पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी लोकसभेत ‘ऑपरेशन सिंदूर’ आणि पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर झालेल्या चर्चेला उत्तर देताना काँग्रेससह इतर विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आणि त्यांचे सगळे दावे फोल असल्याचे सिद्ध केले. त्यांनी केंद्र सरकारचा दावा स्पष्ट केला की, पाकिस्ताननेच भारतासमोर शस्त्रसंधीची याचना केली होती आणि कोणत्याही जागतिक नेत्याने भारताला ऑपरेशन सिंदूर थांबवण्यास सांगितले नव्हते. त्यांनी सांगितले की, भारताला १९३ देशांपैकी केवळ तीन देश वगळता सर्वांचा पाठिंबा मिळाला.
मोदी म्हणाले, “आम्ही पहिल्यापासून सांगत आलो होतो की आमची कारवाई ही युद्ध भडकेल या दिशेने नेणारी नव्हती. कोणत्याही आंतरराष्ट्रीय नेत्याने आम्हाला ऑपरेशन सिंदूर थांबवायला सांगितले नाही.”
ते पुढे म्हणाले, “९ मे रोजी अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वॅन्स यांनी मला फोन करण्याचा प्रयत्न केला. ते जवळपास एक तास प्रयत्न करत होते, पण मी सैन्य अधिकाऱ्यांसोबत बैठकीत व्यस्त होतो. जेव्हा मी त्यांना परत फोन केला, तेव्हा त्यांनी सांगितले की पाकिस्तान एक मोठा हल्ला करण्याची योजना आखत आहे. मी त्यांना उत्तर दिले की जर पाकिस्तानचे हेच उद्दिष्ट असेल, तर त्यांना त्याची मोठी किंमत मोजावी लागेल.”
“जर पाकिस्तानने हल्ला केला, तर आम्हीही मोठा हल्ला करून प्रत्युत्तर देऊ. मी सांगितलं होतं, ‘हम गोली का जवाब गोले से देंगे.’ १० मे रोजी आम्ही पाकिस्तानच्या लष्करी क्षमतेचा नाश केला. ही होती आमची कारवाई आणि आमचा संकल्प. आता पाकिस्तानलाही समजलं आहे की भारताचं प्रत्युत्तर प्रत्येक वेळी अधिक प्रखर असतं. भविष्यात जर अशी परिस्थिती उद्भवली, तर भारत कुठल्याही टोकाला जाऊ शकतो. मी या लोकशाहीच्या मंदिरात पुन्हा सांगतो – ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरू आहे.”
हे ही वाचा:
“गंभीर भडकला! पिच क्युरेटरला फटकारलं – ‘तू फक्त ग्राऊंडमन आहेस!’”
गाडी दोनदा पलटी झाली, पण पोलिसामुळे जोडप्याचा जीव वाचला…
भारत-अमेरिका व्यापार करार: अमेरिकेचे शिष्टमंडळ २५ ऑगस्ट रोजी भारत दौऱ्यावर!
डीआरडीओकडून ‘प्रलय’ क्षेपणास्त्राचे यशस्वी परीक्षण
पंतप्रधानांनी काँग्रेसवरही टीका करत म्हटले, “परराष्ट्र धोरणावर आणि पहलगाम हल्ल्यानंतर भारताला मिळालेल्या आंतरराष्ट्रीय पाठिंब्यावर बरंच बोलणं झालं. पण सत्य हे आहे की जगातील कोणत्याही देशाने भारताला स्वतःचा बचाव करण्यापासून रोखलं नाही. उलट १९३ देशांपैकी केवळ ३ देशांनी पाकिस्तानला पाठिंबा दिला.”
ते पुढे म्हणाले, “पाकिस्तान म्हणत होतं – ‘खूप मारलं, आता सहन होणार नाही.’ त्यांनी आमच्याकडे युद्ध थांबवण्याची विनंती केली.” पाकिस्तानच्या डीजीएमओने (Director General of Military Operations) भारतीय समकक्ष अधिकाऱ्याला काय सांगितलं याबद्दल मोदी म्हणाले की, “बस करो, बहुत मारा है”. युद्ध थांबवण्याची कळकळीची विनंती पाकिस्तानने केली होती.
पाकिस्तान काहीही करू शकला नाही
ऑपरेशन सिंदूरसंदर्भात पंतप्रधान मोदी म्हणाले, “पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानला भारताकडून मोठ्या प्रत्युत्तराची अपेक्षा होती. त्यांनी अण्वस्त्रांचा उल्लेख करत धमक्या दिल्या. पण ६-७ मेच्या रात्री आम्ही आमच्या पद्धतीने ऑपरेशन केलं आणि पाकिस्तान काहीच करू शकला नाही. केवळ २२ मिनिटांत आम्ही २२ एप्रिलच्या हल्ल्याचा बदला घेतला.”
अमेरिकन उपराष्ट्रपती वॅन्स यांना सुनावले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सांगितले की ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान ९ मेच्या रात्री ते लष्करी अधिकाऱ्यांसोबत बैठक घेत होते, तेव्हाच अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी वॅन्स यांचे अनेक मिस्ड कॉल आले होते. सुमारे चार मिस्ड कॉल्स पाहिल्यानंतर त्यांनी वॅन्स यांना परत फोन केला.
मोदी म्हणाले की, वॅन्स यांनी त्यांना सतर्क केलं की पाकिस्तान भारतावर एक मोठा हल्ला करण्याची योजना आखत आहे, यावर मोदींचं उत्तर होतं, “आमचं प्रत्युत्तर आणखी जबरदस्त असेल.”
ते म्हणाले, “ते जवळपास एक तास सतत फोन करत होते, पण मी आमच्या सशस्त्र दलांबरोबरच्या बैठकीत व्यस्त होतो, त्यामुळे मी कॉल घेऊ शकलो नाही. नंतर जेव्हा मी त्यांना परत फोन केला, तेव्हा त्यांनी मला थेट सांगितलं की पाकिस्तान एक मोठा हल्ला करण्याच्या तयारीत आहे. माझं उत्तर – कदाचित काहींना समजणार नाही – पण मी स्पष्टपणे सांगितलं की जर पाकिस्तान असं काही करण्याचा विचार करत असेल, तर त्याला त्याची फार मोठी किंमत मोजावी लागेल. हेच मी अमेरिकेच्या उपराष्ट्रपतींना थेट सांगितलं.”
मोदी यांनी पुढे सांगितले, “मग मी त्यांना सांगितलं – ‘हम गोली के जवाब गोले से देंगे’.”
पंतप्रधान म्हणाले की, यानंतर भारताने पाकिस्तानची लष्करी पायाभूत संरचना मोठ्या प्रमाणावर उद्ध्वस्त केली. “आता पाकिस्तानलाही कळून चुकलं आहे की भारताकडून येणाऱ्या प्रत्येक उत्तराची तीव्रता वाढतच जाते,” असं त्यांनी ठामपणे सांगितलं.
ते पुढे म्हणाले की, “जगातील कोणत्याही नेत्याने भारताला ऑपरेशन सिंदूर थांबवायला सांगितलं नाही,” आणि हे म्हणताच संपूर्ण सभागृहात जल्लोष झाला.







