विकसित भारताच्या दिशेने वाटचाल करताना गुलामगिरीच्या मानसिकतेपासून पूर्णपणे मुक्त होणे अत्यावश्यक आहे. स्वातंत्र्यानंतरही काही प्रतीकांमधून गुलामगिरीचे अवशेष टिकून राहिले आहेत. आता या नव्या इमारतींमध्ये घेतले जाणारे निर्णय कोणत्याही सम्राटाच्या इच्छेचे नव्हे, तर देशातील १४० कोटी नागरिकांच्या आकांक्षांचे प्रतिनिधित्व करतील. या ठिकाणी घेतले जाणारे निर्णय देशाच्या नागरिकांच्या स्वप्नांना बळ देतील, असे प्रतिपादन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्या पंतप्रधान कार्यालयाच्या (पीएम) इमारतीचे ‘सेवा तीर्थ’ तसेच केंद्रीय सचिवालयाच्या ‘कर्तव्य भवन १ आणि २’ या इमारतींचे उद्घाटन केले, तेव्हा केले. त्यांनी या नव्या संकुलाला भारताच्या ‘विकसित भारत’ या ध्येयाच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा असल्याचे म्हटले.
“सेवा तीर्थ आणि कर्तव्य भवन १ व २ हे विकसित भारताच्या प्रवासातील एक महत्त्वाचा मैलाचा दगड आहेत. हे नागरिक-केंद्रित प्रशासन आणि राष्ट्रीय प्रगतीबद्दलच्या आमच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे, असे ते म्हणाले.
त्यांनी स्पष्ट केले की या इमारती भारतातील १४० कोटी नागरिकांच्या आकांक्षा पूर्ण करण्यासाठी उभारण्यात आल्या आहेत.
ब्रिटिश काळातील इमारतींचा संदर्भ
पंतप्रधानांनी सांगितले की साऊथ ब्लॉक आणि नॉर्थ ब्लॉक यांसारख्या ऐतिहासिक इमारतींमध्ये स्वातंत्र्यानंतर अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले गेले. संरक्षण, गृह आणि अर्थ मंत्रालयांसह पंतप्रधान कार्यालयही तिथेच कार्यरत होते. मात्र या इमारती मूळतः ब्रिटिश साम्राज्याच्या विचारसरणीचे प्रतीक म्हणून उभारण्यात आल्या होत्या, असे त्यांनी नमूद केले.
त्यांनी सांगितले की भारताची राजधानी कोलकात्याहून रायसीना हिल येथे हलवण्यात आली आणि तेथील इमारती ब्रिटिश राजघराण्याच्या इच्छेनुसार बांधण्यात आल्या होत्या.
विजया एकादशी’चा उल्लेख
पंतप्रधानांनी १३ फेब्रुवारी या दिवसाचे महत्त्व अधोरेखित करत ‘विजया एकादशी’चा उल्लेख केला. त्यांनी सांगितले की या दिवशी घेतलेला संकल्प यशस्वी ठरतो, आणि विकसित भारताच्या ध्येयाने ‘सेवा तीर्थ’मध्ये प्रवेश करताना देशाला यशाचे आशीर्वाद लाभतील.
‘रेस कोर्स रोड’ ते ‘लोक कल्याण मार्ग’
पंतप्रधानांनी आपल्या निवासस्थानाचा पत्ता असलेल्या रेस कोर्स रोड या नावाचे लोक कल्याण मार्ग असे नामकरण केल्याची आठवण करून दिली. ते म्हणाले, “हे केवळ नावबदल नव्हते; सत्तेच्या मानसिकतेचे सेवेच्या भावनेत रूपांतर करण्याचा तो प्रयत्न होता.”
हे ही वाचा:
शेख हसीना यांना आमच्याकडे सोपवा!
कांगारूंचं गर्वहरण; जिम्बाब्वेचा ऐतिहासिक पराक्रम
यूएईचा कॅनडावर ५ विकेट्सनी विजय
गोवा विशेष: दाबोळीम विमानतळ कधीच बंद होणार नाही
स्मरणार्थ टपाल तिकीट आणि नाणे
या प्रसंगी पंतप्रधानांनी ‘सेवा तीर्थ’च्या प्रतिमेसह स्मरणार्थ टपाल तिकीट आणि नाणेही प्रकाशित केले.
नवा ऐतिहासिक अध्याय
“आज आपण नव्या इतिहासाचे साक्षीदार आहोत. १३ फेब्रुवारी हा दिवस भारताच्या विकास प्रवासातील नव्या सुरुवातीचा साक्षीदार ठरत आहे,” असे पंतप्रधानांनी सांगितले.
त्यांच्या मते, ‘सेवा तीर्थ’ आणि ‘कर्तव्य भवन’ या केवळ नव्या इमारती नसून स्वावलंबी, आत्मनिर्भर आणि नागरिक-केंद्रित भारताच्या संकल्पनेचे प्रतीक आहेत.







