राज्याचे अन्न व पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पक्षाच्या नाशिक येथील कार्यालयात ध्वजारोहण केले. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी जरांगे पाटील यांच्या आंदोलनावरती बोलताना सांगितले की, आंदोलन कुठेही करा पण ते नियमात करा. ओबीसी समाजामध्ये कोणी केलं तर सहन करणार नाही, असा इशारा देखील त्यांनी यावेळी दिला.
ध्वजारोहणासाठी राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाने मंत्र्यांची यादी जाहीर केली होती. या यादीनुसार गिरीश महाजनांना नाशिकमधल्या ध्वजारोहणाची जबाबदारी देण्यात आली होती. मात्र, छगन भुजबळांना नाशिकमध्ये ध्वजारोहण करण्याची इच्छा होती. त्यामुळे छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. छगन भुजबळ यांनी नाशिक येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात ध्वजारोहण केले.
नाराज असल्याच्या चर्चावर प्रतिक्रिया देताना त्यांनी म्हटले की, ठीक आहे, मी अनेक वर्ष नाशिकमध्ये ध्वजारोहण केले आहे. मला स्वतः ला इतर ठिकाणी जाणे शक्य होत नाही. ध्वजारोहण कुठेही करा, आपला झेंडा एकच आहे, आपण फक्त वंदन करा. वंदन कुठे करायचे त्यामुळे महत्व कमी होत नाही. झोपडपट्टीला जरी झेंडा लावला तरी तो आनंद आहे. आता तुम्ही हे विषय बंद करा, असे त्यांनी म्हटले.
मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावरही भाष्य
छगन भुजबळ म्हणाले की, त्याला कोण आडवं येत आहे. आंदोलन जालन्यात कर किंवा अंतरवाली सराटीत कर. आंदोलन मुंबईत कर नाहीतर दिल्लीत कर. पण आंदोलन नियमात करा. संविधानाचे दिलेले अधिकार आहे. उपोषण कर, भाषण कर पण नियमात कर. मात्र, कोणती कुरघोडी करू नये. मराठा समाजाला आरक्षण देता आले ते दिले, आणखी काय पाहिजे ? इतर कोणत्या समाजात गेलं तर कोणी सहन करणार नाही. ओबीसी समाजात कोणी शिरकाव करत असेल तर गप्प बसणार नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.







