केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राहुल गांधींनी ‘मत चोरण्याचे’ आरोप केल्यानंतर चिराग पासवान म्हणाले, “विरोधी पक्षाकडे कोणताही ठोस पुरावा नाही. ते फक्त माध्यमांसमोर येऊन तमाशा उभा करतात.”
चिराग पासवान पुढे म्हणाले, “तुम्ही सतत तक्रारी करता की बिहारमधून अनेक नावं वगळली गेली, अनेक तक्रारी येत आहेत. एक राजकीय पक्ष म्हणून तुमची जबाबदारी आहे की अशा तक्रारी मिळाल्यास तुम्ही निवडणूक आयोगाकडे जाऊन आपली बाजू मांडावी. पण हे लोक फक्त गोंधळ घालतात.”
पटणामध्ये पत्रकारांशी बोलताना पासवान म्हणाले, “विरोधक संसदेत एसआयआरवर चर्चा मागत आहेत, पण राहुल गांधींनी सांगावं की यावर उत्तर कोण देणार? जर त्यांनी सांगितलं, तर मी स्वतः सरकारशी बोलून चर्चा घडवून आणण्याचा प्रयत्न करेन. विरोधकांना काय वाटतं, की निवडणूक आयोग संसदेत येऊन उत्तर देईल?”
ते म्हणाले, “काँग्रेस आणि राजद या जुन्या पक्षांनीही बिनबुडाच्या गोष्टी करणे सुरू केले आहे. निवडणूक आयोगाने एक ठराविक प्रक्रिया पाळली आहे. सरकारची यात कोणतीही भूमिका नाही. त्यामुळे विरोधकांनी निवडणूक आयोगाकडे जाऊन आपली नाराजी नोंदवावी आणि संसदेला चालू द्यावं.”
मतदार यादीबाबत ‘काँग्रेस सरकार आल्यावर कारवाई’ या राहुल गांधींच्या वक्तव्यावरही चिराग पासवान यांनी टोला लगावला. ते म्हणाले, “राहुल गांधी दिवसा स्वप्नं पाहत आहेत. केंद्रात अनेक वर्षे एनडीएचीच सत्ता राहणार आहे.”
शेवटी त्यांनी काँग्रेसवर आरोप करत म्हटलं, “फक्त एका व्यक्तीला लक्ष्य करण्याच्या नादात काँग्रेससारखे पक्ष देशाच्या घटनात्मक संस्थांवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहेत. त्यांनी सैन्याच्या शौर्यावरही प्रश्न उपस्थित केले. त्यांच्या नेत्यांनी पाकिस्तान आणि देशविरोधी शक्तींची भाषा बोलली. देशाची बाजू घेण्याऐवजी शत्रू देशाची बाजू घेणं ही अत्यंत धोकादायक गोष्ट आहे.”







