काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी यापूर्वी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीबाबत मोठी घोषणा केली होती. मुंबई महानगरपालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार, असे त्यांनी म्हटले होते. यावर आता कॉंग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनीही भूमिका मांडत कॉंग्रेसने एकला चलोचा नारा का दिला आहे यावर भाष्य केले आहे.
वर्षा गायकवाड म्हणाल्या की, “मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका या सर्वांना घेऊन झाल्या पाहिजेत. मुंबईत सर्व राज्यांमधून लोक येऊन विकासामध्ये योगदान देत असतात. त्यामुळे दडपशाही करणारे आणि कायदा हातात घेणाऱ्या लोकांसोबत आम्ही जाऊ शकत नाही,” असे म्हणत त्यांनी ठाकरे गट आणि मनसे यांच्यातील युतीबद्दल भाष्य केले आहे. त्यामुळे मनसेच्या येण्यामुळे महाविकास आघाडीला तडा गेल्याच्या चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.
वर्षा गायकवाड यांनी सांगितले की, दोन महिन्यांपूर्वी आम्ही महाविकास आघाडी म्हणून नाही तर स्वबळावर निवडणुका लढवणार आहोत, असे संजय राऊत यांनी सांगितलं होतं. ही निवडणूक स्थानिक पातळीवरची असल्याने आम्ही एकट्याने लढू शकतो, अशी भूमिका त्यांनी मांडली होती. बाकी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही भाऊ एकत्र आले तर आम्ही शुभेच्छाच देतो. पण हा निर्णय घेताना आमच्याशी चर्चा व्हायला हवी होती. काँग्रेस पक्ष हा आघाडी करताना एक किमान समान कार्यक्रम समोर ठेवून आघाडी करतो. इंडिया आघाडी असो किंवा महाविकास आघाडी असो, आमच्यासाठी संविधान हा समान धागा राहिलेला आहे, असेही त्यांनी सांगितले.
शरद पवार यांची भेट घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना वर्षा गायकवाड म्हणाल्या की, आज आमची शरद पवार यांच्यासोबत खूप चांगली चर्चा झाली. आमची आघाडी नैसर्गिक आणि सातत्य असलेली आघाडी आहे. आम्ही लोकशाही आणि संविधान मानतो. मुंबईमध्ये मुंबईची एकता अबाधित राहिली पाहिजे. तसेच मुंबईच्या मुद्द्यावरच निवडणूक लढली पाहिजे, अशी भूमिका आम्ही शरद पवार यांच्यासमोर मांडली.
हे ही वाचा:
सम्राट चौधरी, विजय सिन्हाचं राहणार बिहारचे उपमुख्यमंत्री!
आंध्र प्रदेशात ‘टेक’ शंकरसह सात नक्षलवादी ठार
काँग्रेस खासदार इम्रान मसूद म्हणतात, तो दहशतवादी एक वाट चुकलेला तरूण!
अमेरिकेतून अनमोल बिश्नोई हद्दपार; भारतात आणणार
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केला असून पहिल्या टप्प्यात राज्यातील २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा करण्यात आली आहे. यानंतर उर्वरित टप्प्याच्या निवडणुकाही आता लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. याचं पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी करण्यास सुरुवात केली आहे. एकीकडे ठाकरे बंधू मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी एकत्र येऊन लढण्याची शक्यता असतानाचं कॉंग्रेसने मात्र उद्धव ठाकरेंना डच्चू दिला आहे.







