काँग्रेस खासदार राहुल गांधी यांच्या अडचणींमध्ये वाढ झाली असून त्यांना लखनऊमधील एका विशेष न्यायालयाने काँग्रेस समन्स बजावले आहे. भारत जोडो यात्रेदरम्यान भारतीय सैन्याविरुद्ध केलेल्या अपमानास्पद वक्तव्याप्रकरणी राहुल गांधी यांना न्यायालयाने समन्स बजावले आहे. तसेच न्यायालयाने राहुल गांधींना २४ मार्च रोजी हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.
डिसेंबर २०२२ मध्ये झालेल्या भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधींनी भारतीय सैन्यावर भाष्य केले होते. काही पत्रकारांशी बोलताना राहुल गांधी यांनी ९ डिसेंबर २०२२ रोजी भारतीय आणि चिनी सैन्यात झालेल्या चकमकीवर आक्षेपार्ह भाष्य केले होते. तक्रारीनुसार, ९ डिसेंबर रोजी पत्रकारांशी संवाद साधताना राहुल गांधी म्हणाले होते की, “मी माझ्या मित्रासोबत पैज लावली होती की, प्रेस मला चीनबद्दल काहीही विचारणार नाही. ज्या देशाने २००० चौरस किलोमीटर भारतीय जमीन बळकावली आहे, ज्या देशाने आपल्या देशात आपले सैनिक मारले आहेत आणि जो देश अरुणाचल प्रदेशात आपल्या सैनिकांवर हल्ला करत आहे त्या देशाबद्दल प्रेस मला काहीही विचारणार नाही.”
राहुल गांधी यांच्या या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला होता आणि लष्कराकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यानंतर १२ डिसेंबर २०२२ रोजी, भारतीय लष्कराने एक अधिकृत स्पष्टीकरण जारी केले ज्यामध्ये म्हटले होते की, “चीनी सैन्य अरुणाचल प्रदेशात बेकायदेशीरपणे घुसले होते, परंतु भारतीय लष्कराने योग्य प्रत्युत्तर देऊन त्यांना माघार घेण्यास भाग पाडले.”
हे ही वाचा :
अंबानी कुटुंब पोहोचले महाकुंभात, संगमात केले स्नान!
जम्मूच्या अखनूर सेक्टरमध्ये आयईडी स्फोट, कॅप्टनसह दोन जवान हुतात्मा!
इस्लाममधून सनातन धर्म स्वीकारणाऱ्यांना दरमहा ३ हजार रुपये!
वांद्रे येथे वयोवृद्ध महिलेची घरात हत्या, आरोपी शरीफ अली शेखला काही तासांतच अटक
ही तक्रार बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशनचे (BRO) माजी संचालक उदय शंकर श्रीवास्तव यांनी दाखल केली होती, ज्यांनी डिसेंबर २०२२ मध्ये भारत जोडो यात्रेदरम्यान गांधीजींचे विधान अपमानजनक होते आणि भारतीय सैन्याची बदनामी करत असल्याचा आरोप केला होता. तसेच त्यांनी युक्तिवाद केला की, राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे सैन्याचा अपमान झाला आणि देशाच्या सीमांचे रक्षण करण्यासाठी त्यांच्या शूर प्रयत्नांना कमी लेखले गेले. तक्रारीची दखल घेत, अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी (एसीजेएम) न्यायालयाने गांधींना या प्रकरणात आरोपी म्हणून समन्स बजावले.