भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे गणेशोत्सवाच्या काळात उबाठा शिवसेनेचे डोंबिवली कल्याणचे जिल्हाप्रमुख दीपेश म्हात्रे यांच्या घरी गणेशदर्शनासाठी गेले तेव्हापासून विचारल्या जात असलेल्या प्रश्नाचे उत्तर रविवारी मिळाले. दीपेश म्हात्रे यांनी अखेर भाजपात प्रवेश केला असून त्यामुळे उबाठा गटाला मोठे खिंडार पडले आहे.
दीपेश म्हात्रे हे तीनवेळा नगरसेवक म्हणून निवडून आले असून स्थायी समितीचे सभापतीही राहिलेले आहेत. दीपेश म्हात्रे यांच्यासोबत काँग्रेसचे संतोष केणे हेदेखील भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे.
दीपेश म्हात्रे यांचा कल्याण डोंबिवलीच्या स्थानिक राजकारणात दबदबा आहे. त्यांचे वडील हेदेखील महापौर राहिलेले आहेत तर आई आणि बंधूदेखील नगरसेवक म्हणून कार्यरत होते.
हे ही वाचा:
भारताला मातृभूमी मानणारे सर्व ‘हिंदू’
केंद्राने टाकाऊ वस्तूतून कमावले ८०० कोटी
जंगल जंगल बात चली है, पता चला है…राहुल गांधी मध्य प्रदेशात जंगल सफारीवर
ISISशी संबंधित तीन दहशतवाद्यांना गुजरातमधून अटक
दीपेश म्हात्रे यांच्या प्रवेशामागे माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांचाही वाटा असल्याचे बोलले जाते. कारण कपिल पाटील हे म्हात्रे यांचे नातेवाईक आहेत. कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने ही मोठी खेळी मानली जात असून त्यातून ठाकरे गटाला कसा फटका बसेल हे येत्या काळात स्पष्ट होईल.
कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत भाजपाचा महापौर बसेल हे रवींद्र चव्हाण यांनी आधी घोषित केले आहे. त्यादृष्टिने दीपेश म्हात्रे यांच्या भाजपा प्रवेशाला वेगळे महत्त्व प्राप्त होते.
दीपेश म्हात्रे यांनी भाजपाची वाट धरल्यानंतर तात्यासाहेब माने यांची जिल्हाप्रमुख म्हणून तात्पुरती नियुक्ती करण्यात आली आहे. शिवाय, कल्याण ग्रामीण जिल्हाप्रमुख म्हणून रोहिदास मुंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. स्थानिक नेतृत्वाला संधी देऊन पक्ष मजबूत करण्याचा उबाठा गटाचा प्रयत्न असेल.







