शिवसेना उबाठा गटाचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत चक्क पुढील दोन महिने कुणालाही दिसणार नाहीत. त्यांनी सार्वजनिक आयुष्यातून थोडे दूर राहण्याचे ठरविले आहे. एक्सवर त्यासंदर्भातील पोस्ट टाकून त्यांनी ही माहिती दिली आहे.
संजय राऊत हे आजारी असल्यामुळे ते थेट नव्या वर्षातच आपल्या कार्यकर्ते आणि मित्रपरिवाराला भेटतील असे त्यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. त्यांच्या या अचानक आलेल्या पोस्टमुळे उबाठा शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना धक्का बसलेला आहे.
राऊत यांनी स्वतः त्यांच्या प्रकृतीबद्दल एक्सवर पोस्ट करून त्यांच्या समर्थकांना धीर धरण्याचे आवाहन केले. त्यांनी लिहिले, “तुम्ही सर्वांनी नेहमीच माझ्यावर विश्वास ठेवला आहे आणि प्रेम केले आहे, परंतु अचानक माझी प्रकृती खालावली आहे. उपचार सुरू आहेत आणि मी लवकरच बरा होईन.”
डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, राऊत यांना गर्दीच्या ठिकाणी जाण्यापासून दूर राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे. त्यांच्या ट्विटमध्ये त्यांनी पुढे लिहिले की, त्यांच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, त्यांना आता सार्वजनिक कार्यक्रम आणि गर्दीपासून दूर राहावे लागेल. त्यांनी असेही म्हटले की, “मला खात्री आहे की मी लवकरच बरा होईन आणि नवीन वर्षात तुम्हा सर्वांना पुन्हा भेटेन. तुमचे प्रेम आणि आशीर्वाद नेहमीच माझ्यासोबत राहोत.”
हे ही वाचा:
ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या टी२०मध्ये भारतावर ४ विकेटने मात केली
“२०२२ ला नाकारलं… पण २०२५ मध्ये इतिहास घडवला!”
आणखी एक शीश महाल? केजरीवालांची पंजाबमध्ये ‘आलिशान ७ स्टार हवेली’
ऑस्ट्रेलियाच्या साम्राज्यावर भारतीय वादळ!
संजय राऊत यांच्या या पोस्टनंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही संजय राऊत यांना प्रकृतीला आराम पडो अशा शुभेच्छा दिल्या.
संजय राऊत यांच्या या पोस्टनंतर आता सकाळी उबाठा गटाची जी बाजू राऊत मांडत असतात किंवा सत्ताधारी पक्षांवर टीका करतात त्यालाही काही काळासाठी आराम मिळणार अशीही चर्चा सोशल मीडियात सुरू झाली. मध्यंतरी संजय राऊत हे आजारी होते म्हणून त्यांच्यावर उपचार झाले. आता त्यांनी थेट दोन महिन्यांची विश्रांतीच घेतली आहे. त्यांच्या अनुपस्थितीत ही जागा किंवा ही जबाबदारी सुषमा अंधारे यांच्यावर सोपविण्यात येईल का, याचीही चर्चा होते आहे. कारण जेव्हा संजय राऊत मागे १०० दिवसांसाठी तुरुंगात होते, तेव्हा सुषमा अंधारे यांनी नुकताच पक्षप्रवेश केला होता. त्यामुळे आताही अंधारे याच प्रवक्त्यांची भूमिका बजावणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
महाविकास आघाडी आणि मनसे यांचा सत्याचा मोर्चा १ नोव्हेंबरला निघणार आहे. वोटचोरीच्या आरोपासंदर्भात हा मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यात संजय राऊत उपस्थित नसणार हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे याची वेगवेगळ्या अर्थाने चर्चा रंगू लागली आहे.







