भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा हे दोन दिवसाच्या केरळ दौऱ्यावर आहेत. एप्रिल-मे २०२१ मध्ये पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडूसह केरळमध्येही विधानसभा निवडणूका आहेत. त्यामुळे नड्डा यांचा हा केरळ दौरा भाजपाकडून राज्यात निवडणुकीचा शंखनाद करणारा ठरणार आहे.
केरळमध्ये गेली अनेक दशके डावे (एलडीएफ) आणि काँग्रेस (यूडीएफ) यांचे सरकार दर पाच वर्षांनी स्थापन होते आणि पडते. डाव्या आघाडीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष हा प्रमुख आहे तर भारतीय कम्युनिस्ट पक्ष आणि इतर छोटेछोटे डावे पक्ष या आघाडीत आहेत. काँग्रेस प्रणित यूडीएफमध्ये काँग्रेसखेरीज ऑल इंडिया मुस्लिम लीग (एआययूएमएल) आणि इतर छोटे पक्ष आहेत. काँग्रेस पक्षला केरळमध्ये ख्रिश्चन मते मोठ्या प्रमाणात मिळतात तर अर्थातच ऑल इंडिया मुस्लिम लीग (मोहम्मद अली जिन्ना यांच्या मुस्लिम लीगचा पुढचा अवतार). हा पक्ष मुसलमानांचा पक्ष म्हणून ओळखला जातो.
केरळमध्ये आजवर भाजपाचा एकही खासदार निवडून आलेला नाही. २०१६ च्या विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच भाजपाचा एक आमदार केरळ विधानसभेत निवडून आला. २०१६ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला १६% मतं मिळाली होती. परंतु केवळ एकच जागा जिंकता आली. भाजपाला या निवडणुकीत केरळमध्ये मोठ्या प्रमाणात विजय संपादन करण्याची आशा आहे.
त्यामुळे भाजपा अध्यक्षांचा हा दौरा केरळच्या निवडणुकीच्या मानाने महत्वाचा दौरा ठरणार आहे.







