तृणमूल कॉंग्रेसचे आमदार हुमायून कबीर यांनी मुर्शिदाबादमध्ये बाबरी माशिदिसारखी मशीद बांधणार असल्याचे घोषित केल्यापासून राजकीय वातावरण तापले आहे. त्यांच्या या घोषणेचा आणि तृणमूलचा संबंध नसल्याचे पक्षाने आधीच जाहीर केले असून ते वैयक्तिक मत असल्याचे म्हटले आहे. अशातच आता राज्याच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी कबीर यांच्यावर प्रचंड नाराज असल्याचे वृत्त समोर आले आहे.
आमदार हुमायून कबीर यांच्या मुर्शिदाबादमध्ये बाबरी मशिदीची प्रतिकृती बांधण्याच्या प्रस्तावावर ममता या प्रचंड नाराज आहेत, अशी माहिती समोर आली आहे. त्या आणि त्यांचा पक्ष मशिदीच्या हालचालीशी संबंध जोडणार नाही आणि हा संदेश आमदारांना कळवण्यात आला आहे, असे बोलले जात आहे. बुधवारी एका पत्रकार परिषदेत बंगालचे मंत्री ब्रात्य बसू म्हणाले की, “आमदार हुमायून कबीर यांच्याशी संबंधित मुद्द्यावर पक्ष नेतृत्वाकडून लक्ष घातले जात आहे. आमदार सतत त्यांचे मत बदलत आहेत. उद्या ते बहरामपूर येथील मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात उपस्थित राहतील अशी आमची अपेक्षा आहे.”
मतदार यादीच्या सुरू असलेल्या विशेष सघन पुनरावृत्तीच्या निषेधार्थ ममता बॅनर्जी गुरुवारी भारत- बांगलादेश सीमावर्ती जिल्ह्यात मुर्शिदाबाद येथे एक रॅली काढणार आहेत. भरतपूर मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे हुमायून कबीर यांना पक्षाने आमंत्रित केले आहे आणि ते या रॅलीत सामील होण्याची अपेक्षा आहे. यापूर्वी आमदाराने ६ डिसेंबर रोजी मुर्शिदाबादच्या बेलडांगा येथे बाबरी मशिदीच्या प्रतिकृतीची पायाभरणी करण्याची त्यांची योजना अधोरेखित केली.
हे ही वाचा..
कोलकाता विमानतळाच्या धावपट्टीजवळ मशिद? नेमकं प्रकरण काय?
लाचार पाकिस्तान! IMF च्या कर्जासाठी विकणार सरकारी विमान कंपनी
पार्थ पवार जमीन खरेदी प्रकरण: शीतल तेजवानीला अटक
मुख्यमंत्री फडणवीस आणि संजय राऊत यांची भेट
बंगालचे राज्यपाल आनंद बोस यांनी राज्य सरकारला प्रश्न विचारला आहे की, जर हुमायून कबीर यांच्या विधानांमुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असेल तर त्यांना अटक का केली जात नाही. यासंबंधीचे वृत्त ‘एनडीटीव्ही’ने दिले आहे. “मला क्षेत्रातील, गुप्तचर संस्थांकडून आणि स्थानिक नेत्यांकडून मिळालेल्या अहवालांवरून असे दिसून येते की, कोणीतरी मुद्दाम मुर्शिदाबादला समस्यांचे केंद्र बनवण्याचा प्रयत्न करत आहे. हे होऊ दिले जाणार नाही. केवळ प्रार्थनास्थळ बांधण्याचा विषय नाही. जर जातीय भावना भडकल्या तर राज्य आणि त्यांचे सरकार मौन दर्शक बनून राहणार नाही,” असे त्यांनी म्हटले आहे.







