एरवी पंतप्रधान नरेंद्र मोदी याना हुकूमशहा म्हणत टीका करणाऱ्या काँग्रेसचे नेते आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी मात्र खरा हुकूमशहा असलेल्या हिटलरच्या प्रेमात आहेत.
रेड्डी यांनी अतिक्रमणविरोधी कारवाईसाठी स्थापन करण्यात आलेल्या राज्याच्या विशेष पथकाबाबत वक्तव्य करताना हिटलरचा उल्लेख केल्यामुळे मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. त्यांच्या या विधानानंतर विरोधकांनी तीव्र टीका केली असून अनेकांनी आश्चर्यही व्यक्त केले आहे.
शनिवारी बेंगळुरू येथे आयोजित एका परिषदेत बोलताना रेड्डी यांनी दावा केला की हैद्राबाद आपत्ती बचाव आणि संपत्ती संरक्षण एजन्सी तथा HYDRAA या संस्थेचे नाव आणि संकल्पना हिटलरकडून प्रेरित आहे.
मुलाखतीदरम्यान ते म्हणाले, हायड्रा हा शब्द हिटलरचा आवडता शब्द होता. त्याच्या मुख्य टीमला ‘हायड्रा’ म्हटले जायचे, जी कोणाच्याही हत्या करू शकत होती. त्यामुळे मी हिटलरकडून प्रेरणा घेऊन या संस्थेचे नाव HYDRAA ठेवले.”
या विधानानंतर इतिहासतज्ज्ञांनी तत्काळ निदर्शनास आणून दिले की, हिटलरच्या अंतर्गत गटाचा आणि “हायड्रा” या शब्दाचा संबंध असल्याचा कोणताही ऐतिहासिक पुरावा उपलब्ध नाही. त्यांनी स्पष्ट केले की “ऑपरेशन हायड्रा” हे प्रत्यक्षात दुसऱ्या महायुद्धादरम्यान नाझी जर्मनीविरुद्ध राबविण्यात आलेल्या रॉयल एअरफोर्सच्या एका बॉम्बहल्ला मोहिमेचे नाव होते.
भाजपची तीव्र टीका
या वक्तव्यानंतर भाजप प्रवक्ते शहजाद पुनावाला यांनी काँग्रेस आणि तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांवर जोरदार हल्लाबोल केला.
सोशल मीडियावरील पोस्टमध्ये त्यांनी लिहिले, काँग्रेसची धोकादायक हिटलरवादी आणि आणीबाणीची मानसिकता पुन्हा एकदा उघड झाली आहे.”
पुढे ते म्हणाले, रेवंत रेड्डी आता उघडपणे सांगत आहेत की HYDRAA तयार करण्यासाठी त्यांना हिटलरकडून प्रेरणा मिळाली. ही काँग्रेसची हुकूमशाही मानसिकता आहे. इंदिरा गांधींच्या आणीबाणीपासून ते रेवंथ यांच्या पत्रकार आणि विद्यार्थ्यांवरील कारवाईपर्यंत याच मानसिकतेचे दर्शन घडते.”
हे ही वाचा:
सुनील देवधरांनी मांडले सावरकरविचार
विझिंजम बंदर: ‘दक्षिण दिग्विजया’साठी भारत तयार
चेंबूरमध्ये चिमुरडीचे अपहरण करण्याचा प्रयत्न फसला
केरळमध्ये पावसाचा कहर; पाच जिल्ह्यांना रेड अलर्ट
पूनावाला यांनी रेड्डी यांच्या आणखी एका कथित वक्तव्यावरही टीका केली. त्या वक्तव्यात रेड्डी म्हणाले असल्याचा दावा करण्यात आला आहे. राष्ट्रपती उत्तर भारतातील आहेत. पंतप्रधान उत्तर भारतातील आहेत. आम्हाला दुसऱ्या दर्जाचे नागरिक म्हणून जगायचे नाही. आम्ही कर भरायचे आणि दिल्लीला सलाम करायचा, हे आम्हाला मान्य नाही, असे रेड्डी म्हणाले होते.
या वक्तव्याला फूट पाडणारे असल्याचे म्हणत पूनावाला यांनी रेड्डींवर उत्तर-दक्षिण विभागणी निर्माण करण्याचा आरोप केला.
ते म्हणाले, पंतप्रधान गुजरातचे आहेत. आपल्या पहिल्या आदिवासी राष्ट्रपती ओडिशातील आहेत. पण डी. के. सुरेश यांच्यानंतर आता रेवंत रेड्डीही ‘भारत तोडो’च्या राजकारणाचा पुरस्कार करत आहेत.”
या प्रकरणामुळे तेलंगणातील राजकीय वातावरण तापले असून रेड्डी यांच्या वक्तव्यावरून काँग्रेस आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे.
