नॉर्वेच्या पत्रकाराच्या ‘त्या’ प्रश्नाला शशी थरूर यांनी दिला ‘करारा जवाब’

नॉर्वेच्या पत्रकाराच्या ‘त्या’ प्रश्नाला शशी थरूर यांनी दिला ‘करारा जवाब’

पंतप्रधान नरेंद्र मोदी नॉर्वेच्या दौऱ्यावर असताना एका महिला पत्रकाराने त्याना प्रश्न विचारल्यावरून बरेच राजकारण झाले. नरेंद्र मोदी यांनी हा प्रश्न टाळला अशी टीका झाली. त्या पत्रकाराने त्यानंतर परराष्ट्र मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत विचारले की, भारतावर विश्वास ठेवावा असे काय आहे, त्याचे उत्तर परराष्ट्र मंत्रालयाचे सचिव सिबी जॉर्ज यांनी दिले. याच मुद्द्यावर काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी अमेरिकेतील एका चर्चासत्रात असा प्रश्न विचारणाऱ्यांना आरसा दाखवला.

काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी भारतावर का विश्वास ठेवता येतो याचे मार्मिक उदाहरण दिले. अमेरिकेतील फ्लेचर स्कूलमधील चर्चेदरम्यान त्यांनी सांगितले की, मालदीवमध्ये भारतविरोधी मोहीम चालवली जात असतानाही नवी दिल्लीने संकटाच्या काळात त्यांच्या पाठीशी उभे राहून मदत केली. त्यांनी यावर भर दिला की विश्वास हा कृतीतून निर्माण होतो.

थरूर म्हणाले की, “मालदीवमधील मागील निवडणुकीत जे राष्ट्रपती झाले, त्यांनी ‘इंडिया आऊट’ या मोहिमेवर निवडणूक लढवली होती. निवडून आल्यानंतर लगेचच त्याने भारतीय कंपन्यांचे अनेक करार रद्द केले,” असे थरूर यांनी सांगितले. ते मोहम्मद मुईझू यांच्याबाबत बोलत होते.

हे ही वाचा:

पाकिस्तानच्या क्वेटामध्ये स्फोटामुळे रेल्वेचे दोन डबे घसरले; मोठी जीवितहानी

इबोलावर WHO चा अलर्ट; भारताकडून ट्रॅव्हल अ‍ॅडव्हायझरी जारी

अंदमान समुद्रात मान्सूनची दमदार एन्ट्री

शिर्डीत आता क्षेपणास्त्रे, तोफगोळे, ड्रोन यांचे उत्पादन

थरूर म्हणाले की, मुईझ्झू यांच्या राष्ट्रपतीपदाच्या काही महिन्यांनंतर त्यांच्या राजधानीतील, सर्वात मोठ्या बेटावरील आणि प्रत्यक्षात एकमेव पिण्याच्या पाण्याचा डीसॅलिनेशन प्लांट बंद पडला. अचानक मालदीवकडे पाणीच उरले नाही. मालदीवच्या लोकांकडे पिण्यासाठी पाणी नव्हते. भारतविरोधी मोहिमा असूनही केंद्र सरकारने आपला शेजारी म्हणून मदतीची भूमिका निभावली. त्यांनी सांगितले की भारताने मालदीवच्या संकटावर मात करण्यासाठी विमानांमधून लाखो लिटर बाटलीबंद पिण्याचे पाणी पाठवले.

थरूर यांनी सांगितले की,  भारताने कोणतीही हयगय न करता लाखो लिटर पिण्याचे पाणी विमानांमधून पाठवले. त्याबदल्यात काही मागितले नाही. हा फक्त शेजारी देश म्हणून केलेला मदतीचा भाव त्यामागे होता. त्यानंतर ‘इंडिया आऊट’ मोहिमेची तीव्रता कमी झाल्याचे दिसले. विश्वास कृतीतून तयार होतो,” असे त्यांनी अधोरेखित केले.

संयुक्त राष्ट्रांमध्ये सेवा बजावलेले माजी राजनैतिक अधिकारी असलेले शशी थरूर हे स्वतः फ्लेचर स्कूलचे विद्यार्थी होते. त्यांच्या अलीकडील भेटीदरम्यान त्यांना उल्लेखनीय कार्यासाठी डीन्स मेडल देण्यात आले.

आपल्या सोशल मीडिया हँडलवर फोटो शेअर करताना त्यांनी लिहिले, “मी १९७५ मध्ये भारतातून १९ वर्षांचा तरुण म्हणून येथे आलो होतो, जगाबद्दल आणि माझ्या भूमिकेबद्दल उत्सुक होतो पण अनिश्चितताही होती. फ्लेचरने माझ्या विचार करण्याच्या पद्धतीला आकार दिला. ५० वर्षांनंतर, २०२६ च्या वर्गासमोर उभे राहून संस्थेचा सर्वोच्च सन्मान स्वीकारणे माझ्यासाठी अत्यंत भावनिक क्षण होता.”

Exit mobile version