जम्मू आणि काश्मीरमधील अखनूर सेक्टरमध्ये मंगळवारी (११ फेब्रुवारी) आयईडी स्फोट झाला. या स्फोटात दोन जवान हुतात्मा झाले आणि एक जवान जखमी झाला, असे भारतीय लष्कराने सांगितले. एलओसीजवळ लष्कराचे जवान गस्त घालत असताना दुपारी ३:३० वाजता ही घटना घडली. स्फोटानंतर सुरक्षा दलाकडून परिसरात शोध मोहीम सुरू आहे.
माहिती देताना लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले की, भट्टल परिसरात स्फोट झाला तेव्हा सैनिक गस्त घालत होते. या स्फोटात तीन जवान गंभीररित्या जखमी झाले. जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान दोन जवानांना हौतात्म्य प्राप्त झाले. यामध्ये एका कॅप्टनचा समावेश आहे. स्फोट झालेला हा आयईडी दहशतवाद्यांनी पेरला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
हे ही वाचा :
इस्लाममधून सनातन धर्म स्वीकारणाऱ्यांना दरमहा ३ हजार रुपये!
‘संस्कृत’विरोधी दयानिधी मारनची लोकसभाध्यक्षांनी केली कानउघाडणी
उत्तर प्रदेशमध्ये हिंदू मुलाचे धर्मांतर करून लग्न लावण्याप्रकरणी मौलवीसह पाच जणांना अटक!
या स्फोटानंतर, नियंत्रण रेषेवर मोठ्या प्रमाणात शोध मोहीम सुरू करण्यासाठी अधिक सैन्य तैनात करण्यात आले आहे. भारतीय लष्कराच्या जम्मूस्थित व्हाईट नाईट कॉर्प्स युनिटने याबाबत माहिती दिली. सुरक्षा दलाकडून शोध मोहीम सुरु असल्याचे सांगितले. स्फोटात हुतात्मा झालेल्या जवानांना व्हाईट नाईट कॉर्प्सने सलाम करत श्रद्धांजली वाहिली.