केरळमधील तिरुवनंतपुरमचे काँग्रेस खासदार डॉ. शशी थरूर यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे खुलेपणाने कौतुक करत राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आणले आहे. ‘प्रोजेक्ट सिंडिकेट’मध्ये प्रकाशित झालेल्या आपल्या लेखात थरूर यांनी मोदी यांच्या गेल्या १२ वर्षांच्या कार्यकाळाचे सविस्तर मूल्यांकन करत भारताच्या बदलत्या प्रवासावर भाष्य केले आहे. हा लेख त्यांच्या कार्यालयाने गुरुवारी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वरही शेअर केला.
थरूर यांनी लिहिले आहे की, गेल्या १२ वर्षांत भारतात मोठ्या प्रमाणावर मूलभूत बदल झाले असून आर्थिक आधुनिकीकरण, पायाभूत सुविधा, प्रशासनाची कार्यक्षमता आणि सरकारी क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने मोदी सरकारने उल्लेखनीय प्रगती केली आहे. त्यांच्या मते, या काळात भारताने २१व्या शतकातील आपल्या विकासाचा स्पष्ट मार्ग निश्चित केला आहे. मात्र, त्यांनी याचबरोबर संस्थात्मक स्वायत्तता, लोकशाही संस्थांची मजबुती आणि अल्पसंख्याकांचा सहभाग या मुद्द्यांवर चिंता व्यक्त करत या क्षेत्रांमध्ये घसरण झाल्याचेही नमूद केले आहे.
हे ही वाचा:
किंमत वाढलीच नाही, मग दरकपात कशासाठी?
वैभवला संधी मिळावी, पण कोणालाही वगळून नाही!
हॅरी केनची दुहेरी गोलांची कमाल
विंबल्डनमध्ये जोकोविचची दणदणीत आगेकूच; सित्सिपासवर सरळ सेटमध्ये मात
लेखात थरूर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय प्रवासाचाही विशेष उल्लेख केला आहे. सलग सर्वाधिक काळ निवडून आलेले पंतप्रधान म्हणून मोदी यांनी १० जून रोजी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांचा ४,३९८ दिवसांचा विक्रम मागे टाकल्याची आठवण त्यांनी करून दिली. या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्योत्तर भारतातील सर्वाधिक प्रभावशाली नेत्यांमध्ये जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि नरेंद्र मोदी यांचा समावेश होत असल्याचे मत त्यांनी स्पष्टपणे मांडले.
काँग्रेसचे वरिष्ठ नेते असूनही मोदींच्या नेतृत्वाविषयी थरूर यांनी व्यक्त केलेले सकारात्मक मत पुन्हा एकदा राजकीय चर्चेचा विषय ठरले आहे. त्यांच्या या लेखामुळे मोदी सरकारच्या कामगिरीबाबत तसेच भारताच्या भविष्यातील विकासाच्या दिशेबाबत नव्याने चर्चा सुरू झाली आहे.
