टीकेची झोड उठताचं वडेट्टीवारांची माघार; माफी मागत दिले स्पष्टीकरण

पहलगाम हल्ल्यावरून केले होते वादग्रस्त विधान

टीकेची झोड उठताचं वडेट्टीवारांची माघार; माफी मागत दिले स्पष्टीकरण

जम्मू काश्मीरमधील पहलगाम हल्ल्यानंतर देशभरातून शोक व्यक्त केला जात असताना कॉंग्रेस नेत्यांकडून येणाऱ्या विधानांमुळे नव्या वादाला तोंड फुटत आहे. यावरून कॉंग्रेसला लक्ष्य करण्यात येत असताना महाराष्ट्रातील काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनीही असेच वादग्रस्त विधान केले होते. त्यांनी केलेल्या वक्तव्यावरुन मुख्यमंत्र्यांसह सत्ताधाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी हल्ला करताना धर्म विचारला नाही, एवढा वेळ असतो का? असं वादग्रस्त आणि संतापजनक वक्तव्य त्यांनी केले होते. यावर सर्वच स्तरावरून संताप व्यक्त होताचं आता विजय वडेट्टीवार यांनी मवाळ भूमिका घेत माफी मागितली आहे.

विजय वडेट्टीवार यांच्यावर टीका होत असतानाचं त्यांनी विधानाचे स्पष्टीकरण देत माफी मागितली आहे. विजय वडेट्टीवार यांनी माध्यमांना सांगितले की, “मी काल जे बोललो ते अर्धवट समोर आणले गेले. मी म्हणालो होतो की सहसा दहशतवाद्यांना हल्ला करण्यापूर्वी धर्म किंवा जातीबद्दल विचारण्याची वेळ नसते, परंतु जीव घेण्यापूर्वी धर्म विचारण्याची ही पहिलीच घटना घडली आहे. कोणाच्याही भावना दुखावण्याचा त्यांचा हेतू नव्हता. जर माझ्या शब्दांमुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी त्याबद्दल माफी मागतो,” असे वडेट्टीवार म्हणाले.

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार म्हणाले होते की, “दहशतवादी हल्ला करतेवेळी लोकांशी बोलत बसतात का? धर्म विचारत बसतात का? दहशतवाद्यांकडे इतका वेळ नाही की समोरचा हिंदू आहे की मुस्लिम हे विचारत बसतील. या संपूर्ण प्रकरणात अनेक गोष्टी आहेत, लोक वेगवेगळे बोलत आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या गोष्टी घडत आहेत. दहशतवाद्यांना कोणताही धर्म नसतो. दहशतवाद्यांनी देशावर हल्ला केला आहे आणि म्हणून त्यांना पकडले पाहिजे आणि त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे. आज संपूर्ण देशाची ही भावना आहे. पण वेगवेगळ्या गोष्टी सांगून मूळ मुद्द्यांपासून दूर जाणे चुकीचे आहे,” असे वादग्रस्त विधान वडेट्टीवार यांनी केले.

हे ही वाचा..

सलग पाचव्या दिवशी पाककडून शस्त्रसंधीचे उल्लंघन; कुपवाडा, बारामुल्लामधील चौक्या लक्ष्य

पाकिस्तानसमोर मोठा प्रश्न : नवाज यांनी पीएम शहबाजना काय सल्ला दिला?

“पाकिस्तानसोबत चर्चा नकोच! कारवाई करा…” पहलगाम हल्ल्यानंतर काय म्हणाले फारुख अब्दुल्ला?

“मल्लिकार्जुन खरगे, राहुल गांधींचे त्यांच्या पक्षावर नियंत्रण नाही का?”

देवेंद्र फडणवीस यांनी यावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, “अशा प्रकारची वक्तव्ये करुन जे मृत्यूमुखी पडले आहेत त्यांच्या नातेवाईकांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम सुरू आहे. नातेवाईकांचे म्हणणं सर्व माध्यमांनी दाखवले. ज्यांच्या समोर दहशतवाद्यांनी मारले त्या नातेवाईकांनी तिकडची घटना सांगितली आहे. तिथे विजय वडेट्टीवार नव्हते. इथे बसून अशा प्रकारची वक्तव्ये करुन नातेवाईकांच्या जखमेवर मीठ चोळणे अतिशय वाईट आहे. याला मूर्खपणा म्हणावं की काय हे मला समजत नाही.”

Exit mobile version