गृहमंत्रालयाने प्रसिद्ध हवामान कार्यकर्ते सोनाम वांगचुक यांनी स्थापन केलेल्या Students Educational and Cultural Movement of Ladakh (SECMOL) या संस्थेचा परकीय निधी परवाना FCRA रद्द केला आहे. मंत्रालयाने यामागे कायद्याचे अनेक उल्लंघन झाल्याचा ठपका ठेवला आहे.
लडाख आंदोलनातील हिंसाचारानंतर कारवाई
बुधवारी लडाखला स्वतंत्र राज्य म्हणून केलेल्या मागणीसाठी लेहमध्ये झालेल्या आंदोलनाने हिंसक स्वरूप धारण केले. आंदोलकांनी भाजप कार्यालय, हिल कौन्सिल मुख्यालयावर हल्ला केला. अनेक वाहनांना आग लावली. पोलिस व अर्धसैनिक दलांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अश्रुधुराचा वापर केला.
या संघर्षात ४ जण ठार झाले, तर ८० हून अधिक जखमी, त्यात ४० पोलीस कर्मचारीही होते. यानंतर लेहमध्ये कर्फ्यू लागू करण्यात आला.
केंद्र सरकारचा आरोप : “हिंसा वांगचुकमुळे”
केंद्राने हिंसेसाठी थेट सोनाम वांगचुक यांना जबाबदार धरले. त्यांचे उपोषण व “उत्तेजक भाषणे” यामुळे जमाव पेटला, असे सरकारचे म्हणणे आहे. वांगचुक यांनी केलेल्या अरब स्प्रिंग आणि नेपाळच्या Gen Z आंदोलनांच्या संदर्भामुळे आंदोलन चिघळल्याचा आरोप आहे.
दरम्यान, गुरुवारी वांगचुक यांनी गृहमंत्रालयाचे आरोप फेटाळले. त्यांनी म्हटले, हे केवळ बळीचा बकरा बनवण्याचे तंत्र आहे. मूळ प्रश्नांकडे दुर्लक्ष केले जात आहे. कधी माझ्यावर, तर कधी काँग्रेसवर दोष ढकलून प्रश्न सुटणार नाही. मला PSA (Public Safety Act) अंतर्गत अटक झाली तरी मी तयार आहे.”
हे ही वाचा:
ताहिर हुसेन यांचा जामीन अर्ज रद्द
पंतप्रधान मोदींची राजस्थानला ₹१.२२ लाख कोटींच्या प्रकल्पांची भेट!
“भारतासोबत समस्या आहे कारण…” मुहम्मद युनूस भारताबद्दल पुन्हा बरळले
NGO वरील उल्लंघनांचे मुद्दे
SECMOL संस्थेला २० ऑगस्ट रोजी नोटीस पाठवण्यात आली होती. १० सप्टेंबरला स्मरणपत्र देण्यात आले. १९ सप्टेंबरला संस्थेने उत्तर दिले. मंत्रालयाने उत्तर तपासल्यानंतर खालील उल्लंघने दाखवली. अनियमित ठेवी – २०२१-२२ मध्ये ३.५ लाख रुपये FCRA खात्यात जमा. (संस्थेचा दावा – जुनी बस विकून मिळालेली रक्कम, पण मंत्रालयाला उत्तर ग्राह्य नाही वाटले.
२०२०-२१ मध्ये ५४,६०० रुपये स्थानिक व्यक्तींकडून चुकून FCRA खात्यात जमा. मंत्रालयाने हे कायद्याचे उल्लंघन मानले.
परकीय निधीचा वापर सार्वभौमत्व अभ्यासासाठी – स्वीडिश संस्थेकडून (Framtidsjorden) ४,९३,२०५ रुपये मिळाले, त्यात सार्वभौमत्व विषयाचा अभ्यास समाविष्ट होता. मंत्रालयाने हे राष्ट्रीय हिताच्या विरोधात मानले.
देणगी परत करणे – १९,६०० रुपये २०२१ मध्ये एका दात्याला परत केले. मंत्रालय म्हणते – “कायद्यात देणगी परत करण्याची तरतूदच नाही.”
न नोंदवलेले उत्पन्न – ७९,२०० रुपयांची नोंद झाली पण ती FCRA खात्यात दाखल केली नाही. मंत्रालयाने याला “हिशेब व्यवस्थित न ठेवणे” असे म्हटले.
FCRA परवाना रद्द
या सर्व उल्लंघनांमुळे गृहमंत्रालयाने कलम १४(१) अंतर्गत तात्काळ प्रभावाने SECMOL चा FCRA नोंदणी प्रमाणपत्र रद्द करण्याचा आदेश दिला. आदेशात म्हटले आहे : “हे सक्षम प्राधिकाऱ्यांच्या मान्यतेने जारी करण्यात आले आहे.”







