गेल्या काही दिवसांपासून गाजत असलेला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि अजित पवारांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या रुपाली ठोंबरे यांच्यातील वादानंतर अखेर त्यावर महत्त्वाचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने घेतला.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पक्षाच्या प्रवक्त्या रूपाली पाटील ठोंबरे पाटील आणि आमदार अमोल मिटकरी यांची प्रवक्तेपदावरून हकालपट्टी केली आहे. मिटकरी यांची हकालपट्टी करताना सूरज चव्हाण यांच्याकडे पुन्हा एकदा प्रवक्तेपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मागे मारहाण केल्यामुळे चव्हाण यांचे प्रवक्तेपद हिरावून घेतले होते. भाजपवर आगपाखड करणाऱ्या अमोल मिटकरींना अजितदादांनी पदावरून पायउतार केल्याची चर्चा आहे.
डॉ. संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणानंतर रुपाली चाकणकर यांच्याविरोधात ठोंबरे यांनी भूमिका घेतली होती. त्यानंतर चाकणकर यांनी अजित पवार यांची भेट घेतली होती. ठोंबरेदेखील अजित पवारांना भेटल्या होत्या. त्यानंतर ही कारवाई पक्षाकडून करण्यात आली.
हे ही वाचा:
लालू परिवाराविरुद्धच्या ‘लँड फॉर जॉब’ प्रकरणाची सुनावणी ४ डिसेंबरला
गोहत्येत सहभागी असलेल्या आरोपीचे उत्तर प्रदेशात एन्काऊंटर
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी उद्धव ठाकरेंना डच्चू देत काँग्रेसचा स्वबळाचा नारा!
अयोध्येत राममंदिरात होणार ऐतिहासिक ध्वजारोहण
फलटणमधील डॉक्टर संपदा मुंडे या तरुणीच्या आत्महत्याप्रकरणावरुन रुपाली ठोंबरे यांनी आपल्याच पक्षाच्या रुपाली चाकणकर यांना लक्ष्य केले होते. त्यानंतर रुपाली ठोंबरे पाटील यांना कारणे दाखवा नोटीसही पाठवण्यात आली होती. या कारवाईनंतर रुपाली पाटील ठोंबरे यांनी फेसबुक पोस्ट केली आहे.
नमस्कार जय महाराष्ट्र…मी आज पुण्याच्या बाहेर आहे. प्रवासात असल्याने माझा संपर्क होऊ शकला नाही. आज पक्षाने नव्याने प्रवक्त्याची नेमणूक केली आहे. त्यात माझ्यासह आमदार अमोल मिटकरी, वैशालीताई नागवडे यांची नावे नाहीत. आम्ही येऊ घातलेल्या निवडणुकांना सामोरे जाणार सज्ज आहोत.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नवे प्रवक्ते
अनिल पाटील, रुपाली चाकणकर, ब्रिजमोहन श्रीवास्तव, चेतन तुपे, आनंद परांजपे, अविनाश आदिक, सना मलिक, राजलक्ष्मी भोसले, सुरज चव्हाण, हेमलता पाटील, प्रतिभा शिंदे, विकास पासलकर, राजीव साबळे, प्रशांत पवार, श्याम सनेर, सायली दळवी, शशिकांत तरंगे







