श्री राम मंदिराचे मुख्य पुजारी सत्येंद्र दास यांचे निधन झाले आहे. वयाच्या ८५ व्या वर्षी लखनऊ पीजीआय येथे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ३ फेब्रुवारी रोजी मेंदूत रक्तस्त्राव झाल्यानंतर आचार्य सत्येंद्र दास यांना गंभीर अवस्थेत लखनऊ पीजीआयच्या न्यूरोलॉजी वॉर्डच्या एचडीयूमध्ये दाखल करण्यात आले होते. यानंतर आचार्य सत्येंद्र दास यांचे बुधवारी सकाळी ८ वाजता लखनऊच्या पीजीआयमध्ये निधन झाले. सत्येंद्र दास यांच्या निधनाने अयोध्येच्या मठ मंदिरांमध्ये शोककळा पसरली आहे.
सत्येंद्र दास यांचे शिष्य त्यांचे पार्थिव घेऊन अयोध्येला रवाना झाले असून पार्थिव पीजीआयहून अयोध्येत आणले जात आहे. गुरुवार, १३ फेब्रुवारी रोजी अयोध्येत शरयू नदीच्या काठावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एक्सवर भावना व्यक्त करत लिहिले आहे की, “महान रामभक्त, श्री रामजन्मभूमी मंदिर, श्री अयोध्या धामचे मुख्य पुजारी, आचार्य श्री सत्येंद्र कुमार दास जी महाराज यांचे निधन अत्यंत दुःखद आहे आणि आध्यात्मिक जगताचे कधीही भरून न येणारे नुकसान आहे. विनम्र श्रद्धांजली! मी प्रभू श्री रामांना प्रार्थना करतो की त्यांनी दिवंगत आत्म्याला त्यांच्या चरणकमलांमध्ये स्थान द्यावे आणि त्यांच्या शिष्यांना आणि अनुयायांना हे मोठे नुकसान सहन करण्याची शक्ती द्यावी.”
सत्येंद्र दास यांनी सुमारे ३३ वर्षे राम मंदिराच्या सेवेत घालवली. फेब्रुवारी १९९२ मध्ये, जेव्हा ‘वादग्रस्त जमिनी’मुळे रामजन्मभूमीची जबाबदारी जिल्हा प्रशासनाकडे सोपवण्यात आली, तेव्हा जुने पुजारी महंत लालदास यांना काढून टाकण्याबाबत चर्चा सुरू झाली. दरम्यान, १ मार्च १९९२ रोजी सत्येंद्र दास यांची नियुक्ती भाजप खासदार विनय कटियार, विश्व हिंदू परिषद नेते आणि तत्कालीन विश्व हिंदू परिषदेचे प्रमुख अशोक सिंघल यांच्या संमतीने करण्यात आली.
हे ही वाचा :
हिंदू असल्यामुळे शिवकुमार शर्मांची हत्या?, आरोपींचा तबलिगी जमातशी संबंध?!
अंबानी कुटुंब पोहोचले महाकुंभात, संगमात केले स्नान!
जम्मूच्या अखनूर सेक्टरमध्ये आयईडी स्फोट, कॅप्टनसह दोन जवान हुतात्मा!
इस्लाममधून सनातन धर्म स्वीकारणाऱ्यांना दरमहा ३ हजार रुपये!
१९९२ मध्ये जेव्हा त्यांची राम मंदिरात नियुक्ती झाली तेव्हा त्यांना दरमहा १०० रुपये पगार मिळत असे. २०१८ पर्यंत सत्येंद्र दास यांचा पगार फक्त १२ हजार रुपये दरमहा होता. २०१९ मध्ये, अयोध्या आयुक्तांच्या सूचनेनुसार, त्यांचे वेतन १३,००० रुपये करण्यात आले. सत्येंद्र दास यांनी एका मुलाखतीदरम्यान सांगितले होते की, त्यांनी १९७५ मध्ये संस्कृत विद्यालयातून आचार्य पदवी प्राप्त केली होती. यानंतर, १९७६ मध्ये, त्यांना अयोध्येतील संस्कृत महाविद्यालयात व्याकरण विभागात सहाय्यक शिक्षकाची नोकरी मिळाली.