पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी (१५ ऑगस्ट) दिल्लीतील लाल किल्ल्यावर देशाचा ८०वा स्वातंत्र्यदिन सोहळा उत्साहात पार पडला. मात्र, या राष्ट्रीय सोहळ्याला काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दांडी मारली. सलग दुसऱ्या वर्षी दोन्ही प्रमुख काँग्रेस नेत्यांनी लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्यदिन सोहळ्याला गैरहजेरी लावल्याने चर्चांना उधाण आले आहे.
राहुल गांधी आणि खर्गे यांच्या अनुपस्थितीमागे बसण्याची व्यवस्था आणि इतर औपचारिक प्रोटोकॉल त्यांच्या पदाला अनुरूप नसल्याचे कारण असल्याचे बोलले जात आहे. राहुल गांधी यांना यंदाच्या कार्यक्रमासाठी निमंत्रण देण्यात आले होते. संरक्षण मंत्रालयाने त्यांची आसनव्यवस्था अधिकृत टेबल ऑफ प्रेसेडेन्सनुसार निश्चित केली जाणार असल्याचे स्पष्ट केले होते. राष्ट्रपती सचिवालयाच्या अधिकृत प्राधान्यक्रमानुसार लोकसभेतील विरोधी पक्षनेत्याचा दर्जा केंद्रीय कॅबिनेट मंत्र्याच्या समकक्ष आहे. त्यामुळे राहुल गांधी यांना औपचारिक राष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये त्यानुसार स्थान मिळणे अपेक्षित असते.
२०२४ मध्ये आसनव्यवस्थेवरून वाद
राहुल गांधी यांच्या आसनव्यवस्थेवरून यापूर्वीही वाद निर्माण झाला होता. २०२४ च्या स्वातंत्र्यदिन सोहळ्यात लोकसभेचे विरोधी पक्षनेते म्हणून कॅबिनेट मंत्रिपदाचा दर्जा असतानाही राहुल गांधी पाचव्या रांगेत बसले होते. काँग्रेसने या व्यवस्थेवर आक्षेप घेत सरकारवर विरोधी पक्षनेत्याच्या पदाचा अवमान केल्याचा आरोप केला होता. मात्र, संरक्षण मंत्रालयाने राहुल गांधी यांच्या आसनव्यवस्थेचे कारण स्पष्ट करताना ऑलिम्पिक पदकविजेत्यांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आल्यामुळे आसनरचनेत बदल करण्यात आल्याचे सांगितले होते. राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे यांनी २०२५ मध्येही लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्यदिन सोहळ्याला उपस्थिती लावली नव्हती. त्यामुळे यंदाची अनुपस्थिती सलग दुसऱ्या वर्षीची ठरली आहे.
हे ही वाचा:
महाराष्ट्राला बनवणार देशाच्या विकासाचे ‘ग्रोथ इंजिन’!
‘टीटीपी’मध्ये सामील होण्याचा प्लॅन? बंगळूरूमधून असफूल मलिकला अटक
मोदींचा ‘बांधणी फेटा’ चर्चेत; वस्त्रपरंपरेला अनोखी मानवंदना!
मोदी ठरले सलग सर्वाधिक स्वातंत्र्यदिनाचे भाषण करणारे गैर-काँग्रेसी पंतप्रधान!
राष्ट्रीय सोहळ्यांमधील आसनव्यवस्थेवरून काँग्रेस आणि सरकारमध्ये यापूर्वीही मतभेद झाले आहेत. २०२५ आणि २०२६च्या प्रजासत्ताक दिन सोहळ्यात राहुल गांधी आणि खरगे यांना तिसऱ्या रांगेत स्थान देण्यात आल्याचा काँग्रेसने आक्षेप घेतला होता. मात्र संरक्षण मंत्रालयाने या आसनव्यवस्था अधिकृत प्राधान्यक्रमानुसारच करण्यात आल्याचे स्पष्ट केले होते.
