रविवारी, १४ डिसेंबर २०२५ रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर आयोजित फुटबॉल दिग्गज लिओनेल मेस्सी याच्या कार्यक्रमात एक अनपेक्षित प्रसंग घडला. भाषणादरम्यान महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रेक्षकांकडून काही काळ हुर्यो उडवली गेली पण फडणवीसांनी तो प्रसंग एका वेगळ्या पद्धतीने हाताळला आणि त्याचे कौतुक झाले.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी वानखेडेवर उपस्थित मेस्सीच्या समोर “नमस्कार मुंबई” असे म्हणत भाषणाला सुरुवात करताच स्टेडियममध्ये जोरदार हुर्यो उडवली गेली. मात्र फडणवीसांनी तत्काळ भाषण थांबवत “गणपती बाप्पा” असा जयघोष केला. यानंतर प्रेक्षकांनीही त्यांच्यासोबत “मोरया” असा प्रतिसाद देत घोषणा सुरू केल्या आणि वातावरण बदलून गेले.
या घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत.
प्रेक्षकांना संबोधित करताना मुख्यमंत्री म्हणाले,
“खऱ्या अर्थाने ‘ग्रेटेस्ट ऑफ ऑल टाइम’ असलेल्या लिओनेल मेस्सी यांचे स्वागत करताना मला अत्यंत आनंद होत आहे. २०३४ मध्ये फुटबॉल मैदानावर वर्चस्व गाजवणाऱ्या आमच्या ६० मुलांना ते मार्गदर्शन करत आहेत, ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे.”
प्रोजेक्ट महादेव विषयी बोलताना ते म्हणाले, हा प्रकल्प आपल्या राज्यात फुटबॉलला केंद्रस्थानी आणण्यासाठी राबवला जात आहे.”
मेस्सींचे आभार मानताना त्यांनी पुढे म्हटले, आमच्या युवा आणि होतकरू खेळाडूंना प्रशिक्षण देऊन प्रेरणा दिल्याबद्दल धन्यवाद, मेस्सी. मला खात्री आहे की यापैकी एखादा खेळाडू भविष्यात फिफा वर्ल्ड कपमध्ये खेळताना दिसेल.”
हे ही वाचा:
सामान्य ग्राहकांना प्रीपेड मीटर नाहीत; स्मार्ट मीटरमुळे वीजबिलात लाभ
सिडनीतील बॉन्डी बीचवर ज्यूंच्या कार्यक्रमावर इस्लामी दहशतवादी हल्ला; १२ ठार
कौशल्य विकास, प्रशिक्षण योजनांची प्रभावी अंमलबजावणी
ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी नागरिकांचा सहभाग आवश्यक
प्रोजेक्ट महादेव म्हणजे काय?
प्रोजेक्ट महादेव हा महाराष्ट्रभरातील तरुण फुटबॉल प्रतिभेचा शोध घेणे, त्यांचे संगोपन करणे आणि प्रशिक्षण देणे या उद्देशाने राबवला जाणारा उपक्रम आहे. भारताचा आंतरराष्ट्रीय फुटबॉलमधील दर्जा उंचावणे, हा या प्रकल्पाचा दीर्घकालीन हेतू आहे.
या उपक्रमाच्या उद्घाटनावेळी एक विशेष आकर्षण म्हणजे लिओनेल मेस्सी यांच्याकडून १३ वर्षांखालील ६० फुटबॉलपटूंना ४५ मिनिटांचे प्रशिक्षण व मार्गदर्शन सत्र. हे खेळाडू महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांत घेण्यात आलेल्या चाचण्यांमधून निवडले गेले आहेत.







