भाजपचे पश्चिम बंगालमधील प्रदेशाध्यक्ष समीक भट्टाचार्य यांनी म्हटले आहे की विधानसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाने पराभूत केलेल्या तृणमूल काँग्रेसला आता पुन्हा सत्तेत येणे कठीण आहे. हे सांगताना त्यांनी काही उदाहरणे दिली आणि त्यात प्रसिद्ध अभिनेते अनुपम खेर यांचेही नाव त्यांनी घेतले. त्यामुळे त्यावर खुद्द अनुपम खेर यांनीही प्रतिक्रिया दिली.
सोमवारी झालेल्या निवडणुकीत भाजपने राज्यातील २९४ पैकी २०७ जागा जिंकल्यानंतर भट्टाचार्य यांनी मंगळवारी वृत्तसंस्था पीटीआयशी बोलताना हे वक्तव्य केले. ते म्हणाले की, “आकाश जमिनीवर कोसळू शकते, समुद्र आकाशापर्यंत जाऊ शकतो आणि अगदी अनुपम खेर यांच्या टक्कलावरही पुन्हा केस उगवू शकतात, पण तृणमूल काँग्रेसचे पुन्हा सत्तेत येणे कल्पनेपलीकडचे होते. ते शक्य नव्हते,” असे ते म्हणाले.
हे ही वाचा:
पाणीहाटीमध्ये भाजप कार्यकर्त्यांवर फेकले कच्चे बॉम्ब
होर्मुझ सामुद्रधुनीवरून अमेरिका-इराण संघर्ष तीव्र
‘ऑपरेशन सिंदूर’ शेवट नाही, तर सुरुवात!
दहशतवादाचा पराभव करण्याचा भारताचा निर्धार
२०११ पासून राज्यात सत्तेत असलेल्या तृणमूल काँग्रेसचा पराभव “अटळ” होता, असेही भट्टाचार्य म्हणाले. “अशक्य गोष्ट शक्य करण्याची ताकद कोणाकडेही नाही,” असे या वरिष्ठ भाजप नेत्याने सांगितले.
समीक भट्टाचार्य यांचे हे वक्तव्य अनुपम खेर यांच्यापर्यंत पोहोचल्यावर त्यांनी त्यावर प्रतिक्रिया देत भट्टाचार्य यांचा व्हीडिओ आपल्या एक्स हँडलवरून पोस्ट केला. त्यात ते म्हणतात की, मी तुमचे काय नुकसान केले आहे? माझ्या डोक्यावर केस यावेत अशी तुमची इच्छा का आहे? “सध्याच्या परिस्थितीत तर मी शंभर जन्मातही अशी इच्छा करणार नाही.”
भाजपने सोमवारी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीत २९४ पैकी २०७ जागा जिंकल्या. २०२१ च्या निवडणुकीत पक्षाला ७७ जागा मिळाल्या होत्या. भाजपला सुमारे ४५ टक्के मते मिळाली असून ९ मे रोजी पक्ष पहिल्यांदाच राज्यात सरकार स्थापन करणार आहे. माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला २०२१ मध्ये २१५ जागा मिळाल्या होत्या, मात्र यावेळी पक्ष फक्त ८० जागांवरच मर्यादित राहिला. पक्षाचा मतांचा टक्का ४० टक्के राहिला.
मात्र ममता बॅनर्जी यांनी राजीनामा देण्यास नकार दिला असून भाजपला मिळालेला जनादेश “लुटीचा परिणाम” असल्याचा दावा केला आहे. ममता म्हणतात की, “माझ्या राजीनाम्याचा प्रश्नच उद्भवत नाही, कारण आमचा पराभव जनतेच्या मतांमुळे नाही तर एका कटकारस्थानामुळे झाला आहे… मी हरले नाही; मी लोक भवन सोडणार नाही.
यावर भाजपाचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले, “हे हास्यास्पद आणि चिंताजनक दोन्ही आहे. चिंताजनक यासाठी की भारताची लोकशाही शांततापूर्ण सत्तांतरातील सन्मान आणि प्रतिष्ठेसाठी ओळखली जाते. स्वातंत्र्यानंतर अशी परिस्थिती कधीच निर्माण झाली नव्हती की सत्तांतराच्या काळात दोन पक्ष अशा प्रकारे अडकले. गेल्या ७५ वर्षांत भारताने या उल्लेखनीय लोकशाही परंपरेमुळे जागतिक स्तरावर मान्यता मिळवली आहे.”
