दोन वर्षात उभी राहिलेली नव्या संसद भवनाची इमारत शनिवारी खुली होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या संसद भवनाचे उद्घाटन होईल. ८८८ सदस्य या नव्या सभागृहात बसू शकणार आहेत तर राज्यसभेतील आसनक्षमता असेल ३००. एकूण १२८० सदस्य या संसद भवनात एकत्र येऊ शकतात.
हा कार्यक्रम दोन टप्प्यात होईल. प्रथम होम हवन या मार्गाने उद्घाटन सोहळ्याला प्रारंभ होईल. संसद परिसरात असलेल्या महात्मा गांधींच्या पुतळ्याशेजारी बांधण्यात आलेल्या मंडपात हे होमहवन पार पडेल. नंतर प्रत्यक्ष उद्घाटनाला सुरुवात होईल.
त्रिकोणी आकाराची ही भव्य वास्तू ६४ हजार ५०० चौरस मीटर परिसरात उभी राहिली आहे. विशेष म्हणजे या उद्घाटन कार्यक्रमात सेंगोलची प्रतिष्ठापना हा चर्चेचा विषय असेल. त्याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सेंगोलची प्रतिष्ठापना संसदेत लोकसभा अध्यक्षांच्या खुर्चीशेजारी करणार असल्याचे सांगितल्यानंतर या सेंगोलविषयीची उत्सुकता देशभरात दिसून आली. सेंगोल तथा राजदंड पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे धर्मपुरम आणि अधीनाम यांच्या हस्ते सुपूर्द केला जाईल. तो सोहळा पाहण्यासाठी देशातील तमाम जनता उत्सुक आहे. त्यासाठी हे अधीनाम दिल्लीत दाखल झाले आहेत.
उपराष्ट्रपती वेंकय्या नायडू, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, राज्यसभा उपसभापती हरीवंश अशी मान्यवर मंडळी कार्यक्रमाला उपस्थित असतील. विविध राज्यांचे मुख्यमंत्रीही कार्यक्रमाला येणार आहेत. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही दिल्लीत दाखल झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या उद्घाटनाच्या निमित्ताने अनेक ट्विट करत नव्या संसद भवनासंदर्भातील अनेक पोस्ट शेअर केल्या आहेत.
हे ही वाचा:
पीएफआयवरील बंदीच्या रागातून गडकरींना केले ‘टार्गेट’
शिवसेना पदाधिकारी शब्बीर शेखची चॉपरचे वार करून हत्या
पोक्सो कायद्याचा गैरवापर होत आहे! बृजभूषण सिंह यांची मागणी
डेंग्युच्या अळ्या सापडल्यामुळे १२० सोसायट्यांवर दाखल केले गुन्हे
एआयएडीएमके या पक्षानेही पंतप्रधानांचे कौतुक केले आहे. पक्षाचे प्रमुख पलानीस्वामी यांनी सेंगोलची प्रतिष्ठापना नव्या संसद भवनात करण्यात येणार असल्याबद्दल नरेंद्र मोदींचे आभार मानले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अधीनाम दर्शन घेणार असून त्यांचे आशीर्वाद घेतील.
१९ विरोधी पक्षांनी या कार्यक्रमावर बहिष्कार घातला असला तरी २५ पक्ष या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे. २०१९मध्ये या सेंट्रल व्हिस्टा प्रकल्पाची घोषणा करण्यात आली. त्यालाही तेव्हा विरोध झाला होता पण दोन वर्षात ही वास्तू उभी राहिली. त्याच्या अंतरगाचा व्हीडिओ मोठ्या प्रमाणावर पाहिला गेला आणि संसद भवनाच्या बांधकामाचे कौतुकही देशभरातून झाले.







