पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्र्यांना सोशल मीडियाचा, विशेषतः इन्स्टाग्रामचा अधिक प्रभावी वापर करण्याचे निर्देश दिले आहेत. मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यांनी प्रत्येक मंत्र्याला तरुणांशी थेट संवाद प्रस्थापित करण्यासाठी इन्स्टाग्रामवर सक्रिय राहण्यास, नियमित रील्स आणि आकर्षक डिजिटल सामग्री तयार करण्यास सांगितले. आजच्या तरुण पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी पारंपरिक माध्यमांपेक्षा सोशल मीडिया अधिक प्रभावी ठरत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले.
बैठकीदरम्यान पंतप्रधानांनी किती मंत्री इन्स्टाग्राम वापरतात, याचीही विचारणा केली. त्यांनी सांगितले की, देशातील मोठा युवा वर्ग या प्लॅटफॉर्मवर सक्रिय आहे. त्यामुळे सरकारी योजना, निर्णय, उपक्रम आणि जनहिताच्या माहितीचा प्रसार अधिक सुलभ, आकर्षक आणि विश्वासार्ह पद्धतीने करता येऊ शकतो. यासाठी प्रत्येक मंत्र्याने आपल्या मंत्रालयाच्या कामकाजाची माहिती सोप्या भाषेत आणि व्हिडिओ स्वरूपात नागरिकांपर्यंत पोहोचवावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.
हे ही वाचा:
CJP आंदोलनाला परदेशी निधीचा आधार? केंद्र सरकारचे स्पष्ट उत्तर
महाराष्ट्र टीईटी प्रश्नपत्रिका फुटीच्या सूत्रधाराची गचांडी धरली, बिहारमधून अटक
मुंबईकरांना दिलासा! धरणांतील पाणीसाठा ८३% पार
अलीकडेच पंतप्रधान मोदी यांनी स्वतः इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडिओला मोठा प्रतिसाद मिळाला होता. विशेषतः तरुणांनी त्यावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया देत सूचना आणि अभिप्राय नोंदवला. या प्रतिसादानंतर सरकारने डिजिटल संवादाला अधिक बळ देण्याचा निर्णय घेतल्याचे मानले जात आहे. पंतप्रधानांनीही तरुणांकडून मिळालेल्या सूचना महत्त्वाच्या असल्याचे सांगत त्यांचे आभार मानले होते.
सरकारच्या या नव्या डिजिटल धोरणामागे तरुण मतदार आणि नव्या पिढीशी अधिक जवळीक साधण्याचा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे. सोशल मीडिया हे केवळ प्रसिद्धीचे माध्यम नसून लोकांशी थेट संवाद, अभिप्राय आणि विश्वास निर्माण करण्याचे प्रभावी व्यासपीठ बनले आहे. त्यामुळे प्रत्येक मंत्र्याने आपल्या मंत्रालयाचे काम अधिक पारदर्शक आणि जनतेपर्यंत सहज पोहोचेल अशा पद्धतीने मांडावे, असा संदेश पंतप्रधानांनी दिला .
