वीर सावरकर निसटले त्या मार्सिलेला मोदींनी भेट दिली त्यात गैर काय?

दक्षिण फ्रान्समधील मार्सिले ऐतिहासिक शहराच्या भेटीवरून संजय राऊत यांची प्रतिक्रिया

वीर सावरकर निसटले त्या मार्सिलेला मोदींनी भेट दिली त्यात गैर काय?

पंतप्रधान मोदी हे फ्रान्स दौऱ्यावर असून त्यांनी दक्षिण फ्रान्समधील मार्सिले या ऐतिहासिक शहराला भेट दिली. यावेळी त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना श्रद्धांजली वाहिली. सावरकरांनी याचं बंदर शहरातून धैर्य दाखवून पळून जाण्याचा प्रयत्न केला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी एक्सवर म्हटले आहे की, भारताच्या स्वातंत्र्याच्या शोधात, या शहराचे विशेष महत्त्व आहे. येथेच महान वीर सावरकरांनी धैर्याने निसटण्याचा प्रयत्न केला. मला मार्सिलेच्या लोकांचे आणि त्या काळातील फ्रेंच कार्यकर्त्यांचेही आभार मानायचे आहेत ज्यांनी त्यांना ब्रिटिशांच्या ताब्यात देऊ नये अशी मागणी केली होती. वीर सावरकरांचे शौर्य पिढ्यांना प्रेरणा देत राहते!

ब्रिटीश वसाहतवादी राजवटीत, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी ८ जुलै १९१० रोजी कैदेतून निसटण्याचा प्रयत्न केला होता, जेव्हा त्यांना खटल्यासाठी ‘मोरिया’ या ब्रिटिश जहाजातून भारतात नेले जात होते. जहाज भारताकडे जात असताना त्यांनी निसटण्याचा प्रयत्न केला. जहाजाच्या एका छिद्रातून त्यांनी स्वतःची सुटका केली आणि पोहत किनारा गाठला. त्यावेळी ते काही काळासाठी कैदेतून सुटले होते पण शेवटी फ्रेंच अधिकाऱ्यांनी त्यांना पकडले आणि ब्रिटिशांच्या स्वाधीन केले. पुढे त्यांच्या आश्रय आणि प्रत्यार्पणावरून वादविवाद सुरू झाले. फ्रान्स आणि ब्रिटनमध्ये राजनैतिक वाद निर्माण झाला. भारतात नेल्यानंतर, ब्रिटिशांनी सावरकरांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

हे ही वाचा : 

पंतप्रधान मोदींच्या विमानावर हल्ला होणार असल्याची खोटी माहिती देणाऱ्याला चेंबूरमधून अटक

एकनाथ शिंदेंचा सत्कार करणाऱ्या शरद पवारांवर राऊत संतापले

भारतीय सैन्याविरुद्ध केलेल्या वक्तव्याबद्दल राहुल गांधींना समन्स

राम मंदिराचे मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांचे निधन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या फ्रान्समधील मार्सिले भेटीवर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत असताना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मात्र या भेटीचे स्वागत केले आहे. शिवाय ऐतिहासिक महत्त्वही अधोरेखित केले आहे. संजय राऊत म्हणाले की, वीर सावरकर जिथून निसटले त्या ठिकाणाला पंतप्रधानांनी भेट देणे यात काहीही गैर नाही. ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे.

Exit mobile version