सध्या सुरू असलेल्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान सोमवारी लोकसभेत जोरदार गोंधळ पाहायला मिळाला. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर बोलण्यास सुरुवात केल्यानंतर काही वेळातच वातावरण तापले.
राहुल गांधी यांनी माजी लष्करप्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या अद्याप अप्रकाशित पुस्तकातील काही उतारे वाचण्याचा प्रयत्न केला. यावर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी तत्काळ आक्षेप घेतला आणि परिस्थिती अधिक चिघळली. राहुल गांधी भाषण करत असताना पुस्तकातील उतारे उद्धृत करू लागले, तेव्हा राजनाथ सिंह यांनी त्यांना थांबवत विचारले की संबंधित पुस्तक प्रत्यक्षात प्रकाशित झाले आहे का, याची त्यांनी आधी खात्री द्यावी.
“ते पुस्तक प्रकाशित झाले आहे की नाही, हे त्यांनी सभागृहाला सांगावे. ते अद्याप प्रकाशित झालेले नाही. त्यामुळे त्यातील मजकूर उद्धृत करण्याचा त्यांना अधिकार नाही,” असे राजनाथ सिंह म्हणाले. “मी ठामपणे सांगू शकतो की ते पुस्तक अद्याप प्रकाशित झालेले नाही,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही या वादात हस्तक्षेप करत म्हटले, “जे पुस्तक अजून प्रकाशितच झालेले नाही, त्यातील मजकूर राहुल गांधी कसा उद्धृत करू शकतात?” वृत्तपत्रातील कात्रणे, पुस्तके किंवा अशा प्रकारचे अस्सल नसलेले संदर्भ सभागृहात मांडता येत नाहीत,” असे सांगत अमित शाह यांनी राहुल गांधींना पुस्तकाचा उल्लेख न करता भाषण सुरू ठेवण्याची विनंती केली.
हे ही वाचा:
भारताविरुद्धच्या मॅचपूर्वीच पाकिस्तान रनआउट
“विश्वचषक खेळणार पण, भारतविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार”
१४६ प्रकाशवर्षे अंतरावर सापडला राहण्यायोग्य ग्रह!
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनीही मंत्र्यांच्या आक्षेपांना पाठिंबा देत संसदीय नियम आणि परंपरांचा हवाला दिला.
मात्र राहुल गांधी आपल्या भूमिकेवर ठाम राहिले. द कारवाँ मासिकाने त्या पुस्तकातील उतारे “१०० टक्के अस्सल” असल्याचा दावा केला आहे, असे त्यांनी सांगितले. “त्यात राजनाथजींचाही उल्लेख आहे,” असे राहुल गांधी म्हणाले. यावेळी काँग्रेसच्या इतर खासदारांनी अध्यक्षांना राहुल गांधींना लेखातील उतारे उद्धृत करण्याची परवानगी देण्याची मागणी केली.
काँग्रेस खासदार के. सी. वेणुगोपाल यांनीही हस्तक्षेप करत सांगितले, “यानंतर सरकारला उत्तर देण्याची संधी देता येईल.” संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू आणि भाजप खासदार निशिकांत दुबे यांनीही अप्रकाशित पुस्तकांमधील मजकूर उद्धृत करण्यास मनाई असल्याचे नियम पुन्हा अधोरेखित केले. यावर अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले, “पुस्तक प्रकाशित असले तरीही, सभागृहाच्या कामकाजाशी थेट संबंधित नसलेल्या कोणत्याही पुस्तकातील मजकूर उद्धृत करण्याची परवानगी नाही.”
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या समर्थनार्थ समाजवादी पक्षाचे खासदार अखिलेश यादव यांनी भूमिका मांडली. त्यांनी सांगितले की चीनशी संबंधित मुद्दे अत्यंत संवेदनशील आहेत आणि या विषयावर राहुल गांधींना बोलण्याची संधी दिली पाहिजे. या सर्व आक्षेपांनंतर सभागृहात प्रचंड गोंधळ उडाला. विरोधी पक्षाच्या खासदारांनी वारंवार होणाऱ्या अडथळ्यांविरोधात निषेध केला, तर सत्ताधारी बाकांवरील खासदारांनी संसदीय नियमांचे काटेकोर पालन करण्याची मागणी केली.
सुमारे ४५ मिनिटे चाललेल्या या गदारोळानंतर लोकसभा दुपारी ३ वाजेपर्यंत तहकूब करण्यात आली. सभागृह तहकूब झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्यासोबत बैठकही घेतली.







