आशाताईंचा शोक प्रस्ताव : राहुल नार्वेकर म्हणाले, दीनदयाल मंगेशकर, दुर्दमय इच्छाशक्ती

सोशल मिडीयावरुन अनेकांची टीका

आशाताईंचा शोक प्रस्ताव : राहुल नार्वेकर म्हणाले, दीनदयाल मंगेशकर, दुर्दमय इच्छाशक्ती

महाराष्ट्र विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडून झालेल्या एका मोठ्या चुकीची राज्यभर चर्चा रंगली आहे. ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांच्या निधनानंतर सभागृहात शोकप्रस्ताव मांडताना राहुल नार्वेकर यांनी अनेक मराठी शब्दांचे चुकीचे उच्चार केल्याने विरोधकांसह सामाजिक माध्यमांवरही त्यांच्यावर टीकेची झोड उठली आहे.

आशा भोसले यांच्या संगीत क्षेत्रातील अतुलनीय योगदानाचा गौरव करताना राहुल नार्वेकर यांनी त्यांच्या कुटुंबीयांचा आणि कारकिर्दीचा उल्लेख केला. मात्र, यावेळी त्यांनी आशा भोसले यांचे वडील, ज्येष्ठ नाट्यसंगीतकार आणि गायक पंडित दीनानाथ मंगेशकर यांचे नाव चुकीचे घेत ‘दीनदयाल मंगेशकर’ असा उल्लेख केला. दुर्दम्य इच्छाशक्ती असे म्हणायचे तर दुर्दमय इच्छाशक्ती म्हणाले. सुमन कल्याणपूर यांच्या शोकप्रस्तावाच्या सुरुवातीलाच सुमन कल्याण पूर असा उल्लेख त्यांनी केला.एवढेच नव्हे तर शोकप्रस्तावातील काही मराठी शब्द आणि व्यक्तींची नावेही चुकीच्या पद्धतीने उच्चारल्याचे सभागृहात उपस्थित सदस्यांच्या लक्षात आले.

पद्मविभूषण हा शब्द देखील त्यांनी चुकीचा उच्चारल्यामुळे अनेकांनी सोशल मिडीयावर त्यांच्यावर टिका केली. स्वर्गीय लता मंगेशकर या प्रत्यक्ष भगवंताची बासरी होत्या तर आशाताई या राधेच्या मनातील घनःश्यामाचे स्वर होत्या. सतत काळाबरोबर राहण्याची हातोटी, नवनवी गोष्टी आत्मसात करण्याची वृत्ती, उत्तम विनोद बुद्धी आणि गाण्याचा ध्यास ही आशाताईंच्या सदसतेज व्यक्तिमत्वाची वैशिष्ट्य होती. हे वाचताना त्यांनी अनेकदा चुका केल्या.
हे ही वाचा:
केतन अग्रवालला होणाऱ्या पत्नीने आणि तिच्या प्रियकराने ढकलले दरीत?

देश संविधानावर चालतो, कुराणवर नाही!

“बिन लादेनला आश्रय देणारा पाकिस्तान मध्यस्थ कसा?”

मुंबईत ९२५ एकरवर पुनर्विकासाचा मेगा प्लॅन!

आशा भोसले यांच्या कारकिर्दीचा उल्लेख करताना काही शब्दांमध्ये अडखळणे, नावांचे चुकीचे उच्चार आणि वाचनातील गोंधळ यामुळे शोकप्रस्तावाचा गंभीर सूर काही काळ बाजूला पडला. विशेष म्हणजे, देशातील सर्वात प्रतिष्ठित संगीत घराण्यांपैकी एका घराण्याचा उल्लेख करताना पंडित दीनानाथ मंगेशकर यांचे नाव चुकल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. कारण मंगेशकर कुटुंब हे महाराष्ट्राच्या सांस्कृतिक इतिहासाचा अविभाज्य भाग मानले जाते.

सभागृहातील या घटनेचे व्हिडीओ काही मिनिटांतच सामाजिक माध्यमांवर व्हायरल झाले. अनेकांनी विधानसभा अध्यक्षांसारख्या महत्त्वाच्या पदावरील व्यक्तीने श्रद्धांजली प्रस्तावासारख्या संवेदनशील विषयासाठी अधिक तयारी करायला हवी होती, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली. काहींनी ही चूक अनवधानाने झाल्याचे म्हटले, तर अनेकांनी ती गंभीर निष्काळजीपणाचे उदाहरण असल्याचे सांगितले.

दरम्यान, आशा भोसले यांचे भारतीय संगीत क्षेत्रातील योगदान अतुलनीय मानले जाते. सात दशकांहून अधिक काळ त्यांनी हिंदी, मराठीसह विविध भारतीय भाषांमध्ये हजारो गाणी गायली. त्यांच्या आवाजाने भारतीय चित्रपटसृष्टीला नवे आयाम दिले. अशा दिग्गज कलाकाराला श्रद्धांजली वाहताना झालेल्या या चुका आता चर्चेचा विषय ठरल्या आहेत.

विधानसभेतील शोकप्रस्ताव हा केवळ औपचारिक कार्यक्रम नसून दिवंगत व्यक्तीच्या कार्याचा सन्मान करण्याचा क्षण असतो. त्यामुळे या प्रसंगी झालेल्या नावांच्या आणि उच्चारांच्या चुकांमुळे राहुल नार्वेकर यांच्यावर टीकेची झोड उठली असून, अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी हा विषय राजकीय आणि सामाजिक चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. पंडित दीनानाथ मंगेशकर यांचे नाव ‘दीनदयाल मंगेशकर’ असे घेणे, काही शब्दांचे अयोग्य उच्चार करणे आणि शोकप्रस्तावाच्या वाचनात वारंवार अडखळणे या चुका आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चिल्या जात असून, सभागृहातील हा क्षण राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे.

Exit mobile version