काही दिवसांपूर्वी कॉक्रोच जनता पार्टीची स्थापना झाली. त्यानंतर सोशल मीडियावर वादळ आल्याची चर्चा आहे. इन्स्टाग्राम, एक्स जिथे तिथे कॉक्रोच पोस्टी सुरू आहेत. जणू माहिष्मतीच्या सत्तेवर बसलेल्या भल्लाळदेवचा नायनाट करण्यासाठी अमरेंद्र बाहुबली जन्माला आलाय अशा थाटात विरोधक हर्षोल्हासाने चित्कारतायत. अखेर जेन झी जागा झाल्यामुळे आता भाजपाची काही धडगत नाही, अशा प्रकारच्या प्रतिक्रीयांचा सोशल मीडियात पूर आलेला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सत्ता या पूरात वाहून जाणार, २०२९ मध्ये किंवा त्या आधीच तख्तापालट होणार दावे केले जातायत. हे प्रत्यक्षात येऊ शकते त्यासाठी फक्त काही अटी पूर्तता व्हायला.
सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी आरटीआय एक्टीव्हीस्ट आणि तत्सम मंडळींवर १५ मे रोजी केलेल्या एका टिप्पणीनंतर एका दिवसात कॉक्रोच जनता पार्टी जन्माला आली. चार दिवसात रोपट्याचा वटवृक्ष झाला. विरोधकांसाठी तर एक रेडीमेड आधारवड अस्तित्वात आला. देशातील तरुणाई कॉक्रोच जनता पार्टीच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहाते आहे. ही जेन झी क्रांतिची सुरूवात आहे, असा विश्वास व्यक्त करून विरोधक आनंद व्यक्त करताना दिसत आहेत.
यात काही भाजपासमोर हरलेले विरोधक आहेत, तर काही येत्या काळात हरणारे आहेत. मनिष सिसोदीया, अखिलेश यादव, महुआ मोईत्रा, संजय राऊत, योगेंद्र यादव, हे राजकीय नेते ध्रुव राठी, अनुराग कश्यप, कुणाल कामरा यांनी लगेचच कॉक्रोच जनता पार्टीची भलामण करायला सुरूवात केली. पुन्हा एकदा देशात जेन झी क्रांतीचे दावे सुरू झाले.
हे सगळे होते आहे, त्याचे टायमिंग लक्षात घेण्याची गरज आहे. प.बंगालच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा विजय झाला. आसाममध्येही झाला, परंतु प.बंगालचा गढ अजिंक्य आहे, असा समज होता. भाजपाने तो मोडीत काढला आणि तृणमूल काँग्रेसचा कडेलोट केला. या निकालानंतर काँग्रेसचे चायबिस्कूट पत्रकारही बोलू लागले होते की, आता भाजपाला हरवणे शक्य नाही. २०२९ च्या निवडणुकांमध्ये पुन्हा भाजपाचे सरकार येणार. ९ मे रोजी प.बंगालमध्ये भाजपा सरकारचा शपथविधी झाला त्यानंतर आठवड्याभराच्या आता कॉक्रोच बाहेर पडले.
देशातील विरोधक भाजपाच्या विजय अभियानामुळे साफ जेरीला आलेले आहेत. ‘फक्त भाजपाच कसा जिंकतो?’, असा प्रश्न संजय राऊत यांना पडतो. ते कधी जाहीरपणे तर कधी आडून आडून इव्हीएमकडे बोट दाखवत असतात. बॅलटवर निवडणुका घेऊन दाखवा असे आव्हान देत असतात. परंतु ते विसरतात की ‘दोन भाऊ’ एकत्र आल्यानंतर त्यांना बेस्ट एम्प्लॉईज को ऑपरेटीव्ह क्रेडीट सोसायटीच्या निवडणुकीत माती खावी लागली होती. जिथे निवडणुका बॅलेटवर झाल्या होत्या.
सोशल मीडियावर मोदींवर आचरट पोस्टी टाकून, खोटेनाटे आरोप करून, अफवा पसरवून, ध्रुव राठी आणि रवीश कुमारचे व्हीडीयो सोशल मीडियावर फॉर्वर्ड करून भाजपाचा पराभव करता येईल, असा भ्रम काँग्रेसवाल्यांना आहे. महाराष्ट्रातही ठाकरेंचा समज असाच आहे. सामनातील अग्रलेख वाचून जनभावना बदलते. मातोश्रीवर घेतलेल्या पत्रकार परिषदांमध्ये केलेल्या कोट्या आणि त्यावर हशा आणि टाळ्या देणाऱ्या चायबिस्कुट पत्रकारांची साथ, त्यांनी सोशल मीडियावर केलेल्या पाठिंब्याच्या पोस्टी हा विजयाचा फॉर्म्यूला आहे. हे भ्रम अजरामर आहेत. प.बंगालच्या निकालानंतरही त्याला तडा गेलेला नाही.
निवडणुका जिंकण्यासाठी रणनीती लागते, नेत्यांचे, कार्यकर्त्यांचे कठोर परीश्रम लागतात, मैदानात उतरून घाम गाळावा लागतो. उन्हातान्हात दौरे करावे लागतात. यातले काही विरोधकांना मान्य नाही. सोशल मीडियावर मोदीविरोधी धुरळा उडवून द्यायचा, मुस्लीम मतांची चाटुकारीता करायची कि बस, विजय आपलाच… यावर त्यांचा ठाम विश्वास आहे.
सततच्या पराभवामुळे पदरी घाऊक निराशा पडत असली तरी विरोधक हा फॉर्मूला बदलायला तयार नाहीत. स्वकर्तृत्वावर विश्वास नसलेला खचलेला, पिचलेला माणूस कायम मसीहाच्या प्रतीक्षेत असतो. जेव्हा बांगलादेशमध्ये जेन झी क्रांती झाली होती, तेव्हा विरोधकांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. मोदी नेसत्या कपड्यांसह पळतायत, अशी स्वप्न राहुल गांधी यांना पडत होती. परंतु हा स्वप्नदोष ठरला. प.बंगालच्या विजयानंतर तर राहुल गांधी यांची झोप उडाली आहे, त्यामुळे स्वप्न पडण्याचीही शक्यता उरलेली नाही. अभिजित दिपके हा अशा मरगळलेल्यासाठी मसीहा बनून आला आहे.
हा आम आदमी पार्टीच्या सोशल मीडिया सेलचा माणूस. मनिष सिसोदीयांचा अगदी खास आहे. कॉक्रोच पार्टीचा प्रयोग करण्यापूर्वी तो अलिकडेच अमेरिकेतील बोस्टनमध्ये जाऊन आला होता. त्याच्या आगमनामुळे मोदीविरोधक सुखावले आहेत. मोदी विरोधी चायबिस्कूट मीडियाने मथळे दिले की एका मराठी मुलाचा सोशल मीडियावर धुमाकूळ. विरोधक याच्या आगमनामुळे प्रचंड सुखावले आहेत. आहे. जो दिल्लीत आम आदमी पार्टीचा दारुण पराभव टाळू शकला नाही, तो मोदींना सत्तेवरून हटवेल, अशी आशा मोदीविरोधी राजकीय पक्ष आणि मीडियाच्या मनात निर्माण झाली आहे.
हा मुलगा सोशल मीडियावर येऊन सांगतोय, ‘चार दिवसात माझे एक कोटी फॉलोअर्स झाले. जे करायला भाजपाला १४ वर्षे लागली, ते आम्ही चार दिवसात केले. तुमचे भविष्य उद्ध्वस्त करणाऱ्या भाजपाला अनफोलो करा.’ हे बरे झाले की, याने त्याचा अजेंडा स्पष्ट करून टाकला. या माहितीची सांगड देशातील सर्वसामान्य माणूस लावू शकतो.
एखादी गोष्ट घडत असताना त्याचे टायमिंग लक्षात घेण्याची गरज आहे. दोन दिवसांपूर्वी रायबरेलीच्या सभेत राहुल गांधी म्हणतात, ‘देशात महागाईचा आगडोंब उसळणार आहे. देशाची अर्थव्यवस्था बरबाद होणार आहे.’
इराण युद्धामुळे जगासमोर एक मोठे आर्थिक संकट उभे आहे. जगातील देशांचे अर्थकारण एकमेकांशी घट्ट जोडलेले आहे. जगात असा एकही देश नाही, ज्याला इराण युद्धाची झळ बसलेली नाही. अमेरिकेत पेट्रोल डिझेलच्या किमती ४५ टक्क्यांनी वाढल्या, चीनमध्ये हे प्रमाण ३० टक्के आहे. भारतात किमती फक्त ५ टक्क्यांनी वाढल्या आहेत. २१ मे रोजी चीनच्या शेअर बाजारात विक्रमी घसरण झाली. एक दिवसात २ ट्रिलियन युआनचा गुंतवणुकदारांना फटका बसला. कमी झालेले औद्योगिक उत्पादन, विक्रीत झालेली घट, रिअल इस्टेट क्षेत्रात आलेली अभूतपूर्व मंदी याचे पडसाद या घसरणीची निमित्ताने पाहायला मिळाले.
भारतात तेलाची किंमत कडाडल्यामुळे आपल्या आयात बिलावर ताण पडलेला आहे. रुपया घसरतो आहे. ‘क्रुड तेलाच्या किंमती कडाडल्यामुळे भारतील तेल कंपन्यांना दररोज एक हजार कोटींचे नुकसान होते आहे’, अशी जाहीर कबुली आपले पेट्रोलियम मंत्री हरदिप सिंह पुरी यांनी दिलेली आहे. याचा एकूण परीणाम अर्थकारणावर होणार हे निश्चित, महागाई येणार हे अटळ आहे.
हा सगळा घटनाक्रम बाजूला ठेवायचा आणि पंतप्रधान मोदी यांच्या डोक्यावर याचे खापर फोडायचे असा कार्यक्रम आधीच निश्चित झालेला आहे. महान अर्थतज्ज्ञ आदित्य ठाकरे यांच्यापासून राहुल गांधी यांच्या पर्यंत सगळ्यांनीच मोदींच्या नावाने कडाकडा बोटे मोडायला सुरूवात केली आहेत. त्यात आता भर पडली आहे अभिजीत दिपके या नव्या मसीहाची. ‘भाजपाने तुमचे रोजगार हिसकावले, तुमचे भविष्य बरबाद केले म्हणून भाजपाला अनफॉलो करा, ही तर सुरूवात आहे. इराण युद्ध मोदींमुळे झाले, तेलाच्या किमतीही मोदींमुळे वाढल्या’, इथपर्यंत हा हवेतील गोळीबार जाऊ शकतो.
सोशल मीडियावर मोदींना शिव्या घातल्या तर त्यांना सत्तेवरून हटवता येईल हा गैरसमज राहुल गांधी, अऱविंद केजरीवाल या सर्वांना आहे. अनेक पराभवानंतर यात अजिबात कमतरता आलेली नाही. शशी थरुर यांच्यासारख्यालाही अप्रुप वाटले की कॉक्रोच जनता पार्टीला इन्स्टाग्रामवर चार दिवसांत दीड कोटी फॉलोअर्स मिळाले. शशी थरुर यांना असे वाटत असेल तर महाराष्ट्रातले उथळ पाणी रोहीत पवारांना याचे अप्रुप वाटले तर नवल काय, त्यांनीही म्हटले आहे, कॉक्रोच जनता पार्टीला चार दिवसात भाजपापेक्षा जास्त फॉलोअर्स मिळाले.
सोशल मीडियावर पोस्टी टाकून जर भारतासारख्या विशाल पसारा असलेल्या देशात सत्ता मिळवता आली असती तर जॉर्ज सोरोस याने मोदींना हटवण्यासाठी दोन अब्ज डॉलर खर्च करण्याची घोषणा केल्यानंतर लगेचच त्यांचा एखादा पिट्टू सत्तेवर यायला हवा होता. प.बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसच्या अतिरेकी सरकारशी लढताना भाजपाला कार्यकर्त्यांचे बळी द्यावे लागले नसते. ही सगळी गंमतजंमत सुरू असताना बुजुर्ग अभिनेता आणि अलिकडेच राजकारणात पदार्पण करणारा नेता कमल हासन म्हणाला आहे की, पश्चिम आशियातील तणाव, जगावर आलेले ऊर्जा संकट, तेलाच्या वाढत्या किमती या संकटाच्या पार्श्वभूमीवर देशात राजकारण नको, देशाचे स्थान सर्वोच्च आहे. ज्याचे डोके ठिकाणावर आहे, अशा प्रत्येकाला येत्या काळात हीच भूमिका घ्यावी लागणार आहे. बाकी कॉक्रोचांचे काय करायचे याचा निर्णय घेण्यास जनता समर्थ आहे.
(न्यूज डंकाचे संपादक दिनेश कानजी यांचे संपादकीय)







