषतः, २०२४ मधील अध्यक्षपदासाठी विजयाचे मताधिक्य केवळ १,३४३ होते, तर २०२५ मध्ये ते १६,००० पेक्षा जास्त होते. या वाढलेल्या मताधिक्याने विद्यार्थ्यांचा कल कोणत्या दिशेने झुकला आहे, हे स्पष्टपणे दर्शवले.
| निवडणूक वर्ष | अध्यक्षपदाचा विजेता | विजयी पक्ष | एबीव्हीपीने जिंकलेली पदे (एकूण ४) |
|---|---|---|---|
| २०१२ | अरुण हुडा | NSUI | १ |
| २०१३ | अमन अवाना | ABVP | २ |
| २०१४ | मोहित नागर | ABVP | २ |
| २०१५ | सत्येंद्र अवाना | ABVP | ४ |
| २०१६ | अमित तंवर | ABVP | ३ |
| २०१७ | रॉकी तुशीर | NSUI | १ |
| २०१८ | अंकित बैसोया | ABVP | ३ |
| २०१९ | अक्षत दहिया | ABVP | ३ |
| २०२३ | तुषार ढेधा | ABVP | ३ |
| २०२४ | रोनक खत्री | NSUI | १ |
| २०२५ | आर्यन मान | ABVP | ३ |
हैदराबाद केंद्रीय विद्यापीठाची निवडणूक ही अभाविपच्या वाढत्या प्रभावाचे आणखी एक महत्त्वाचे उदाहरण आहे. HCU हे डाव्या विद्यार्थी संघटनांचे केंद्र मानले जाते. मात्र, २०२५ मध्ये एबीव्हीपीने सर्व सहा पदे (अध्यक्ष, उपाध्यक्ष, सरचिटणीस, सहसचिव, सांस्कृतिक सचिव आणि क्रीडा सचिव) जिंकून सात वर्षांच्या कालावधीनंतर मोठा विजय संपादन केला.
या विजयाचे सर्वात उल्लेखनीय वैशिष्ट्य म्हणजे तेलंगणात सत्ताधारी असलेल्या काँग्रेसशी संलग्न असलेल्या NSUI ला NOTA (None of the Above) पेक्षाही कमी मते मिळाली, अभाविपने या विजयाला ‘राष्ट्रवादासाठी विद्यार्थ्यांची बांधिलकी आणि विभाजनकारी राजकारणाला आव्हान देण्यासाठी केलेला एकसंध प्रयत्न’ असे संबोधले. HCU मधील हा निकाल दर्शवतो की विद्यार्थी मतदारांमध्ये वैचारिक प्राधान्ये बदलत आहेत आणि ते डाव्यांच्या देशविघातक राजकारणाऐवजी राष्ट्रीय विचार आणि विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी केलेल्या प्रामाणिक प्रयत्नांना अधिक महत्त्व देत आहेत.
हे ही वाचा:
भारतात होणाऱ्या जागतिक पॅरा ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपवर पाकचा बहिष्कार!
बिहारमधील ७५ लाख महिलांच्या खात्यात जाणार प्रत्येकी १० हजार!
न्यूयॉर्कमध्ये झळकतायत “Remember October 7” लिहिलेले होर्डिंग्ज! नेमके प्रकरण काय?
हिंसाचारानंतर लेहमध्ये कशी आहे परिस्थती?
इतर प्रमुख विजय
एबीव्हीपीने केवळ दिल्ली किंवा हैदराबादसारख्या मोठ्या विद्यापीठांमध्येच यश मिळवले नाही, तर देशाच्या इतर भागांमध्येही आपले वर्चस्व वाढवले आहे. प्रयागराज येथील अलाहाबाद केंद्रीय विद्यापीठात, जे पारंपरिकरित्या समाजवादी-डाव्या पक्षांचा बालेकिल्ला मानले जाते, तेथे एबीव्हीपीने २०१६ मध्ये अध्यक्षपद जिंकले.
जवाहरलाल नेहरू विद्यापीठ विद्यार्थी संघ निवडणुकीत (JNUSU) २०२५ मध्ये डाव्यांचे अनेक वर्षांचे एकतर्फी वर्चस्व मोडीत काढत अभाविपने सहसचिव पद जिंकले अभाविपच्या विजयामागील कारणे
ही संघटना एकाच वेळी दोन स्तरांवर प्रभावीपणे काम करते. पहिला स्तर म्हणजे विद्यार्थ्यांच्या दैनंदिन जीवनातील व्यावहारिक समस्यांवर लक्ष केंद्रित करणे. अभाविपचे उमेदवार मेट्रो पासमध्ये सवलत , महाविद्यालयांमध्ये वायफाय सुविधा आणि महिलांसाठी सुरक्षा आणि स्वतंत्र सुविधा यांसारख्या विद्यार्थ्यांच्या जिव्हाळ्याच्या मुद्द्यांवर बोलतात. या समस्या थेट विद्यार्थ्यांच्या हिताशी जोडलेल्या आहेत
दुसरा स्तर म्हणजे आपल्या मूलभूत वैचारिक आणि राष्ट्रीय भूमिकेवर अविचल राहणे. हैदराबादमधील अभाविपच्या विजयाला ‘राष्ट्रवादाचा आणि विभाजनकारी राजकारणा’ विरुद्धचा विजय म्हटले गेले आहे. अभाविपचे ‘ज्ञान, शील आणि एकता’ हे ब्रीदवाक्य अभाविपच्या विचारांना दर्शवते. डाव्या विद्यार्थी संघटना केवळ राष्ट्रीय विचारांचा आंधळा विरोध करतात आणि NSUI त्यांच्या राजकीय पक्षाच्या भूमिकांची री ओढते. पण त्यांना अभाविपसारखा मजबूत वैचारिक आधार नसतो. आजचा विद्यार्थी समुदाय ज्याला Gen Z असेही म्हटले गेले, तो डाव्यांच्या समाजात वर्गीकरण करणाऱ्या व राष्ट्रहितापेक्षा आंधळी पोथीनिष्ठा जपणाऱ्या विचारांना नाकारतो तसेच NSUI सारख्या कोणतेही ठोस वैचारिक अधिष्ठान नसलेल्या आणि आपल्या पालक राजकीय पक्षाच्या धोरणांची व नेत्याची भलामण करण्यात समाधान मानणाऱ्या विद्यार्थी संघटनेलाही नाकारतो. विद्यार्थ्याला त्याच्या दैनंदिन समस्यांचे निराकरण अपेक्षित असते. आपल्या राष्ट्राशी, त्याच्या मूल्यांशी व संस्कृतीशी भक्कम नाळ जोडून ठेवणे आजच्या विद्यार्थ्याला महत्वाचे वाटते. यामुळे विद्यार्थी अभाविपला केवळ एक राजकीय गट मानत नाहीत, तर आपली संघटना मानतात जी त्यांचे खऱ्या अर्थाने राष्ट्रीय व सामाजिक पटलावर प्रतिनिधित्व करते.
संघटनात्मक शक्ती आणि सातत्यपूर्ण सक्रियता
अभाविप मजबूत संघटन आणि सातत्यपूर्ण सक्रियता यासाठी ओळखली जाते. अभाविपचे कार्यकर्ते केवळ निवडणुकीच्या काळातच सक्रिय नसतात, तर वर्षभर विविध उपक्रम आयोजित करतात. ‘मिशन साहसी’ यांसारखे आत्मसंरक्षण प्रशिक्षण कार्यक्रम, ऋतुमती सारखा युवतींसाठी आवश्यक उपक्रम आणि कोविड-१९ साथीच्या काळात घरोघरी जाऊन तपासणी यांसारख्या सेवा उपक्रमांमुळे ते विद्यार्थ्यांमध्ये एक विश्वासार्ह आणि कायम विद्यार्थ्यांसाठी ‘उपलब्ध’ संघटना म्हणून अभाविपची ओळख आहे.







