उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमधील महाकुंभात दररोज लाखो भाविक सहभागी होत गंगा, यमुना आणि सरस्वतीच्या पवित्र संगमात स्नान करत आहेत. याच पार्श्वभूमीवर देशातील आघाडीचे उद्योगपती मुकेश अंबानी त्यांच्या संपूर्ण कुटुंबासह महाकुंभात पोहोचले आहेत. अंबानी कुटुंबाने संगममध्ये स्नान केले. विमानातून महाकुंभाचे भव्य दृश्यही पाहिले.
मुकेश अंबानी दुपारी ४.३० च्या सुमारास त्यांच्या कुटुंबासह प्रयागराजमधील अरैल घाटावर पोहोचले. त्यांच्यासोबत त्यांची आई कोकिलाबेन अंबानी, मुले अनंत आणि आकाश अंबानी, आकाशची पत्नी श्लोका मेहता आणि त्यांची दोन मुले पृथ्वी आणि वेदा सोबत होते. या सर्वांना कडक सुरक्षेत अरैल घाटावरील बोटीपर्यंत नेण्यात आले. कोकिलाबेन अंबानी यांच्या दोन मुलीही सोबत होत्या. संपूर्ण कुटुंबाने त्रिवेणी संगमात स्नान केले.
माघ पौर्णिमेपूर्वी प्रयागराजमध्ये मोठ्या संख्येने भाविक जमत आहेत. गेल्या महिन्यात, मुकेश अंबानी यांचे धाकटे भाऊ आणि उद्योगपती अनिल अंबानी आणि त्यांची पत्नी टीना अंबानी यांनीही महाकुंभाला हजेरी लावली आणि संगमात स्नान केले होते. दरम्यान, महाकुंभमेळ्यात दररोज मोठ्या संख्येने लोक सहभागी होत आहेत. आतापर्यंत ४५ कोटींहून अधिक लोकांनी त्रिवेणी संगमात स्नान केले आहे.