काँग्रेसच्या मतदार अधिकार यात्रेदरम्यान राहुल गांधी यांना भेटून मतदानाचा हक्क हिरावल्याची तक्रार करणाऱ्या रंजू देवींच्या दाव्याचे वास्तव आता समोर आले आहे. चौकशीत हे स्पष्ट झाले की, रंजू देवी आणि त्यांच्या कुटुंबाचे नाव मतदार यादीत आहे. म्हणजेच त्यांचे नाव मतदार यादीतून वगळले गेलेले नाही.
रोहतास जिल्ह्यातील रंजू देवी यांनी सांगितले की, त्यांच्या वॉर्ड सचिवांनी त्यांना सांगितले होते की, त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे नाव मतदार यादीत नाही. सचिवांनीच त्यांना हेही सुचवले होते की, राहुल गांधी यात्रा घेऊन आले आहेत, त्यांना भेटा आणि ही बाब सांगा. त्यानंतरच त्या राहुल गांधींकडे पोहोचल्या आणि त्यांनी हे त्यांना सांगितले.
हे ही वाचा:
सेना आणि सिनेमा : चमकलेले सितारे कोणते ?
मुंबईत चोवीस तासांत ढगफुटीसदृश्य पाऊस
९० वर्षांचा मी, आता जागे होण्यास सांगता, वाईट वाटते!
ड्राफ्ट मतदार यादीत नाव नोंदलेले
रंजू देवी यांनी स्पष्ट केले की, जेव्हा त्यांनी स्वतः यादी पाहिली तेव्हा त्यांना कळले की त्यांचे नाव मतदार यादीत आहे. म्हणजेच त्यांचा मताचा हक्क वगळण्यात आलेला नाही. त्यांनी मान्य केले की, वॉर्ड सचिवांच्या सांगण्यावरूनच त्या राहुल गांधींकडे तक्रार घेऊन गेल्या होत्या. राहुल गांधींना केलेल्या तक्रारीचा व्हिडिओ व्हायरल झाला होता.
राहुल गांधींच्या यात्रेदरम्यान रंजू देवी त्यांना भेटल्या होत्या आणि मतदार यादीतून नाव वगळल्याची तक्रार केली होती. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. त्यानंतर सत्ताधारी पक्ष आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांचा सिलसिला सुरू झाला. विरोधकांनी याला ‘मतांची लूट’ असे संबोधले होते, पण आता खरी परिस्थिती उघड झाल्यानंतर प्रकरण उलटले आहे.
SIR वरून राजकारण तापले
बिहारमध्ये सध्या विशेष सखोल पुनरावलोकन (SIR) प्रक्रियेवरून राजकीय संघर्ष सुरू आहे. राजद आणि काँग्रेस यांचा आरोप आहे की, एनडीए सरकार मतदार यादीत गडबड करून लोकांचा मतदानाचा अधिकार हिरावून घेत आहे. तर सरकारचे म्हणणे आहे की SIR ही एक नियमित प्रक्रिया आहे आणि त्यामध्ये पारदर्शकता ठेवली जात आहे. रंजू देवींच्या प्रकरणामुळे विरोधकांचा तो दावा कमकुवत झाला आहे ज्यामध्ये मतदार नाव वगळून मतदानाचा हक्क हिरावण्याचा कट रचला जात असल्याचा आरोप करण्यात आला होता. आता पाहावे लागेल की काँग्रेस आणि राजद या उघडकीवर काय स्पष्टीकरण देतात.







