आफ्रिकेतील डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो, युगांडा आणि दक्षिण सुदानमध्ये इबोला विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढत असल्याने संपूर्ण जगाची चिंता पुन्हा वाढली आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन जागतिक आरोग्य संघटना अर्थात WHO ने या उद्रेकाला “पब्लिक हेल्थ इमर्जन्सी ऑफ इंटरनॅशनल कन्सर्न” म्हणजेच जागतिक सार्वजनिक आरोग्य आणीबाणी घोषित केली आहे. कोविडनंतर पुन्हा एकदा जगाला मोठ्या संसर्गजन्य संकटाची चाहूल लागल्याची चर्चा सुरू झाली असून भारत सरकारनेही तातडीने सतर्कतेची पावले उचलत नागरिकांसाठी विशेष प्रवास सल्ला जारी केला आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने काँगो, युगांडा आणि दक्षिण सुदानमध्ये अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन केले असून या देशांतून भारतात येणाऱ्या प्रवाशांवर विशेष लक्ष ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. देशातील प्रमुख आंतरराष्ट्रीय विमानतळांवर तपासणी अधिक कडक करण्यात आली असून संशयित लक्षणे असलेल्या प्रवाशांची तातडीने वैद्यकीय तपासणी केली जात आहे. आरोग्य यंत्रणांनाही सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
हे ही वाचा:
व्हाइट हाऊसबाहेर ठार झालेला इसम स्वतःला मानत होता येशूचा अवतार
पाकिस्तानच्या क्वेटामध्ये स्फोटामुळे रेल्वेचे दोन डबे घसरले; मोठी जीवितहानी
बिष्णोई गँगशी कनेक्शन? मुंबईत चिनी बनावटीच्या पिस्तुलासह तिघांना अटक
WHO च्या अहवालानुसार काँगोच्या इतुरी प्रांतात इबोलाच्या बुंडीबुग्यो प्रकाराचा प्रादुर्भाव सर्वाधिक वेगाने वाढत आहे. सुरुवातीला काही रुग्ण आढळले होते; मात्र आता परिस्थिती गंभीर बनली असून शेकडो संशयित रुग्ण आणि मोठ्या प्रमाणावर मृत्यूंची नोंद होत आहे. युगांडामध्येही संसर्ग सीमावर्ती भागातून वेगाने पसरत असल्याने आफ्रिकन देशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दक्षिण सुदानमध्येही अलर्ट जारी करण्यात आला असून आरोग्य यंत्रणा उच्च सतर्कतेवर ठेवण्यात आली आहे.
सर्वात मोठी चिंता म्हणजे या विषाणूवर अद्याप पूर्णपणे प्रभावी आणि सर्वमान्य उपचार उपलब्ध नाहीत. काही प्रयोगात्मक लसी वापरल्या जात असल्या तरी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आरोग्य यंत्रणांना मोठे आव्हान उभे ठाकले आहे. WHO ने दिलेल्या माहितीनुसार काँगोमध्ये संशयित रुग्णांची संख्या ८०० च्या पुढे गेली असून मृतांचा आकडा २०० च्या वर पोहोचला आहे. संघर्षग्रस्त भाग, कमकुवत आरोग्य सुविधा, सीमावर्ती हालचाली आणि उशिरा होणारी तपासणी यामुळे संसर्गाचा फैलाव रोखणे कठीण बनत आहे.
WHO चे महासंचालक टेड्रोस अधानोम घेब्रेयेसस यांनी या उद्रेकाचा वेग अत्यंत चिंताजनक असल्याचे म्हटले आहे. विशेषतः शहरी भागांमध्ये रुग्ण आढळल्याने संसर्ग आणखी वेगाने वाढू शकतो, असा इशाराही त्यांनी दिला. आफ्रिका CDC नेही सदस्य देशांना अत्यंत सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
भारतात अद्याप इबोलाचा एकही रुग्ण आढळलेला नसला तरी केंद्र सरकार कोणतीही जोखीम घेण्याच्या मनःस्थितीत नाही. आरोग्य तज्ज्ञांच्या मते इबोला हा कोविडसारखा हवेतून सहज पसरणारा विषाणू नसला तरी संक्रमित व्यक्तीच्या रक्त, घाम किंवा शारीरिक द्रवांच्या संपर्कातून तो अतिशय वेगाने फैलावू शकतो. त्यामुळे लवकर निदान, विलगीकरण आणि कठोर खबरदारी हेच या धोकादायक विषाणूविरोधातील सर्वात प्रभावी शस्त्र मानले जात आहे.







