महाराष्ट्रातील २०२६ च्या महापालिका व नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वाखालील महायुतीने निर्णायक वर्चस्व मिळवले आहे. उपलब्ध ट्रेंड आणि प्राथमिक निकालांनुसार राज्यातील एकूण २९ नागरी संस्थांपैकी २४ ठिकाणी महायुती आघाडीवर असून, बहुसंख्य ठिकाणी महापौरपदावर महायुतीचा उमेदवार विराजमान होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामध्ये भाजप २१ पेक्षा अधिक संस्थांमध्ये सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष ठरल्याचे चित्र दिसते.
राज्यातील आर्थिक व राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या मुंबई आणि पुणे या महानगरांमध्ये महायुतीने ठोस आघाडी घेतली आहे. मुंबई महानगरपालिकेत एकूण २२७ जागांपैकी बहुमतासाठी ११४ जागांची आवश्यकता असते. प्राथमिक निकालांनुसार भाजप–मित्रपक्षांनी बहुमताच्या दिशेने निर्णायक मजल मारली असून, सत्तास्थापनेसाठी आवश्यक आकड्यांच्या जवळ पोहोचल्याचे दिसते. पुण्यातही भाजप–महायुतीने स्पष्ट आघाडी घेत विरोधकांना पिछाडीवर टाकले आहे.
हे ही वाचा:
‘मुंबईच्या जनतेने केला उद्धव ठाकरे यांच्या माफिया सेनेचा वध’
भाजपची रणनीती आणि ठाकरे, पवार राजकीय ‘ब्रँड्स’चा वाजला बँड
मुंबईत महिला नेतृत्वाच्या विजयाचा झंझावात!
ट्रम्प यांना नोबेल पुरस्कार प्रदान होताच समितीने काय म्हटले?
याशिवाय ठाणे, नवी मुंबई, नागपूर, नाशिक यांसारख्या प्रमुख शहरांमध्येही महायुतीचा प्रभाव जाणवतो. अनेक ठिकाणी भाजप हा सर्वाधिक जागा मिळवणारा पक्ष ठरला असून, शिवसेना (शिंदे गट) व इतर मित्रपक्षांच्या साथीनं सत्तासमीकरण अधिक मजबूत झाले आहे. दुसरीकडे, काँग्रेस व अन्य विरोधी पक्षांना काही मोजक्या शहरांपुरतेच समाधान मानावे लागले आहे.
या निकालांमुळे राज्यातील नागरी स्वराज्य संस्थांमध्ये महायुतीची पकड अधिक घट्ट झाल्याचे स्पष्ट होते. शहरी विकास, पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा, वाहतूक आणि प्रशासनातील निर्णयांवर या विजयाचा मोठा प्रभाव पडण्याची शक्यता असून, आगामी राजकीय समीकरणांच्या दृष्टीनेही हा विजय महायुतीसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.







