पुण्यातील प्रसिद्ध लोहगड किल्ल्यावरून ३५० फूट खोल दरीत पडून मृत्यू झालेल्या २५ वर्षीय केतन विशाल अग्रवाल याच्या मृत्यू प्रकरणाने धक्कादायक वळण घेतले आहे. सुरुवातीला हा अपघाती मृत्यू मानला जात असताना, पोलिसांच्या तपासात ही पूर्वनियोजित हत्या असल्याचा संशय बळावला असून मृताची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत.
तपास यंत्रणांच्या माहितीनुसार, केतन अग्रवाल याला दरीत ढकलून ठार मारण्यात आल्याचा संशय असून ही घटना अपघात नसून अत्यंत बारकाईने आखलेला कट असल्याचे समोर येत आहे. प्राथमिक तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, २० वर्षीय सिया गोयल हिचे २२ वर्षीय चेतन चौधरी याच्यासोबत प्रेमसंबंध होते. मात्र, सियाच्या कुटुंबीयांनी तिचा विवाह जयपूरमधील व्यावसायिक कुटुंबातील केतन अग्रवाल यांच्यासोबत निश्चित केला होता. सियाला हे लग्न मान्य नसल्याने आणि केतन हा तिच्या व चेतनच्या नात्यातील अडथळा असल्याचे वाटत असल्याने दोघांनी मिळून त्याला मार्गातून हटवण्याचा कट रचल्याचा पोलिसांचा संशय आहे.
पोलिसांच्या तपासात धक्कादायक बाब समोर आली आहे. केतन याला ठार मारण्याचा प्रयत्न १९ जूनलाच नव्हे तर त्याआधीही करण्यात आल्याचा दावा तपास अधिकाऱ्यांनी केला आहे. १४ जून रोजी सिया आणि चेतन यांनी केतन यांना लोहगड किल्ल्यावर नेले. तेथे सापाचा धोका असल्याचे भासवून त्याला दरीकडे ढकलण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप आहे. मात्र, त्या वेळी परिस्थिती त्यांच्या योजनेप्रमाणे घडली नाही आणि हा प्रयत्न फसला. यानंतर केवळ पाच दिवसांनी पुन्हा एकदा लोहगडावर जाण्याची योजना आखण्यात आली.
१९ जून हा सिया गोयलचा वाढदिवस होता. लग्नाला अवघे काही आठवडे शिल्लक असताना केतन याने तिच्यासाठी विशेष ट्रिपचे आयोजन केले होते. वाढदिवस साजरा करण्यासाठी सिया, केतन आणि काही मित्रमंडळी लोहगड किल्ल्यावर गेले होते. तपासानुसार, याच वेळी चेतन चौधरीलाही गुप्तपणे घटनास्थळी बोलावण्यात आले. योग्य संधी साधून केतन याला दरीत ढकलण्यात आले आणि तो सुमारे ३५० फूट खोल दरीत कोसळला. गंभीर दुखापतींमुळे त्याचा जागीच मृत्यू झाला.
घटना घडल्यानंतर सुरुवातीला पोलिसांनी याची नोंद अपघाती मृत्यू म्हणून केली होती. किल्ल्याच्या कडेला उभे राहून छायाचित्रे काढताना केतन यांचा तोल गेला असावा, असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला होता. मात्र, चौकशीदरम्यान सिया गोयलच्या जबाबांमध्ये विसंगती आढळून आली. तिच्या वागणुकीतही संशयास्पद बाबी दिसल्याने पोलिसांनी तपासाची दिशा बदलली. यानंतर पोलिसांनी सियाचा मोबाईल फोन, कॉल रेकॉर्ड, सोशल मीडिया अकाउंट्स, चॅट्स आणि इतर डिजिटल पुरावे तपासण्यास सुरुवात केली. या तांत्रिक तपासातून अनेक संशयास्पद बाबी समोर आल्या. त्यानंतर पोलिसांनी अपघाती मृत्यूचा तपास हत्या म्हणून सुरू केला. सिया आणि चेतन यांच्यातील संपर्क, त्यांच्या हालचाली आणि घटनेपूर्वीची तयारी यावर सध्या पोलिसांचा भर आहे.
केतन अग्रवाल याच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्नापूर्वी हे जोडपे बाली येथे फिरायला जाणार होते. त्यासाठी सर्व बुकिंग आणि तयारी पूर्ण झाली होती. मात्र, अचानक सियाने तिचा पासपोर्ट हरवल्याचे सांगितले आणि संपूर्ण सहल रद्द करण्यात आली. पोलिसांच्या तपासात असे समोर आले आहे की, एका हॉटेलमध्ये नाश्त्यासाठी थांबल्यानंतर सियाने स्वच्छतागृहात स्वतःच पासपोर्ट फाडून टाकल्याचा संशय आहे. त्यामुळे बालीची सहल रद्द झाली. तपासकर्त्यांच्या मते, विदेश दौऱ्याऐवजी लोहगडसारख्या दुर्गम ठिकाणी केतन यांना नेऊन त्यांचा मृत्यू अपघातासारखा दाखवण्याची योजना असू शकते.
हे ही वाचा:
‘काँग्रेसलाही विश्वास आहे की, काम करून दाखवतील ते मोदीच!’
व्हॉट्सअॅपची कमान आता भारतीयाच्या हाती!
दुर्मिळ खनिजांसाठी भारताची मोठी रणनीती
विधवांना लग्नाच्या बेडीत अडकवणाऱ्या नराधमाला बेड्या
केतन अग्रवाल याच्या कुटुंबीयांनी सांगितले की, पुढील महिन्यात जयपूरमध्ये अतिशय भव्य विवाह सोहळा आयोजित करण्यात येणार होता. राजवाड्यासारखे स्थळ बुक करण्यात आले होते आणि पाहुण्यांच्या व्यवस्थेची तयारी सुरू होती. इतकेच नव्हे तर सियाच्या वाढदिवसानिमित्त महाबळेश्वरमधील एका आलिशान रिसॉर्टमध्ये सुमारे ४० खोल्या आरक्षित करण्यात आल्या होत्या. याशिवाय, लोहगड किल्ल्यावर प्री-वेडिंग फोटोशूट करण्याचाही सियाने आग्रह धरला होता. त्यामुळे या सर्व घटनांकडे आता नव्या संशयाने पाहिले जात आहे.
पोलिसांनी या प्रकरणात सिया गोयल आणि चेतन चौधरी यांची कसून चौकशी सुरू केली आहे. डिजिटल पुरावे, कॉल डिटेल्स, प्रत्यक्षदर्शींचे जबाब आणि घटनास्थळावरील पुरावे यांच्या आधारे तपास पुढे सरकत आहे. सुरुवातीला अपघात वाटणारे हे प्रकरण आता प्रेमसंबंध, विश्वासघात आणि पूर्वनियोजित हत्येच्या कथित कटात परिवर्तित झाले आहे. तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे या प्रकरणातील आणखी धक्कादायक तपशील समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.







