खारघर येथील शिवकुमार शर्मा या हिंदू व्यक्तीच्या निर्घृण हत्येप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींपैकी एकाला अटक केली आहे तर दुसरा फैजान शेख अजूनही फरार आहे. दोनही आरोपी अनुक्रमे नागपाडा आणि आग्रीपाडा येथील रहिवासी आहेत. पोलिसांनी बीकेसीमधून रेहानला पकडले तर फैजान पळून जाण्यात यशस्वी झाला.
२ फेब्रुवारी रोजी शिवकुमार शर्मा या आयटी व्यावसायिकाची निर्घृण हत्या केली. आरोपी रेहान शेख आणि फैजान शेख यांनी शिवकुमार शर्मा यांची दुचाकी अडवून त्यांच्या डोक्यावर हेल्मेटने मारहाण केली, ज्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. मीडिया रिपोर्ट्सनुसार, ओव्हरटेकिंगवरून झालेल्या वादातून शर्माची निर्घृण हत्या झाली. तथापि, विश्व हिंदू परिषदेने आरोप केला आहे की शर्मा यांच्या हिंदू ओळखीवरून त्यांच्यावर हल्ला करण्यात आला.
असे म्हटले जात आहे की, मारहाण करणारे दोनही आरोपी तबलिगी जमातच्या धार्मिक कार्यक्रमातून परतत होते आणि ते तबलिगी जमातशी संबंधित होते. इज्तेमा, तबलिगी जमातचा वार्षिक सामूहिक मेळावा खारघर येथे आयोजित करण्यात आला होता. तीन दिवसीय कार्यक्रमाचा २ फेब्रुवारी रोजी शेवटचा दिवस होता आणि याच दिवशी शर्मा यांची हत्या करण्यात आली. लाखो मुस्लिमांनी या कार्यक्रमात भाग घेतला होता. उल्लेखनीय म्हणजे, २०२१ मध्ये सौदी अरेबियाने तबलिगी जमातवर बंदी घातली होती, ज्याने इस्लामिक संघटनेला ‘दहशतवादाचे प्रवेशद्वार’ म्हटले होते.
या घटनेच्या एफआयआर कॉपीनुसार, दुचाकी ओव्हरटेकिंगच्या मुद्द्यावरून अज्ञात आरोपींनी शर्मा यांच्याशी वाद घातला. परिणामी, आरोपींनी पीडितेला जीवे मारण्याची धमकी दिली आणि काही मिनिटांतच त्यांचे हेल्मेट पकडून त्याच्या डोक्यावर अनेक वेळा मारहाण केली.
मारहाणीत जखमी झालेले शिवकुमार हल्लेखोरांविरुद्ध तक्रार दाखल करण्यासाठी पोलिस ठाण्यात दाखल झाले. मात्र, डोक्याला जबर मारहाण झाल्यामुळे ते तिथेच कोसळले. पोलिसांनी त्यांना रुग्णालयात दाखल केले असतात डॉक्टरने त्यांना मृत घोषित केले.
या प्रकरणी पोलिसांनी आरोपींवर बीएनएस कायदा, २०२३ च्या कलम १०३(१), ३५१(३), आणि ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल केला. मुंबई पोलिसांनी घटनेचे सीसीटीव्ही फुटेज देखील मिळवले आहे आणि सध्या फरार असलेल्या आरोपींचे फोटो गोळा केले आहेत. अधिकारी आरोपींना ओळखण्यासाठी आणि त्यांना पकडण्यासाठी सर्व प्रयत्न करत आहेत.
दरम्यान, शिवकुमार शर्मा हे हिंदू असल्यामुळे त्यांची हत्या झाल्याचा आरोप होत आहे. १० फेब्रुवारी रोजी, विश्व हिंदू परिषद आणि सकल हिंदू समाजाच्या सदस्यांनी शर्मा यांना न्याय मिळावा यासाठी निदर्शने केली. त्यांचा फोटो लावून त्यांना श्रद्धांजली वाहिली.
हे ही वाचा :
अंबानी कुटुंब पोहोचले महाकुंभात, संगमात केले स्नान!
जम्मूच्या अखनूर सेक्टरमध्ये आयईडी स्फोट, कॅप्टनसह दोन जवान हुतात्मा!
इस्लाममधून सनातन धर्म स्वीकारणाऱ्यांना दरमहा ३ हजार रुपये!
वांद्रे येथे वयोवृद्ध महिलेची घरात हत्या, आरोपी शरीफ अली शेखला काही तासांतच अटक
विहिंप सदस्यांनी सांगितले की, इज्तेमातून आलेल्या आरोपींनी हिंदू ओळख असल्याबद्दल जाणूनबुजून शर्मा यांना लक्ष्य केले. तबलीगी जमातच्या सदस्यांना शर्मा यांनी काढलेला भगवान शिवाचा टॅटू आणि त्यांच्या गळ्यातील रुद्राक्षाची माळ दिसली. शिवाय, त्यांच्या बाईकवर “जय माता दी” असे स्टिकर लावले होते. विहिंपच्या म्हणण्यानुसार, या धार्मिक चिन्हांमुळे तबलीगी जमातच्या सदस्यांना राग अनावर झाला आणि त्यांनी शर्मा यांच्यावर हल्ला चढवला.
तसेच तबलिगी जमातचे वादग्रस्त नेते मौलाना साद यांनी २ फेब्रुवारी रोजी खारघरमध्ये झालेल्या इज्तेमा कार्यक्रमाला संबोधित केले होते. भाषणांनी प्रभावित होऊन आरोपींनी शर्मा यांच्यावर हल्ला चढवल्याचेही विहिंप सदस्यांनी म्हटले.
भाजपा नेते मंत्री नितेश राणे यांनी देखील पिडीत कुटुंबांची भेट घेतली आणि न्याय मिळेल असे आश्वासन दिले. या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले असल्याचे त्यांनी सांगितले. याव्यतिरिक्त, नितेश राणे यांनी महाराष्ट्रात तबलिगी जमातवर पूर्ण बंदी घालण्याचीही मागणी केली. भाजपा नेते किरीट सोमय्या यांनीही पिडीत कुटुंबांची भेट घेत आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली.
मृताच्या नातेवाईकाने याबाबत म्हटले की, शिवकुमार शर्मा अत्यंत साधा, सरळ, शांत स्वभावाचा व्यक्ती होता. जर तुम्ही व्हिडिओ फुटेज बारकाईने पाहिले तर तो हल्लेखोरांना नम्रपणे थांबून बोलण्याची विनंती करताना दिसत होता, तर हल्लेखोर त्याच्यावर निर्दयीपणे हल्ला करत होते.
ते पुढे म्हणाले, दुसऱ्या एका प्रत्यक्षदर्शीने पुष्टी केली की, आरोपींनी त्यांची बाईक किमान तीन वेळा थांबवली होती. यावरून स्पष्ट होते की ही केवळ ओव्हरटेकिंगवरून झालेली किरकोळ भांडणे नव्हती. इतक्या क्षुल्लक मुद्द्यावरून कोण एखाद्यावर इतका क्रूर हल्ला करतो? जरी वाद झाला तरी सामान्य परिस्थितीत लोक पोलिसांकडे जातील – त्याऐवजी असा क्रूर हल्ला कोण करतो?, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. व्हिडिओवरून हे स्पष्ट होते की शिवकुमार यांनी कोणालाही मारहाण केली नाही किंवा चिथावणी दिली नाही. एक आरोपी शर्मा यांना रोखण्याचा प्रयत्न करत होता तर दुसरा त्याच्या डोक्यावर हेल्मेटने वारंवार मारत होता, असे शर्मा यांचे नातेवाईक म्हणाले.