लोकसभेत सहा नव्या भाषांमध्ये भाषांतर सेवांचा लाभ घेता येणार असल्याची घोषणा लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी केली आहे. मंगळवार, ११ फेब्रुवारी रोजी ओम बिर्ला यांनी संसदेत बोडो, डोगरी, मैथिली, मणिपुरी, उर्दू आणि संस्कृत या सहा नवीन भाषांमध्ये भाषांतर सेवांचा विस्तार करण्याची घोषणा केली.
दरम्यान, द्रमुक खासदार दयानिधी मारन यांनी लोकसभा अध्यक्षांच्या घोषणेवर आक्षेप घेतला. त्यांनी म्हटले की, जनगणनेनुसार केवळ ७०,००० लोक संस्कृतमध्ये बोलतात त्यामुळे भाषांतर करण्यासाठी सार्वजनिक पैसे का वाया घालवले जात आहेत. भारतातील कोणत्याही राज्यात ते संवादात्मक नाही. कोणीही ते बोलत नाही. २०११ च्या लोकसंख्या सर्वेक्षणात असे म्हटले आहे की फक्त ७३,००० लोक बोलत असावेत. तुमच्या आरएसएस विचारसरणीमुळे करदात्यांचा पैसा का वाया घालवला जावा? यावर प्रतिक्रिया देताना, ओम बिर्ला यांनी मारन यांना सुनावत म्हटले की, आपण कोणत्या देशात राहता? हा भारत आहे, ज्याची मूलभाषा संस्कृत आहे. म्हणूनच आम्ही फक्त संस्कृत नाही तर २२ भाषांचा उल्लेख केला. तुम्हाला संस्कृतबद्दल समस्या का आली?
यापूर्वी लोकसभेत हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त आसामी, बंगाली, गुजराती, कन्नड, मल्याळम, मराठी, ओडिया, पंजाबी, तमिळ आणि तेलुगू या १० भाषांमध्ये भाषांतर सेवा उपलब्ध होत्या. आता यामध्ये आणखी सहा भाषांचा समावेश करण्यात आला आहे. ओम बिर्ला म्हणाले की, “आता कामकाजात आणखी सहा भाषांचा समावेश केला आहे. बोडो, डोगरी, मैथिली, मणिपुरी, उर्दू आणि संस्कृत. यासोबतच, अतिरिक्त १६ भाषांसाठी, मानवी संसाधने उपलब्ध होत असताना, आम्ही त्या भाषांमध्ये एकाच वेळी भाषांतरे प्रदान करण्याचा प्रयत्न करत आहोत,” असे ते म्हणाले.
हे ही वाचा :
तंत्रज्ञान नोकऱ्या हिसकावून घेत नाही, रोजगाराचे स्वरूप बदलते
दिव्यांगांच्या सक्षमीकरणासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून एक टक्का निधी
निलेश राणेंनी इशारा देताच, पोलिसांनी मुस्लिमाची अनधिकृत चहाची टपरी हटवली!
राजस्थानच्या अजमेरमधून ८ बांगलादेशींना अटक!
“भारताची संसदीय व्यवस्था ही एक लोकशाही चौकट असून अनेक भाषांमध्ये भाषांतरे प्रदान करते. जागतिक स्तरावर याची चर्चा केली की, भारतातील २२ भाषांमध्ये भाषांतर देण्याचा प्रयत्न करत आहोत, तेव्हा आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर सर्वांनी त्याचे कौतुक केले. आमचा प्रयत्न असा आहे की, अधिकृतपणे मान्यताप्राप्त २२ भाषांमध्ये सेवा मिळेल. भविष्यात उर्वरित भाषांचा समावेश करण्याचे ध्येय आहे,” असे ओम बिर्ला म्हणाले.